तूर घ्या तूर, मोझांबिकची तूर!

तिरपागड्या सरकारी धोरणांमुळे देशातील शेती आणि शेतकऱ्याची माती होत आहे, पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे?
sampadkiya
sampadkiya

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे पर्व संपताच काही काळ रोखून धरलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटाका फोडला गेला. याच काळात पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर साखर आयात करण्यात आल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात गरमागरमी सुरू झाली. ही आयात अल्प असल्याचे आणि तिचा देशांतर्गत साखरेच्या दरावर फारसा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या चर्चेला काहीसा विराम मिळाला. मतदान संपल्याचा मुहूर्त गाठून केंद्रातील परकीय व्यापार महासंचालनालयाने देशाच्या कृषी क्षेत्रात आणखी एक बाँब फोडला. मोझांबिक या आफ्रिकी देशातून तब्बल १५ लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्ये आयात करण्यास परवानगी देणारे पत्र या खात्याच्या एका बाबूने जारी केले आहे. सरकारची आकलनशक्तीच कमी आहे की यांना शेतकरीच संपवायचा आहे, असा प्रश्न शेती क्षेत्रातून अलीकडे विचारला जात आहे आणि तो चुकीचा आहे असे सरकारचे आजवरचे शेती क्षेत्राबाबतचे वर्तन-व्यवहार पाहता म्हणता येणार नाही. निर्णय घ्यायला उशीर लावून किंवा चुकीचे निर्णय घेऊन शेती क्षेत्राचे पुरते मातेरे केले जात आहे. ऊस आणि दूध महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील भरवशाची उत्पादनं मानली जातात. जादा उत्पादनामुळे यंदा कधी नव्हे ते या दोन्ही उत्पादनांचे दर एकदमच ढासळले आहेत. या वर्षी कारखान्यांनी उसाला तुलनेने बरे दर दिले असले, तरी पुढच्या वर्षी साखरेचे उत्पादन आणखी वाढणार असल्याने पेचप्रसंग खूपच गंभीर होणार आहे. उसाला आणि जोडधंदा म्हणून शेतकऱ्याचा संसार चालवणाऱ्या भरवशाच्या दूध व्यवसायाला उतरती कळा लागल्याने शेती क्षेत्रावर अक्षरशः अवकळा पसरली आहे. या दोन्ही विषयांत सरकारने वेळीच हस्तक्षेप करून काही पूरक निर्णय घेतले असते तर परिस्थिती थोडी सुधारली असती. केंद्र आणि राज्याच्या पातळीवर यांबाबत भरीव असे काही झालेच नाही.   

कोरडवाहू पिकांची स्थिती तर आणखीच वाईट आहे. राज्यात तब्बल ४० लाख हेक्टरवर होणाऱ्या कापसाची आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या खरिपात बोंड अळीमुळे वाताहत झाली. सोयाबीनलाही चांगला दर मिळाला नाही. तूर आणि हरभऱ्याचे वारेमाप उत्पादन झाल्याने त्याचे दर पडले. तूर, हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्याची गर्जना सरकारने केली असली, तरी सरकारी खरेदी यंत्रणेने या निर्णयाची पुरती वाट लावली आहे. सगळ्या शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळण्याची अजिबातच शक्यता नाही. लाखो क्विंटल तूर आणि हरभरा शेतकऱ्यांच्या घरात आणि सरकारी खरेदी केंद्रांवर खरेदीअभावी पडून आहे. त्याचे काय करायचे, शेतकऱ्याने वर्षभर संसार कसा चालवायचा असे अनेक प्रश्न आ वासून उभे असताना आता दिल्लीश्वर मोझांबिकमधून तुरीसह काही कडधान्ये आयात करणार असल्याची ‘सुवार्ता‘ येऊन धडकली आहे. कदाचित भारतीय शेतकऱ्यांपेक्षा मोझांबिकचे शेतकरी अधिक अडचणीत असावेत आणि विश्वकल्याणार्थ जगभ्रमंती करणाऱ्या आपल्या पंतप्रधानांना त्यांचा जास्तच कळवळा आला असावा, असे मानायला वाव आहे. दिल्लीत कार्यरत असणाऱ्या आयात लाॅबीचा असे शेखचिल्ली निर्णय घेण्यात मोठा वाटा असतो हे उघड गुपित आहे. खनिज तेले, खाद्यतेले, साखर, सोयाबीन आदींच्या आयातीत ही लॉबी सक्रिय असते, सारी यंत्रणा या लॉबीच्या खिशात असते, अशा चर्चा खासगीत झडतात. त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत कोणातच नसते. अशा तिरपागड्या धोरणांमुळे देशातील शेती आणि शेतकऱ्याची माती होत आहे, पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे? शांतता, सध्या राजकीय रंगमंचावर कर्नाटकाचे नाट्य रंगात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com