agriculture news in marathi, agrowon, agralekh on direction of changing agril education | Agrowon

दिशा बदलत्या कृषी शिक्षणाची
विजय सुकळकर
बुधवार, 6 डिसेंबर 2017

कृषी शिक्षणातील बदलाबाबत केवळ निर्देश देऊन भागणार नाही, तर देशभरातील कृषी शिक्षणात अपेक्षित बदल घडवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल. 

बदलते हवामान, खुली अर्थव्यवस्था, आयात-निर्यातीमुळे प्रभावीत होणारे दर, वाढत्या शेती अनुदानावर इतर देशांचा आक्षेप ही आपल्या आजच्या शेतीपुढील प्रमुख आव्हाने आहेत. जगभरात शेती तंत्रही वेगाने बदलते आहे. अत्याधुनिक तंत्र, स्वयंचलित यंत्रे शेतीत येत आहेत. अशा वेळी प्रमुख आव्हाने आणि बदलत्या प्रवाहानुसार आपले कृषी शिक्षण मात्र बदलले नाही. महाराष्ट्रासह देशभरातील कृषी विद्यापीठांमध्ये या बदलाला तोंड देण्यासाठी पुरेशा संसाधनाचा अभाव आहे. त्यांना मिळणारे केंद्र-राज्य शासनाचे अनुदान तुटपुंजे असून, ते पगार, पेन्शन आणि देखभाल दुरुस्तीतच खर्च होत आहे.

मागील अनेक वर्षांपासून राज्यातील कृषी विद्यापीठांमधील अर्ध्याहून अधिक पदे रिक्त आहेत. त्याचा कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यावर अत्यंत अनिष्ट परिणाम होत आहे. राज्यातील बहुतांश खासगी महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठीच्या मूलभूत सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे एकंदरीतच कृषी शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला असून, इतर राज्यांची परिस्थितीसुद्धा यापेक्षा वेगळी नाही. अशावेळी कृषीतील बदलत्या प्रवाहानुसार अभ्यासक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह सांगतात. याबाबत केवळ निर्देश देऊन भागणार नाही, तर कृषी शिक्षणात अपेक्षित बदल घडवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल. 

आपले कृषी शिक्षण पारंपरिक पद्धतीने चालू आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून कृषी अभ्यासक्रमात सहाव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार बदल केला जात असला तरी तो पुरेसा नाही. यात प्रात्यक्षिकांवर भर दिला जात असून, कृषी पदवीच्या शेवटच्या वर्षात उद्योगासोबत अनुभव, कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा बदल चांगला असला तरी देशभरातील कृषीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार उद्योग शोधणे जिकीरीचे ठरु शकते. त्यामुळे त्याबाबतचे योग्य नियोजन गरजेचे असून, हे काम सुरळीत चालण्यासाठी उद्योगांबरोबर करार करावे लागतील.

सध्याच्या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात बेसिक  शिक्षणावरच भर दिसून येतो. बेसिक शिक्षण गरजेचे आहे. परंतु सुरवातीची दोन वर्षे बेसिक शिक्षण आणि शेवटच्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांना एेच्छिक विषय निवडीची सोय असावी. असे झाले तर पदवीनंतरच संबंधित विषयातील तज्ज्ञ तयार होतील. त्यामुळे एखादा उद्योग व्यवसाय त्यास सुरू करायचा असेल, तर पदवीनंतर कुठलेही प्रशिक्षण घेण्याची गरज त्यास पडणार नाही. दोन वर्षांच्या एेच्छिक विषयात सध्याची आव्हाने आणि बदलत्या प्रवाहानुसार विषयांचा समावेश असावा. त्यातही प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष अनुभव, कौशल्यवृद्धी यावर भर असायला हवा. कृषी क्षेत्रात जागतिक पातळीवरील आव्हानांबरोबर स्थानिक पातळीवरील आव्हानेदेखील बरीच असतात.

अधिष्ठाता समितीने सुचविलेल्या अभ्यासक्रमात स्थानिक गरजेनुसार ३० टक्के बदल करण्याची सवलत असते. राज्यातील कृषी परिषद व चारही कृषी विद्यापीठांनी आपापल्या भागातील स्थानिक समस्यांचा अभ्यास करून त्याचा समावेश शिक्षणात करावा. आपले कृषी शिक्षण जगाच्या पातळीवर आणण्यासाठी शिक्षकांना देश-विदेशात नेमके काय चालले, हे जाणून घेण्याची संधी दिली पाहिजे. असे प्रशिक्षित शिक्षकच उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ शकतील. अशा बदलत्या शिक्षणातून तयार झालेल्या कृषीच्या विद्यार्थ्यांमध्ये नवनवी आव्हाने पेलण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. हे विद्यार्थी बदलत्या प्रवाहानुसार शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करून त्यानुसार त्यांना बदलास भाग पाडतील.  

इतर अॅग्रो विशेष
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...
मातीची हाक मातीचा कस घटल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या जमिनी...
मातीच्या घनीकरणाने घटते उत्पादनजमीन खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण   ...
समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिकाबऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनीची आरोग्यपत्रिका उपलब्ध...
सावधान, सुपीकता घटते आहे... पुणे : महाराष्ट्रातील भूभागाचे मोठ्या...
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात...जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-...
शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...मी १९७६ पासून आजपर्यंत जमिनीची सुपीकता...
सेंद्रिय कर्बावर अवलंबून जमिनीची सुपीकताजमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे...
भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड...सुरू उसात दक्षिण विभागात पहिला क्रमांक उरुण...
अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीनक्षारपड-पाणथळ जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी...
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...