agriculture news in marathi agrowon agralekh on ripening of fruits thru calcium carbide | Agrowon

रसाळ गोमट्या फळांसाठी...
विजय सुकळकर
गुरुवार, 10 मे 2018

फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडवर बंदी आहे. अशा वेळी हे घातक रसायन व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतेच कसे, हा खरा प्रश्न आहे.

आंब्यांचा हंगाम चालू आहे. या वर्षी आंब्याला मोहर आल्यापासून ते काढणीपर्यंत सातत्याने ढगाळ वातावरण, तर अधूनमधून अवकाळी पाऊस, गारपीट चालू आहे. त्यामुळे आंब्यासह इतरही फळांचे उत्पादन घटले आहे. आंब्यांचे उत्पादन कमी असताना उत्पादकांना दर चांगले मिळणे अपेक्षित आहे. परंतु काही ठिकाणी अपप्रचार तर काही ठिकाणी आंबे पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर, अशा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, तर उत्पादकांना दराचा फटका बसत आहे. मुंबईतील व्यापाऱ्यांकडून आंबा पिकविण्यासाठी इथिलिनचा वापर केला जात असून, असे आंबे आरोग्यास घातक असल्याचा अपप्रचार सुरू आहे. तर राज्याच्या काही भागांत आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड (कार्पेट) वापरले असल्याने पोलिसांनी टाकलेल्या धाडीतून पुढे आले आहे. चिकूची खरेदी करताना माझ्यासमोर व्यापाऱ्याने त्यातून कार्पेट काढले, अशी प्रतिक्रिया ॲग्रोवनच्या ग्रुपवर एका शेतकरी ग्राहकाने टाकली आहे. यावरून विषयाचे गांभीर्य आपल्या लक्षात यायला हवे.  

आंबा, केळी, पपई, चिकू आदी फळांना पिकविण्यासाठी घातक कॅल्शियम कार्बाईडचा वापर व्यापारी सर्रासपणे करतात. एफडीएच्या कारवाईत अशी फळे आणि कॅल्शियम कार्बाईड दरवर्षीच मोठ्या प्रमाणात जप्त केले जाते. काही व्यापाऱ्यांवर कारवाईदेखील होते. परंतु ‘फूड सेफ्टी ॲँड स्टॅंडर्ड ॲक्ट’नुसार फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडवर बंदी आहे. अशा वेळी हे रसायन व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्धच कसे होते, हा खरा प्रश्न आहे. याचा अर्थ आपल्या देशात कायदे, नियमांना धाब्यावर बसवून सर्वसामान्यांच्या जीवनाशी खेळले जाते, अन शासन-प्रशासनाला याबाबत काहीही पडलेले नाही, असेच दिसून येते. कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेल्या फळांना नैसर्गिक स्वाद लाभत नाही. अशी फळे खाण्यात आली तर उलट्या, मळमळीपासून कॅन्सरपर्यंतच्या आजाराचा धोका आहे. त्यामुळे फळे पिकविण्यासाठी हे रसायन व्यापाऱ्यांना उपलब्धच होता कामा नये, ही काळजी घ्यावी लागेल. तसेच काही नफेखोर व्यापाऱ्यांकडून याचा वापर होत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कडक कारवाई व्हायला हवी.

इथिलिन गॅसद्वारे फळे नैसर्गिकरीत्या पिकविली जातात. इथिलिन वापराचे मानवी आरोग्यावर काहीही दुष्परिणाम नाहीत. इथिलिन वापरून फळे पिकविण्याच्या सुरक्षित आणि स्वस्त पद्धतीदेखील विकसित करण्यात आलेल्या आहेत. परंतु याबाबत शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रबोधन नाही. प्रबोधन असले तरी अशा पद्धती वापरणे त्यांना खर्चिक आणि अवघड वाटते. शिवाय बाजार समित्यांच्या आवारात फळे पिकविण्यासाठी घातक रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असताना इथिलिन गॅसवर आधारित सुरक्षित रायपनिंग चेंबर्सची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बाजार समित्यांनी विचार करायला हवा. फळांच्या व्यापारावर दररोज लाखो रुपये कमावणाऱ्या व्यापाऱ्यांनीसुद्धा ५ ते १५ टनांपर्यंतचे इथिलिन गॅस चेंबर्स स्वर्चाने उभारायला हवेत. लहान शेतकरी तसेच छोट्या व्यापाऱ्यास उपयुक्त असे अत्यंत कमी खर्चाचे रायपनिंग चेंबर्स संशोधन संस्थांनी विकसित केले आहेत. त्याचा वापर वाढायला हवा. कॅल्शियम कार्बाईडला पूर्ण प्रतिबंध आणि इथिलिन गॅस आधारित रायपनिंग चेंबर्सला प्राधान्य यातून नैसर्गिकरित्या पिकलेल्या आणि मुख्य म्हणजे आरोग्यदायी फळांचा स्वाद ग्राहकांना चाखता येईल.

इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...
शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी...पुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या...
शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार... मुंबई : शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा...
सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी :...नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६...
अविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले...जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व...
शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी...जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध...