नवसंजीवनीसाठी ‘बूस्टर डोस’

एकनाथ डवले यांची आतापर्यंतची कार्यपद्धती ही ‘रिझल्ट ओरिएन्टेड’ राहिली आहे. प्रचलित कामकाज पद्धतीत ते आमूलाग्र बदल करतात. नवनवे प्रकल्प, अभियान, योजना राबवितात. या बदलाच्या प्रक्रियेत ते सर्व सहकार्यांना सामावून घेतात.
संपादकीय
संपादकीय

रा ज्यातील शेतीचे वर्तमान भयंकर अस्वस्थ आहे. दिवसागणिक दुष्काळ विस्तारतोय. वाढत्या उन्हासह त्याच्या झळाही वाढताहेत. जनावरांना चारा-पाणी नाही. वाळत असलेल्या फळबागा काढून टाकाव्या लागत आहेत. दररोजच एका नव्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हवालदिल झालाय. पिकांची उत्पादकता घटली आहे. कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. प्रगत तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार थांबल्यातच जमा आहे. प्रयोगशील-प्रगतिशील शेतकऱ्यांचे यश त्यांच्या बांधापुरतेच मर्यादित आहे. अनुदानाच्या योजनेत आपला वाटा कसा सुरक्षित होईल, यासाठीच काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यातूनच ऑनलाइन योजनांच्या अंमलबजावणीत जाणीवपूर्वक खोडा घातला जातोय. हे सर्व प्रकार चालू असतानाच आपल्याला मलिद्याची जागा कशी मिळेल, मिळाली तर ती कशी टिकेल, यासाठीच अनेक महाभाग आपला संपूर्ण वेळ खर्ची घालत आहेत. सोयीच्या ठिकाणी बदली झाली नाही तर तिथे कामावर रुजू व्हायला कोणी तयार नाही.

गैरप्रकार करणाऱ्यांची साखळी गावपातळीपासून मंत्रालयापर्यंत आहे. कृषी विभागाच्या अशा अनियंत्रित कारभारातूनच मागील काही दिवसांत मृद्‌संधारणापासून ते निविष्ठा गुणनियंत्रणापर्यंतचे गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. अशा एकंदर परिस्थितीमध्ये कृषी विभागाला सचिव म्हणून एकनाथ डवले सारखे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी लाभले आहेत. कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या मदत आणि सहकार्याने कृषी विभागातील मरगळ झटकून टाकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कृषी खात्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी महाॲग्रीटेक अभियान सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पूरक, प्रगत तंत्र शेतकऱ्यांच्या बांधावर पोचविण्यासाठी शेती कार्यशालासुद्धा राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.   

एकनाथ डवले यांची आत्तापर्यंतची कार्यपद्धती ही ‘रिझल्ट ओरिएन्टेड’ राहिली आहे. प्रचलित कामकाज पद्धतीत ते आमूलाग्र बदल करतात. नवनवे प्रकल्प, अभियान, योजना राबवितात. या बदलाच्या प्रक्रियेत ते सर्व सहकार्यांना सामावून घेतात, हे त्यांच्या कामकाजाचे वैशिष्ट्य असून, त्यातूनच ते ज्या विभागात गेले तेथे आपल्या कामाची वेगळी छाप त्यांनी पाडली आहे. कृषी खात्याला अगदी गरजेच्या वेळी ते सचिव म्हणून लाभले, हे खरे तर राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टिने अत्यंत चांगली बाब म्हणावी लागेल. महाॲग्रीटेक अभियानाच्या माध्यमातून कृषी सहायक ते संचालक यांच्या कामाचे स्वरुप ठरविणे, कामनिहाय उपयुक्त मनुष्यबळाची निवड करणे, मनुष्यबळास प्रथम विश्वासात घेणे, त्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे, कामाचा आराखडा तयार करणे, नियोजित कामाची जबाबदारी अधिकारी-कर्मचारी वर्गावर टाकणे, झालेल्या - होत असलेल्या कामाचे वेळोवेळी मूल्यमापन करणे, हे करीत असताना कशाचाही गाजावाजा न करणे अशा प्रकारे त्यांनी कामाचे स्वरुप ठरविले असून, त्याबाबत सर्वांचे प्रबोधन चालू आहे.

कृषी विभागाचे काम गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी संगणकीय कामकाजालाच प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच कामातील गैरप्रकार टाळण्यासाठी अनुदानाच्या योजना ऑनलाइन पद्धतीनेच राबविल्या जाणार आहेत. विभाग कोणताही असो अनेक वरिष्ठ अधिकारी यशाचे श्रेय लाटताना अपयशाचे खापर मात्र कनिष्ठ अधिकारी - कर्मचाऱ्यांवर फोडतात. डवलेंनी मात्र यशापयशाची जबाबदारी सर्वांसोबत माझीही असेल, असे स्पष्ट करून या अभियानाबाबत आपली किती बांधिलकी आहे, हे दाखवून दिले आहे. कृषी अधिकारी - कर्मचाऱ्यांची आठवड्याला शेतीला भेट देऊन मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आगामी खरिपात निश्चितच उपयुक्त ठरेल. महाॲग्रीटेक अभियान राबविताना कृषी विभागाच्या सर्व मनुष्यबळाने कामात कसूर ठेवला नाही, तर खरोखरच हा बूस्टर डोस शेतीला नवसंजीवनी देऊ शकतो.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com