agriculture news in marathi, agrowon agralekh on mechanization in agriculture | Agrowon

यांत्रिकीकरण ः वास्तव आणि विपर्यास
विजय सुकळकर
शनिवार, 16 मार्च 2019

शासनाच्या अनुदान योजनेत कोणतीही यंत्रे-अवजारे शेतकऱ्यांवर थोपविण्यापेक्षा त्यांना आपल्या गरजेनुसार निवड करण्याची मुभा असावी. अवजारे अनुदानवाटपाचा लाभ गरजवंत सर्वच शेतकऱ्यांना मिळायला हवा.
 

सध्या राज्यभर विविध योजनांमधून अवजारे अनुदान वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू असून मार्च अखेरपर्यंत सव्वा दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. राज्यात सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी अवजारे खरेदीसाठी अर्ज दाखल केले असले तरी छाननी, पूर्वसंमतीनंतर प्रत्यक्षात अवजारे खरेदी करून बिले सादर करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ ३० ते ३५ हजार (जेमतेम १२ टक्के) आहे. तेवढेच शेतकरी अनुदानास पात्रही ठरण्याचा अंदाज आहे. गंभीर बाब म्हणजे मागासवर्गीय गटात अपेक्षित लाभार्थी मिळत नसल्याने त्यांच्या वाट्याचे किमान ५० कोटी यंदा वाटपच होणार नसल्याचाही अंदाज व्यक्त केला जातोय. पूर्वमशागतीपासून ते शेतमालाची काढणी मळणीपर्यंतची बहुतांश कामे आज आधुनिक यंत्रे-अवजारांच्या साह्यानेच केली जात आहेत. परंतु, शेतीत वापरातील यंत्रे-अवजारे ट्रॅक्टरचलित असल्याने ती महागडे आहेत. बहुतांश शेतकरी अशी यंत्रे-अवजारे विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना यंत्रे-अवजारे भाडेतत्त्वावर घेऊनच कामे करून घ्यावी लागतात. यातून यांत्रिकीकरणाचा मूळ उद्देश साध्य होत नाही.

कृषी यांत्रिकीकरण हे मजुरांच्या टंचाईवर, वाढत्या मजुरी दरावर मात करण्यासाठी तर गरजेचेच आहे. परंतु, यांत्रिकीकरणामुळे निविष्ठांचा कार्यक्षम वापर होतो, शेतीची कामे वेळेवर पूर्ण होतात, शेतीतील कष्ट कमी होऊन उत्पादन खर्चातही घट होते. असे असले तरी देशात हवामान, जमिनीचा प्रकार, जमीन धारण क्षमता, पीक व भौगोलिक विविधता आणि स्थानिक गरजेनुसार यंत्रे-अवजारांची निर्मिती झाली नाही. कृषी अवजारांच्या संशोधनाला अजूनही प्राथमिकता नाही. जे काही अल्प संशोधन झाले त्याचे व्यापारीकरण झाले नाही. काही शेतकऱ्यांनी आपल्या गरजेनुसार यंत्रे-अवजारे विकसित केली, त्यांचा प्रसार इतर शेतकऱ्यांमध्ये झाला नाही. अशा अनेक कारणांनी यांत्रिकीकरणाच्या बाबतीत आपण बरेच मागे आहोत. राज्यातील अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या छोट्या-छोट्या अवजारांची अजूनही मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. लहान शेतकऱ्यांना उपयुक्‍त काही यंत्रे-अवजारे उपलब्ध आहेत. अशी यंत्रे-अवजारे अनुदानात वाटपाच्या कृषी, समाजकल्याण विभागांच्या योजनादेखील आहेत. परंतु, या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोचलेल्या नाहीत. अशा योजनांमध्ये सातत्याने गैरप्रकारही होत आलेले आहेत. विशेष म्हणजे अवजारे अनुदानासाठीच्या निधीची तरतूदही खूपच कमी असते. त्यामुळे अशी यंत्रे-अवजारे शेतकऱ्यांपर्यंत पोचतच नाहीत, हे वास्तव आहे.

राज्यात कृषी यांत्रिकीकरण गतिमान करण्यासाठी संशोधनावर भर द्यावा लागेल. यात झालेल्या संशोधनाचे तत्काळ व्यापारीकरण करून नवीन यंत्रे-अवजारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी संशोधनात उद्योजकांनाही सहभागी करून घ्यावे लागेल. कृषी यंत्रे-अवजारेनिर्मितीसाठी पूरक धोरण राबविण्याचीही गरज आहे. यंत्रे-अवजारांची गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी. शासनाच्या अनुदानाच्या योजनेत कोणतीही यंत्रे-अवजारे शेतकऱ्यांवर थोपविण्यापेक्षा त्यांना गरजेनुसार निवड करण्याची मुभा असावी. अवजारे अनुदान वाटपाचा लाभ गरजवंत सर्वच शेतकऱ्यांना मिळायला हवा. त्याकरिता यांत्रिकीकरणाच्या निधीत वाढ करायला हवी. मागासवर्गीय शेतकऱ्यांना अनुदानात अवजारे वाटली जातात. परंतु, हे काम करणाऱ्या समाजकल्याण विभागाला याबाबत धड काहीही माहिती नाही, हे नुकतेच ॲग्रोवनने दाखवून दिले. त्यामुळे त्यांना पुरेसे लाभार्थी मिळणार तरी कसे, हा प्रश्न आहे. शेती, अवजारे याबाबत धड माहिती नसणाऱ्या समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीयांना अवजारेवाटपाचे काम काढून घेण्याचा विचारही शासन पातळीवर व्हायला हवा. हे काम स्वतंत्र यंत्रणा असणाऱ्या कृषी विभागाला देऊन ते अधिक पारदर्शीपणे कसे होईल, हेही पाहावे.

 

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...