मोदी लाटेचे गारुड

‘जिंकू किंवा मरू’ या निर्धाराने भारतीय जनता पक्ष लढताना दिसला. यातला थोडाही अंश, जिगर कॉँग्रेस किंवा अन्य विरोधकांच्या ठायी दिसला नाही. विरोधक सुटे सुटे लढले. त्याचा फायदा भाजपला झाला.
संपादकीय
संपादकीय

सतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे तर मतदानोत्तर चाचण्यांनी त्याची चाहूल दिलेलीच होती; पण त्याच्याही पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यश मिळवले आहे. त्याबद्दल त्यांचे प्रथमतः अभिनंदन! या विजयात मोदी यांच्याबरोबर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि त्यांच्या चमूचा वाटा मोठा राहिला. ‘जिंकू किंवा मरू’ या निर्धाराने भारतीय जनता पक्ष लढताना दिसला. सोशल मीडिया, आर्मी आणि कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीने त्यात मोलाची भूमिका बजावली. यातला थोडाही अंश, जिगर कॉँग्रेस किंवा अन्य विरोधकांच्या ठायी दिसला नाही. विरोधक सुटे सुटे लढले. त्याचा फायदा भाजपला झाला. उत्तर प्रदेशचे उदाहरण त्यासाठी पुरेसे बोलके ठरावे. ८० जागा असल्याने सत्तास्थापनेत नेहमीच मोलाची भूमिका बजावणाऱ्या या राज्यात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने कॉँग्रेसला जमेतही न धरता आघाडी केली. कॉँग्रेस स्वतंत्रपणे लढली. मतविभाजनाचा फायदा अर्थातच भाजपला झाला आणि या राज्यात भाजपची मोठी पीछेहाट होईल, या भाकितालाच धक्का बसला. असेच अन्य उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये झाले. ममता बॅनर्जी यांच्या आक्रस्ताळेपणामुळे अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या पश्‍चिम बंगालमध्येही भाजपला सरशी करता आली. ममतांचा आक्रमकपणा भाजपच्या पथ्यावरच पडला.

शेती क्षेत्रात असलेला असंतोष, ग्रामीण भागातील वाढती बेरोजगारी, नोटाबंदीमुळे झालेली अपरिमित हानी, दुष्काळ हे कळीचे प्रश्‍न बेदखल करण्यात भाजपला यश आले. किंबहुना हे प्रश्‍न ताकदीने ऐरणीवर आणणे कॉँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना जमलेच नाही. शेतीमालाच्या हमीभावाचा मुद्दा असो वा कर्जमाफीतला गोंधळ, सारे काही या झंझावातात उडून गेले. मोदींनी उपस्थित केलेल्या ‘नॉन इश्‍यूं’वर किंवा तुलनेने कमी महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिक चर्चा झाली. मोदी आणि शहा यांच्या रणनीतीचा हा विजय मानावा लागेल. त्याचबरोबर राष्ट्रवादाचा मुद्दा भाजपकडून हेतुतः महत्त्वाचा ठरवला गेला. पाकिस्तानचा वापर करीत भयग्रस्त वातावरण तयार करून प्रचार त्याभोवती फिरवण्यात भाजपला यश आले. त्यामुळेच गेल्या वेळेसारखे ‘अच्छे दिन’चे गाजर खिशात नसतानाही मोदी आणि शहा यांना लोकसभेत बहुमताचा वारू घुसवता आला. विरोधी पक्षांमधील बेकीने त्यांच्या पराभवाची पायाभरणी केली. कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारात प्रगल्भतेची झलक दिसत होती; मात्र महाराष्ट्रासह बहुतांश राज्यांतील विस्कटलेले संघटन सावरण्यात त्यांना यश आले नाही. त्याचा मोठा फटका देशावर दीर्घकाळ राज्य केलेल्या या पक्षाला बसला.

भारतातच नव्हे तर जगभरात उजवा प्रवाह मजबूत होताना दिसत आहे. बदलते तंत्रज्ञान, जागतिक व्यापारातले ताणेबाणे, अर्थकारणातील चढ-उतारांमुळे आलेल्या अस्थैर्याचा फटका बसलेल्यांना उजवी विचारसरणी जवळची वाटू लागली आहे. अगदी प्रगत अमेरिका आणि युरोपातही हे घडते आहे. शिवाय इतिहासाचे आणि भविष्याचे देणेघेणे नसलेल्या तंत्रज्ञानस्नेही तरुण पिढीला वर्तमानातला ‘आज’ महत्त्वाचा वाटतो आहे. म्हणूनच या पिढीवर मोदी- शहांचे गारूड चालले असावे. कोणतेही साध्य गाठण्यासाठी साधनशुचिता सांभाळली पाहिजे, असा विवेकी विचार करण्याचा काळ केव्हाच मागे पडला आहे. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचा गुणगौरव करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांचा विजय त्याकडेच अंगुलीनिर्देश करतो. देशापुढे सध्या अनेक आव्हाने उभी आहेत. मुख्यत्वे अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या आघाडीवरील निराशाजनक चित्र भयावह आहे. उद्‌ध्वस्त झालेली ग्रामीण आणि शेती व्यवस्था पुन्हा उभी करावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या माथ्यावरील कलंक ठरलेल्या दुष्काळावर मात करण्याचे आव्हान तर कस पाहणारे आहे. या पार्श्‍वभूमीवर २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनाचे काय होते, हे पाहणे औत्स्युक्‍याचे ठरावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com