agriculture news in marathi, agrowon agralekh on thunder storm | Agrowon

वीज पडून जाणारे जीव वाचवा
विजय सुकळकर
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

मागील दशकभराचा आढावा घेतला, तर दरवर्षी राज्यात १०० हून अधिक जण वीज पडून मृत्यू पावत आहेत. त्यात शेतकरी-शेतमजुरांची संख्या अधिक आहे.

मागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर सध्याही चालूच आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाचे दोन मोठे खंड अन् दोनदा झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान केले. त्यानंतर ऑक्टोबरपासून वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस, थंडीच्या लहरी, गारपीट ह्या आपत्ती थांबायचे नाव घेत नाहीत. सध्या सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट यासह पावसाने राज्यात थैमान घातले आहे. या वादळी पावसाने रब्बी तसेच उन्हाळी पिके, फळ-भाजीपाला पिके यांच्या नुकसानीबरोबर शेडनेट, पॉलिहाउसेस, जनावरांचे गोठे, शेतघरे यांना उध्वस्त केले आहे. शासनाच्या लेखी अजूनही दुष्काळ, महापूर याच नैसर्गिक आपत्ती आहेत. त्यांचेही व्यवस्थापन नीट नाही. त्यातच मागील दशकभरापासून अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट, उष्ण-शीत लहरी, वीज पडणे या नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून पिकांसह जीवित-वित्त हानी वाढत असताना त्याची फारशी दखल घेतली जात नाही. सध्या वादळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली असताना त्याची पाहणी करण्यासाठी शासकीय यंत्रणेतील कोणीही तिकडे फिरकायला तयार नाही. राज्यात मागील ऑक्टोबरपासून चालू असलेल्या अस्मानी कहरात नुकसान झालेल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन वास्तववादी पंचनामे करायला हवेत. तसेच या नैसर्गिक आपत्तींमध्ये शासकीय निकषांनुसार तुटपूंजी मदत नको, तर झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात योग्य तो मोबदला मिळायला हवा.

राज्यात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मागील दशकभराचा आढावा घेतला तर दरवर्षी राज्यात १०० हून अधिक जण वीज पडून मृत्यू पावत आहेत. त्यात शेतकरी-शेतमजुरांची संख्या अधिक आहे. वीज पडून जीव गमवाव्या लागणाऱ्या पशुधनाचा आकडाही वाढतच चालला आहे. राज्य शासनाने २०१५ मध्ये वीज पडून मृत पावलेल्यांच्या वारसास मिळणारी मदत एक लाखाहून चार लाख केली. मृत पशुधनाच्या मालकास मिळणारी मदतही १० हजारांहून ३० हजार केली. तसेच जखमीलाही उपचारासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. परंतु २०१७ पर्यंत वीज पडणे ही घटना नैसर्गिक आपत्ती समजलीच जात नव्हती. त्यामुळे मृत व्यक्तीचा वारस, जखमी व्यक्ती आणि पशुधन मालक मदतीपासून वंचित राहत होते. दोन वर्षांपूर्वी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरनाने वीज पडणे नैसर्गिक आपत्ती घोषित केले अाहे. असे असले तरी सध्या अनेक जणांना अपेक्षित मदत, योग्य वेळेत मिळत नाही.

खरे तर वीज कोसळून झालेल्या जीवित-वित्त हानीनंतर मदत करण्यापेक्षा अशी हानी टाळणे, कमी करणे अधिक लाभदायक ठरू शकते. अनेक प्रगत देशांनी ढग आणि विजांचा सखोल अभ्यास करून वीज कुठे, कधी पडणार हे त्या भागातील लोकांना सांगून यात बळी जाणाऱ्यांचे प्रमाण कमी केले आहे. विलासराव देशमुख विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री असताना त्यांनी अशी सेवा आपल्याकडे सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आपल्या राज्यात खासकरून मराठवाडा विभागात परभणी आणि बीड येथे वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारी सेन्सॉर प्रणाली २०१४ मध्ये बसविण्यात आली होती. तसेच २०१७ मध्ये वीज पडण्याच्या २४ तास आधी त्याची पूर्वसूचना मिळेल असे मॉडेल विकसित केले जात आहे, असे हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी स्पष्ट केले होते. परवाचा हवामान अंदाज देतानाही त्यांनी यावर्षी पासून वीज पडण्याचा इशारा देण्यात येईल, असे सांगितले आहे. परंतु, पाच वर्षांपूर्वी राज्यात बसविण्यात आलेली सेन्सॉर प्रणाली आणि विजेबाबत पूर्वसूचनेचे मॉडेल अजूनही नीट काम करताना दिसत नाही. विजांचा सखोल अभ्यास करून ती पडण्याबाबतचा अचूक अंदाज लोकांपर्यंत पोचविण्याचे काम शासनासह यात काम करणाऱ्या संस्थांनी अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. 

इतर संपादकीय
आगीपासून वन वाचविण्याचा करूया निर्धारजंगलातील वाळलेला पालापाचोळा हा ज्वलनशील पदार्थ...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
कृषी पतपुरवठ्याची घडी बसवा नीटराज्यातील सहकाराचा कणा राज्य बॅंकेला मानले जाते....
व्यापक जनहितालाच हवे नव्या सरकारचे...आता साऱ्या देशाचे लक्ष १७ व्या लोकसभा निवडणूक...
व्यंकट अय्यरची कहाणीशेतीतील वाढत्या समस्यांना तोंड देत उत्पादन...
जललेखा अहवाल : अर्धवट आणि अवास्तवहीथेंब थेब पाण्याचा हिशेब लागावा, असा आग्रह सध्या...
कृषी पर्यटनाला संधी अमर्यादकृषी पर्यटन अर्थात ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ हे ग्रामीण...
घातक किडींविरुद्ध लढा एकत्रको ल्हापूर जिल्ह्यात या वर्षीपासून कृषी विभाग व...
मुक्त शिक्षण एक मंथनयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पीएच.डी. ‘...
प्रशासनाच्या हलगर्जीपणाने केले अनेकांचे...एकीकडे आम्ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे...
तंत्रज्ञानाचे ‘भरीत’ किती दिवस? हरियाना राज्यात अवैध बीटी वांग्याची लागवड नुकतीच...
अशी ही (आर्थिक) बनवाबनवी!लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात...
भूलभुलैया नव्हे तर शेतकऱ्यांचा दीपस्तंभडॉ. अंकुश चोरमुले यांनी ॲग्रोवनच्या ५ मे २०१९...
सहकारच्या नैतिक मूल्यांचे अधःपतनसहकारी चळवळीने भारतातील खेड्यापाड्यांतील...
पेच पूर्वहंगामीचाराज्यात दरवर्षी जवळपास ४० लाख हेक्टर क्षेत्रावर...
आजच्या दुष्काळात आठवतात सुधाकरराव नाईकमहाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून...
सावधान! वणवा पेटतोय...चा र दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मानूर-...