‘दादाजीं’ची दखल घ्या

आपल्या संशोधनातून इतर शेतकऱ्यांना समृद्ध, तर अनेकांना श्रीमंत करणारा शेतकरी संशोधक शासन पातळीवर मात्र केवळ एक-दोन पुरस्कारांचा धनी ठरावा, हे योग्य नाही.
sampadkiya
sampadkiya

उघड्या डोळ्यांनी पाहिलं मरण कशाला आता रचता सरण म्हातारपणी बहुतांश शेतकऱ्यांच्या दुर्दशेचे वास्तव वर्णन कवितेच्या या ओळी करतात. जिवंतपणी अशाच मरणयातना भाताच्या संशोधनातील एकेकाळी ‘दादा’ म्हणून नावारूपाला आलेले दादाजी खोब्रागडे आता भोगत आहेत. म्हातारपण, आजारपण आणि शेवटी जीवनाचा अंत हे सर्वांच्याच वाट्याला येणारे आहे. त्यातून कोणाचीही सुटका नाही; परंतु एक मोठे संशोधन ज्यांच्या नावावर आहे, अशा शेतकऱ्याजवळ आज चांगल्या उपचारासाठी पैसा नाही. शासनासह समाजाचेदेखील याकडे लक्ष नाही. त्यांच्या मुलाने शासनाकडे मदतीसाठी निवेदन दिले तर त्यांना शासकीय रुग्णालयाचा रस्ता दाखविला जातो, ही बाब शासनाच्या असंवेदनशीलपणाचा कळस आहे. दादाजी खोब्रागडे यांनी प्रचंड मेहनत आणि कल्पकतेतून भाताचे तब्बल नऊ वाण विकसित केले आहेत. या वाणांची लागवड परिसरातील शेतकरी करीत असून, त्यांना त्यापासून चांगला फायदादेखील होत आहे; परंतु अशिक्षित असलेले दादाजी व्यवहारी नव्हते. विशेष म्हणजे त्यांचे काम खूप चांगले आणि तेवढेच मोठे असले तरी याबाबत त्यांना कोणीही योग्य मार्गदर्शन केले नाही. उलट सर्वांनी त्यांना फसविण्याचेच काम केले. दूर कशाला अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यांचे भरपूर उत्पादन आणि अत्यंत चविष्ट असे एचएमटी वाण स्वतःच्या नावाने विकसित करण्याचा पराक्रम केला, तर त्यांच्या याच वाणाचे बियाणे विकून परिसरातील एक भामटा व्यापारी गब्बर झाला आहे. या संशोधनाचे जनक मात्र मागील अनेक वर्षांपासून गरिबीबरोबर आता आजारपणाशी झुंज देत आहेत.

प्रयोगशील शेतकरी दादाजी खोब्रागडे केवळ भातांच्या वाणांचे संशोधन करून थांबले नाहीत, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रयोगशीलता जपावी, आपल्या बांधावरच्या प्रयोगात सातत्य जपावे, गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित करावे, त्याचा स्वतः वापर करावा आणि इतरांपर्यंतदेखील हे तंत्रज्ञान पोचविण्यासाठी ते आजारी पडेपर्यंत पुढाकार घेत राहिले. असा हा संशोधक शेतकरी मात्र शासन पातळीवर केवळ एक-दोन पुरस्कारांचा धनी ठरला आहे. खरे तर शासकीय यंत्रणेने, कृषी विद्यापीठाने योग्य मार्गदर्शन करून दादाजींना त्यांच्या संशोधनाचे पेटेंट मिळवून दिले असते, तर आज त्यांच्या कुटुंबीयांना दादाजींवर उपचार करण्याकरिता मदतीसाठी कुणाकडेही हात पसरण्याची वेळ आली नसती. आता दादाजींची दखल शासन घेईल की नाही हे माहीत नाही, त्यांच्या आत्तापर्यंतच्या ‘ॲप्रोच’वरून तर घेणार नाही, असेच चित्र दिसते. त्यामुळे आता समाजाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा. एका व्यक्तीवर उपचारासाठी खर्च लागणारच किती आहे? वैयक्तिक शेतकऱ्यांसह काही सेवाभावी संस्थांनी हातभार लावला तर दादाजींवर चांगल्या खासगी रुग्णालयात तत्काळ उपचार सुरू होतील. या संशोधकाने समाजासाठी खूप मोठे काम केले आहे, आता त्याची समाजाने परतफेड करण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. महत्त्वाचे म्हणजे दादाजींसारखे अनेक संशोधक शेतकरी राज्यात आहेत. त्यांच्या संशोधनातून विकसित तंत्राचा लाभ अनेकांना होत आहे. असे बहुतांश शेतकरी मात्र बेदखल राहतात अथवा त्यांना जाणीवपूर्वक तसे ठेवले जाते, हे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या संशोधनाला राज्यात प्रतिष्ठा अन् त्याचे उचित मूल्य त्यास मिळालेच पाहिजे, अशी व्यवस्था उभी करायला हवी. असे झाले तरच उतरत्या वयात इतर दादाजींची होरपळ टळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com