फूल गुलाब का...

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उत्पादक गुलाबासह इतरही फुलांचे निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेतात. परंतु अशा फुलांची शेतकऱ्यांकडूनच निर्यात व्हावी, याकरिता शासन पातळीवर काहीही प्रयत्न होत नाहीत.
संपादकीय
संपादकीय

व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच निर्यातदारांसाठी सुगीचा काळच मानला जातो. व्हॅलेंटाइनला जगभरातून खासकरून लाल गुलाबाची मागणी वाढते, दरही वर्षभर सरासरीच्या जवळपास दुप्पट मिळतात. त्यामुळे गुलाब उत्पादकांचे विशेष लक्ष व्हॅलेंटाइन डेवर असते. या दिवसाकरिता अधिकाधिक आणि दर्जेदार गुलाब फुलांचे उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन दोन-तीन महिने आधीपासूनच सुरू होते. व्हॅलेंटाइन डेसाठी राज्यातून गुलाब फुलांची निर्यात २६ जानेवारीपासून सुरू होऊन ती ८ ते ९ फेब्रुवारीपर्यंत चालते. फ्लोरीकल्चर पार्क, तळेगाव दाभाडे (पुणे) येथून व्हॅलेंटाइन डेसाठी एक कोटी गुलाब फुलांच्या निर्यातीचे नियोजन असते. यात काही अडचणी आल्या नाही, तर तेवढी फुलं निर्यात होतातही. परंतु या वर्षी मागील दोन महिन्यांपासून तापमानात होत असलेल्या चढ-उताराने निर्यातक्षम गुलाब उत्पादनास फटका बसला आहे. २६ जानेवारीपासून सातत्याने ढगाळ वातावरणाबरोबर आलेल्या शीत लहरीने यंदा निर्यातक्षम गुलाब फुलांचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे पुणे येथील फ्लोरीकल्चर पार्कमधून केवळ ४० लाख गुलाब फुलांचीच निर्यात झाली आहे.

देशात साजरे होणारे सण-उत्सव, लग्न समारंभ यामुळे गुलाबासह सर्वच फुलांना वर्षभर चांगली मागणी असते. तसेच नाताळ, व्हॅलेंटाइन डे अशा वेळी फुलांची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते. फूल उत्पादक प्रतिकूल परिस्थितीमध्ये गुलाबासह इतरही फुलांचे निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेतात. परंतु फुलांची निर्यात प्रामुख्याने व्यापाऱ्यांमार्फतच होते. अशा निर्यातीमध्ये उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. निर्यातीच्या फुलांना शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि निर्यातीनंतर मिळणारा दर यात मोठी तफावत असते. व्हॅलेंटाइन डेसारखा काळ सोडला तर व्यापारी अत्यंत चालाखीने देशांतर्गत फुलांच्या दराच्या तुलनेत एक-दोन रुपयेच अधिक दर निर्यातक्षम फुलांना देतात. या वर्षी व्हॅलेंटाइन डेला व्यापाऱ्यांनी प्रति गुलाब १२ रुपये दर उत्पादकांना दिला असला तरी, तिकडे त्यास ३५ ते ४० रुपये दर मिळतो. एवढी त्यांचे मार्जिन असते. उत्पादकांनी फुलांची निर्यात करायचे म्हणजे देशनिहाय दर्जा, निर्यातीबाबतचे नियम, अटी, परवाने याबाबत शेतकऱ्यांना माहिती नसते. निर्यातीमध्ये आपला ग्राहक कोण, दर काय मिळेल, माल नाकारला गेला, तिकडील व्यापाऱ्याने पैसे बुडविले तर काय करायचे या सर्व बाबतीतही शेतकरी अनभिज्ञ असतो. दुर्दैवाची बाब म्हणजे फुलांची शेतकऱ्यांद्वारे निर्यात वाढविण्यासाठी पणन विभाग, शासन पातळीवर काहीही प्रयत्न होताना दिसत नाहीत. फुलांची शेतकऱ्यांद्वारे निर्यात वाढविण्यासाठी त्यांचे गट-समूह करून त्यांना निर्यातीबाबत प्रशिक्षण देण्याबरोबर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा शासनाने पुरवायला हव्यात. 

निर्यातक्षम फुलांचे अधिक उत्पादन ज्या-ज्या भागांत होते, तेथेच अशा फुलांचे कलेक्शन तसेच ऑक्शन (लिलाव) सेंटर्स सुरू व्हायला हवेत. तळेगाव दाभाडेला फ्लोरीकल्चर पार्क होताना एमआयडीसीचे फूल कलेक्शन सेंटर देऊ असे मान्य केले होते. पुढे पणन मंडळाने तिथे कलेक्शन सेंटर सुरु केले मात्र फुलांचे ऑक्शन तिथे होत नाही. त्यामुळे फूल उत्पादकांना याचा फारसा फायदा होत नाही. गोरेगावला (मुंबई) पणन मंडळाचे फुलांचे ऑक्शन सेंटर आहे. त्यावर जवळपास २५ ते ३० कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु त्यात फुलांचा दर्जा, बाजारमूल्य समजणारे तज्ज्ञ घेतले गेले नव्हते. तसेच बहुतांश दादरला राहणारे फुलांचे व्यापारी गोरेगावला जाऊन लिलावात भाग घ्यायला तयार नसल्यामुळे ते ऑक्शन सेंटर कार्यान्वित होऊ शकले नाही. पुण्याचे फूल उत्पादक तसेच व्यापारी तिथे आपला माल पाठवू लागले. परंतु पुढे दादरच्या मार्केटपेक्षा त्यात कमी दर मिळू लागल्याने त्यांनीही आता तेथे फुले पाठविणे बंद केले आहे. विभागनिहाय फुलांचे ऑक्शन सेंटर्स सुरू करण्याचे शासनाने भविष्यात ठरविलेच तर त्यांचे असे होणार नाही, याची काळजीही घ्यावी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com