agriculture news in marathi, agrowon agralekh on research on strawberry | Agrowon

संशोधनातून करा स्ट्रॉबेरीचा विकास
विजय सुकळकर
शुक्रवार, 15 मार्च 2019

स्ट्रॉबेरीची शेती हा काटेकोर शेतीचा आदर्श नमुनाच म्हणावा लागेल. असे असले तरी बदलते हवामान आणि विक्री व्यवस्थेत मात्र या फळपिकाला संशोधन आणि शासनाचे पाठबळ मिळण्याची गरज आहे.

सध्या स्ट्रॉबेरी हंगामातील तिसरा बहर सुरू आहे. अजून एक शेवटचा बहर येऊन तो मे महिन्यापर्यंत चालेल. मागील महत्त्वाचा असा बहर अतिथंडी आणि पिकावर जमलेल्या हिमकणांनी जवळपास हातचा गेला. त्याचा चांगलाच फटका स्ट्रॉबेरी उत्पादकांना बसला आहे. हा अपवाद वगळता या वर्षीचा आत्तापर्यंतचा स्ट्रॉबेरी हंगाम समाधानकारक राहिला आहे. सुरवातीला स्ट्रॉबेरीला दर चांगला मिळाला. शेवटच्या बहराच्या वेळी उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असते. त्या वेळी महाबळेश्वर, पाचगणीला पर्यटकांची गर्दीही वाढलेली असते. त्यामुळे स्थानिक विक्री वाढून उर्वरित माल प्रक्रियेसाठी जातो. त्या वेळीही दर चांगलेच मिळतील, असा उत्पादकांचा अनुभव आहे. पाचगणी, महाबळेश्वर ही राज्यातील थंड हवेची ठिकाणे जगभर प्रसिद्ध आहेत. येथील डोंगर उतारावरील निचऱ्याची जमीन तसेच सप्टेंबरनंतरचे स्वच्छ निरभ्र आकाश, थंड कोरडी हवा स्ट्रॉबेरीस पोषक असल्याने या परिसरात स्ट्रॉबेरी उत्तम येते. सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये तसचे राज्यभर थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग झाले, परंतू उत्पादकता आणि दर्जाच्या बाबतीत महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी सर्वोत्तम राहिली आहे. स्ट्रॉबेरीचे मदर प्लॅंट्स अजूनही बाहेरून आयात केले जातात. मदर प्लॅंट्सच्या आयातीपासून ते देशभर फळांची विक्री आणि प्रक्रिया यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांचे एकत्रित प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.

महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात सुमारे साडेतीन हजार एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. याकरिता अमेरिका, इटली, स्पेन या देशांतून दहा लाखांहून अधिक मातृरोपे दरवर्षी आयात केली जातात. दहा लाख मातृरोपांपासून जवळपास पावणेदोन कोटी रोपे तयार केली जातात. मातृरोपांच्या आयातीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीपासून ते पुढे रोपांची वृद्धी आणि वाटप हे काम स्ट्रॉबेरी उत्पादक संघामार्फत केले जाते. स्ट्रॉबेरी लागवडीमध्ये पॉलिथीन आच्छादन, व्हर्टिकल प्लॅंटिंग, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, पीक संरक्षण अशा बहुतांश कामांमध्ये उच्चतम तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. फळांची काढणी, पॅकिंग, ब्रॅंड प्रमोशन, विक्री, प्रक्रिया या कामांमध्येसुद्धा बरीच सुसूत्रता आहे. असे असतानासुद्धा अमेरिका, इस्त्राईल, स्पेन या देशांच्या तुलनेत आपली उत्पादकता फारच कमी आहे. स्ट्रॉबेरी रोपांची आयात हे काम किचकट, वेळखाऊ आणि खर्चिक आहे. बदलत्या हवामान काळात रोपांच्या वृद्धीतही अनेक अडचणी येत आहेत. अशा वेळी संशोधनातून आपल्याच देशात स्ट्रॉबेरी मातृवृक्षांची निर्मिती व्हायला पाहिजे. इस्त्राईल या वाळवंटी प्रदेशाने त्यांच्या देशास अनुकूल अशी ‘बराक’ ही स्ट्रॉबेरीची जात विकसित केली आहे. इटालियन ‘नाभिला’ जातही उत्पादकता आणि गुणवत्तेच्या दृष्टीने सरस आहे. आपण मात्र याच जातीची आयात करून आपल्याकडे लावतो. आपल्या हवामानास अनुकूल स्ट्रॉबेरीच्या जाती संशोधनातून देशातच विकसित व्हायला पाहिजेत.

स्ट्रॉबेरी हे अत्यंत नाजूक आणि नाशवंत फळपीक आहे. फळांची काढणी करताना फार काळजी घ्यावी लागते. काढलेले फळ त्याच दिवशी बाजारपेठेत गेले पाहिजे. सध्या फळांची काढणी करून स्थानिक टॅक्सी ते विमान वाहतुकीद्वारे देशभर स्ट्रॉबेरी पाठविली जाते. यामध्ये वाहतूक खर्च अधिक होतो. स्ट्रॉबेरीची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी परिसरात चार प्री-कुलिंग युनिट (एक ग्रामपंचायतीचे आणि तीन खासगी) पण आहेत. परंतू या सुविधा पुरेशा नाहीत. स्ट्रॉबेरी काढणीपासून ते ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत ‘कोल्ड चैन विकसित करण्याबाबत शासनाने विचार करायला हवा. तसेच वाहतुकीतील अडसर दूर करून त्यामध्ये उत्पादकांना अनुदान द्यायला हवे. असे झाल्यास दूरच्या बाजारपेठेत स्ट्रॉबेरी पोचेल, त्यास दरही चांगले मिळून उत्पादकांचा अधिक फायदा होईल

इतर संपादकीय
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
समन्यायी जल-व्यवस्थापनाला पर्याय नाही जलव्यवस्थापन हा केव्हापासूनच कळीचा बनलेला प्रश्न...
जलव्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळपेयजल, सिंचन व औद्योगिक पाणी वापर हे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...