agriculture news in marathi, agrowon agralekh on corrupt quality control section in agril commissionarate | Agrowon

भ्रष्ट आणि निगरगट्ट
आदिनाथ चव्हाण
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

कृषी आयुक्तालयातील ‘गुणी’जनांना भस्म्या जडल्याने कृषी निविष्ठा उद्योजक गेली काही वर्षे परेशान झाले आहेत. यापैकी अनेकांनी महाराष्ट्रातील उद्योग बंद करून शेजारील मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये काम सुरू केले आहे. आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही, असा विश्वास निर्माण झालेल्या भ्रष्ट आणि निगरगट्ट यंत्रणेला याचे कसलेच सोयरसुतक नव्हते.

कृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण विभागात राजरोस चालणाऱ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी ‘गुण नियंत्रण विभागाचे अवगुण' ही ‘ॲग्रोवन’मधील वृत्तमालिका संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी सरकारने कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांची बदली केली. मागे सुरू होते ते तसेच पुढेही सुरू राहील (किंवा सुरू ठेवता येईल), असा आशावाद बाळगणाऱ्या कृषी खात्यातल्या काही शुक्राचार्यांना हा योगायोग असल्याचा भास होतो आहे. त्यांचा ‘भ्रम'निरास होणे तसे कठीणच! गेली काही वर्षे कृषी निविष्ठा उद्योगाला जेरीस आणणारा भ्रष्टाचार आयुक्तालयात राजरोसपणे सुरू होता. राज्यातील फडणवीस सरकार पारदर्शक कारभाराचा उदो उदो करीत असले तरी, नावापुरता आॅनलाइन कारभार करून कृषी निविष्ठा व्यावसायिकांना आपल्या टाचेखाली आणण्याचे कसब गुण नियंत्रण विभागाने साधले होते. त्यामुळे इथला खरा कारभार सूर्य मावळतीला जातानाच सुरू होतो. साध्यासाध्या बाबींवरून या उद्योजकांचा छळ करून खिसे भरण्याचे काम इथले ‘गुणी’जन करीत होते. या साऱ्याशी आयुक्तांचा थेट संबंध होता, असे म्हणता येत नसले तरी, या विभागाचे कार्यकारी प्रमुख म्हणून हे सारे रोखण्याची जबाबदारी त्यांचीच होती. ते झाले नाही. उलट गुण नियंत्रण विभागाचा कारभार उत्तम सुरू असल्याचा निर्वाळा त्यांनी या वृत्तमालिकेच्या सुरवातीच्या भागातच दिला होता. अर्थात तो काही कामी आला नाही.   
कृषी आयुक्तालयातील भ्रष्टाचार ही काही नवी बाब नाही. हल्लीच तो सुरू झाला असेही नाही. आयुक्तपदी कोणीही असले तरी ‘बाबूं’ची वर्षानुवर्षे मुरलेली यंत्रणा येथे आहे. काही जण तर कित्येक वर्षे आयुक्तालयात तळ ठोकून आहेत. त्यांच्या बदल्या का होत नाहीत, या प्रश्नाला कोठेच उत्तर मिळत नाही. कोणाला कसे, कधी, केव्हा टप्प्यात घ्यायचे याचा पुरेपूर आवाका या यंत्रणेला आलेला आहे. त्यामुळे अनेकांच्या कोट्यवधींच्या मालमत्ता तयार झाल्या आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या या यंत्रणेतील सारे शुक्राचार्य शेतकऱ्याचीच पोरं आहेत. प्रशासनात शेतकऱ्याची मुले आली तर शेतकऱ्यांचे प्रश्न हलके होतील; कारण त्यांना शेतकऱ्यांची दुखं माहीत असतात, असा भाबडा आशावाद महात्मा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी तत्कालीन इंग्रज सरकारकडे व्यक्त केला होता. तो फोल ठरवण्याचे काम प्रशासनातील आणि राजकारणातीलही शेतकरी पुत्र अत्यंत निष्ठेने करीत आहेत. बहुजनांचा तोंडदेखला कैवार घेणारेही त्यात आले.
भ्रष्टाचार हे भारतीय प्रशासकीय व्यवस्थेतील उघड गुपित आहे. जोपर्यंत लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात सापडत नाही किंवा सरकार काही कारवाई करत नाही, तोपर्यंत सारेच साव असतात. अर्थात याला अपवादही अनेक आहेत. मनोभावे सेवा करणाऱ्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी झटणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची या राज्यात वानवा नाही; पण त्यांचे प्रमाण कमी आहे आणि ते घटते आहे, ही चिंतेची बाब ठरावी. कृषी निविष्ठा उद्योगातही सारे आलबेल आहे असे नाही. येथेही शेतकऱ्याला बनवणारे महाभाग आहेत. पण सरसकट सगळे तसे आहेत असेही नाही. जिल्हा, तालुका पातळीवर काम करणारे अनेक निविष्ठा उद्योजक तर शेतकरी कुटुंबातील आहेत. कृषी आयुक्तालयातील ‘गुणी’जनांना भस्म्या जडल्याने हे सारे लोक गेली काही वर्षे परेशान झाले आहेत. यापैकी अनेकांनी महाराष्ट्रातील उद्योग बंद करून शेजारील मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये काम सुरू केले आहे. त्यातूनच आपल्या कृषी खात्याची काळवंडलेली प्रतिमा समोर येते. आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही, असा विश्वास निर्माण झालेल्या भ्रष्ट आणि निगरगट्ट यंत्रणेला याचे कसलेच सोयरसुतक नव्हते. त्यातून अंडे खाण्याऐवजी कोंबडीच कापून खायची धांदल गेली काही वर्षे आयुक्तालयात उडाली आहे. याला आळा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील केंद्रेकर यांच्यासारख्या प्रामाणिक आयुक्तांनाही तडकाफडकी बदलीला सामोरे जावे लागले. त्यातून आयुक्तालयातील साखळी किती मजबूत आहे याचा प्रत्यय कृषी क्षेत्राला आला. आयुक्तपदी आता कृषीची पदव्युत्तर पदवी असलेले सुहास दिवसे रुजू झाले आहेत. आयुक्तालयातील साफसफाईसाठी त्यांना समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने ‘ॲग्रोवन’च्या शुभेच्छा!      

इतर संपादकीय
समन्यायी जल-व्यवस्थापनाला पर्याय नाही जलव्यवस्थापन हा केव्हापासूनच कळीचा बनलेला प्रश्न...
जलव्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळपेयजल, सिंचन व औद्योगिक पाणी वापर हे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...