agriculture news in marathi, agrowon agralekh on freezing cold | Agrowon

शीत लहर करतेय कहर
विजय सुकळकर
गुरुवार, 3 जानेवारी 2019

हवामान बदलाच्या फेऱ्याने हिवाळा या ऋतूलाही सोडले नाही. हिवाळ्यात अचानक होणाऱ्या तापमानातील चढ-उताराचे दुष्परिणाम पिकांसह मानवी आरोग्यावरही होताहेत.

उ  त्तर भारतात सध्या शीत लहर चालू आहे. जम्मू काश्मीरपासून ते मध्य प्रदेशपर्यंत अनेक ठिकाणी थंडीची अतितीव्र लाट आहे. उत्तरेकडून येत असलेल्या थंडीच्या लाटेने आपल्या राज्यालाही कवेत घेतले आहे. १० दिवसांपूर्वी पूर्व विदर्भाला हुडहुडी भरवून आता राज्यभर कडाक्याची थंडी वाढली आहे. राज्यात अजून दोन ते तीन दिवस अशीच बोचरी थंडी राहाणार असून त्यानंतर तापमानात थोडीफार वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाने पिके वाचविण्यासाठी धडपडत असताना वरून थंडीचा माराही सुरू आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा वगळता इतर कोणत्याही पिकांना ही शीत लहर पोषक नाही. हळद, मका, भाजीपाला पिकांची पानासह पूर्ण झाडे करपत आहेत. केळी, द्राक्ष या फळांना तडे जात आहेत. स्ट्रॉबेरीच्या पाने फळांवर डाग पडून ती खराब होत आहेत. खरे तर या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांमध्ये थंडीत मोठा चढ-उतार आढळून आला आहे. अधून मधून येणारे ढगाळ वातावरण यांस कारणीभूत होते. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातील पेथाई चक्रीवादळाच्या प्रभावाने विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर राज्यात सुरू झालेला थंडीचा कडाका नववर्षातही कायम आहे. 

हिवाळा ऋतू पिकांसह मानवी आरोग्याच्या दृष्टिनेसुद्धा उत्तम मानला जातो. स्वच्छ निरभ्र आकाश, थंड कोरडी हवा पिकांना अत्यंत पोषक असते. या काळात पिकांची निरोगी वाढ होऊन चांगले उत्पादन मिळते. मानवी शरीर संवर्धन आरोग्य प्राप्त करण्याचा काळ म्हणूनही थंडीकडे पाहिले जाते. त्याचमुळे थंडी वाढत जाते, तशी खासकरून शहरांमध्ये पहाटे फिरायला जाणाऱ्यांची संख्याही वाढते. थंडीमुळे निसर्ग, पशु-पक्ष्यांमध्येही चैतन्यदायी बदल दिसून येतात. परंतु, हवामान बदलाच्या फेऱ्याने या ऋतुलाही सोडले नाही. हिवाळ्यात अचानक होणाऱ्या तापमानातील चढ-उताराचे दुष्परिणाम पिकांसह मानवी आरोग्यावरही होताहेत. सांधेदुखी, त्वचेचे विकार, सर्दी, पडसे, ताप, घशाचे विकार, दमा, हृद्‍याशी संबंधित दुखणी यांचा उपद्रव आणि संसर्ग याच काळात होतो. शेतीची कामे तर प्रचंड अंगमेहनत आणि कष्टाची असतात. हिवाळ्यामध्ये वयोवृद्ध शेतकऱ्यांचे (महिला तसेच पुरुष) पाठ, मान, गुडघे, कंबर दुखी वाढते. 

हंगामी पिके, फळपिकांची वाढत्या थंडीत काय काळजी घ्यायला हवी, याबाबतचे मार्गदर्शन कृषी तज्ज्ञ तसेच विस्तार कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना करायला हवे. थंडीपासून फळपिकांचे संरक्षण करण्यासाठी बागेत ठिकठिकाणी काडीकचऱ्याचे ढीग करून पहाटे जाळून धूर केल्यास बागेचे तापमान थोडेफार वाढून पिकांना फायदा होतो. तसेच रब्बी पिकांना सायंकाळी पाणी दिल्यास जमिनीचे तापमान योग्य राहते. असे उपाय शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्लाने करायला हवेत. कुक्कुट पक्षी, रेशीम किटक, दुभती जनावरे यांनाही थंडीचा फटका बसू नये, याबाबतचे घरगुती उपाय तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सांगायला हवेत. थंडीच्या काळात मानसाने कोणतेही दुखणे अंगावर काढू नये, असे म्हटले जाते. ते अगदी बरोबर आहे. हंगामी तसेच जुने दुखणे डोके वर काढू लागले की त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. थंडीत आहार हा पाैष्टिक, तैलयुक्त लागतो. या दिवसांत गाजर, पालक, कांदे, हिरव्या पालेभाज्या मुबलक उपलब्ध असून त्या शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. आहारामध्ये ज्वारी, मका, बाजरी, डाळ यांचा समावेशही करावा. थंडीत पौष्टिक खाद्य, सुकामेवा, फळांचा आधार घेणेही उपयुक्त आहे. मानवी आरोग्य आणि शेतातील पिकांची अशा प्रकारे काळजी घेतल्यास कडाक्याच्या थंडीचाही आनंद आपल्याला लुटता येईल.    


इतर संपादकीय
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
बेगडी विकास कितपत टिकेल?हवामान बदल ही जागतिक स्वरूपाची समस्या आहे....
शेळी दूध प्रकल्प कौतुकास्पदच! शेळीच्या दुधाचे संकलन, प्रक्रिया आणि विक्री...
आंधळी कोशिंबीर जूनचा पहिला आठवडा संपत आला आहे. केरळमध्ये मॉन्सून...
स्वायत्त विद्यापीठेच देतील...भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठांची व...
‘देशी’ प्रेम; नको नुसता देखावाजमिनीच्या आरोग्यापासून ते शेतकऱ्यांच्या...
पर्यावरणपूरक विकासासाठी ‘ग्रीन पार्टी’शाश्वत विकासाच्या संकल्पनेमध्ये नैसर्गिक...
नियोजन प्लॅस्टिकमुक्तीचे  वाढत्या दूध उत्पादन खर्चाबरोबर दूध आणि...
अविश्‍वसनीय विजयाचा अन्वयार्थलोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचा विजय झाला...
काँग्रेस नेतृत्वासाठी कसोटीचा काळघराणेशाहीचे आरोप व प्रचार, पक्षाचे निष्क्रिय...
‘सन्मान’ योजनेत नको चेष्टा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित...
कोरडे इशारेयं दा पीक कर्जवाटपात बॅंकांनी हात आखडता घेतल्यास...
आता तरी वाढवा मधाचा गोडवापृथ्वीवरील मधमाश्या लुप्त झाल्या तर केवळ चार-पाच...
मधमाश्‍या वृद्धीसाठी हवा कृती आराखडामधमाश्‍या आणि मध यासंबंधी मानवास प्राचीन...
चांगली संकल्पना; कृतीत उतरवासलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत...
शाळा मृत्युपंथाला अन् आजारी आरोग्य...शिक्षण, आरोग्य व कल्याणकारी योजनांवरील खर्चाला...