भाराभर चिंध्या

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यात नियमितपणे लसीकरण, जंतनाशन आणि प्रशिक्षण एवढा माफक जरी अजेंडा नियमितपणे राबविला गेला तरीसुद्धा पशुधन आरोग्यात सातत्य दिसून येऊ शकेल.
sampadkiya
sampadkiya

राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा करण्यात आला. राज्याचे पशुसंवर्धनमंत्री, महिला व बालविकासमंत्री तसेच सामाजिक न्याय राज्यमंत्री आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी शासनाचे विविध विभाग, सामाजिक न्यायाने कसे जोडले जातील, याबाबत विचार मांडले. बचत गट आणि महिलांसाठी दुधाळ जनावरवाटप ही नियोजित योजना राज्यातील ग्रामीण विभागासाठी घोषित केली. पशुधन होस्टेल ही उत्तर प्रदेशची आयात योजना काय काय बाबी आंतर्भूत करून समोर येईल, हे अजून तरी स्पष्ट नाही. मात्र, आजारी जनावरांच्या आरोग्यासाठी एसएमएसद्वारे पशुवैद्यकीय अधिकारी किपतप उपलब्ध होणार, याबाबत शंका आहे. अनुवंश सुधारणा योजनेत राज्य शासनाकडे  ६० हजार शेतकऱ्यांची नोंद असली तरी आजमितीला कितपत एसएमएस प्राप्त होतात, हा संशोधनाचा विषय ठरेल. 

याच योजनेत कृत्रिम रेतन तंत्राबाबत असलेली एसएमएसची सोय पशुपालकांनी का टाळली हेही आजपर्यंत कळू शकलेले नाही. एकंदरीत घोषित अनेक योजनांत काहीही स्पष्टता दिसत नाही.   स्वातंत्र्यानंतर दरवर्षी पशुधनवाटपाची लोकप्रिय योजना वर्षानुवर्षे राबविली गेली. त्यातील साध्यता सर्वश्रुत असताना आता महिला सक्षमीकरण नावाखाली बचत गटांना पशुधनवाटप होईल, एवढाच काय तो बदल यात दिसतो. सामाजिक न्यायमंत्र्यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजनेत रस असल्याचे सर्वांनी एेकले. मात्र, पशुधन हीच संपत्ती सामाजिक न्यायाची साधणे अाहेत आणि राज्याचा पशुसंवर्धन विभाग देशातील विविध राज्यांच्या क्रमवारीत घसरतो आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. पशुसंवर्धन खात्याचा वाढलेला दबदबा दूध उत्पादकांना दूध दर मागणीसाठी का उपयोगी पडत नाही आणि राज्यातील ग्राम पातळीवर दूध उत्पादन करणारा पशुपालक सक्षम का होत नाही, याचा विचार महत्त्वाचा आहे. राज्यात आभासी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून नवीन वाट धरण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु ग्राम स्तरावरील पशुपालक अशा प्रशिक्षणांचा लाभार्थी ठरल्याशिवाय उत्पादकता आणि गुणवत्तेत वाढ होणार नाही.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यात नियमितपणे लसीकरण, जंतनाशन आणि प्रशिक्षण एेवढा माफक जरी अजेंडा नियमितपणे राबविला गेला तरीसुद्धा पशुधन आरोग्यात सातत्य दिसून येऊ शकेल. मात्र, अत्यंत अपुरी अधिकारी आणि कर्मचारी संख्या आणि त्यांच्यावरील प्रशासकीय कामांच्या ताणामुळे पशु संवर्धन विभागाच्या एकाही योजनेचे काम नीट होत नाही, हे वास्तव आहे. राज्यात पशुगणनेचे काम लांबत चालले आहे, इनाफ टॅगिंगचे काम अर्धवट आहे, सगळे दवाखाने आयएसओ झालेले नाहीत. पशु संवर्धनात मूलभूत सुविधा आणि पुरेशा मनुष्यबळाशिवाय नवीन योजना अथवा उपक्रम; मग तो कितीही चांगला असला तरी तो यशस्वी होणार नाही, हेही तेवढेच खरे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com