जल‘मुक्त’ शिवार

दोन कोरड्या नद्या अथवा धरणे जोडण्याचा संकल्प करून मुख्यमंत्री अजून पाच वर्षे जलमय मराठवाड्याचे केवळ स्वप्न या भागातील शेतकरी आणि जनतेला दाखवित आहेत.
संपादकीय
संपादकीय

वॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेणार आणि या दोन्हींच्या माध्यमातून या विभागाला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प युती शासनाने केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. सध्या लोकसभेची रणधुमाळी देशभर सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षसुद्धा अनेक आश्वासने जनतेला देत आहेत. मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील भाजप-युतीच्या विभागीय मेळाव्यात मराठवाड्याला दुष्काळमुक्त करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. खरे तर देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये राज्यातील सत्तेची सुत्रे हाती घेतल्यावर मराठवाडाच नाहीतर राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले होते. मृद-जल संधारण, पाणी व्यवस्थापनाच्या अनेक योजना, कामे एकत्र करून या महत्त्वाकांक्षी अभियानाने राज्य जलमय होईल, अशी स्वप्ने जनतेला दाखविण्यात आली होती. आता पाच वर्षांनंतर हे अभियान यशस्वी झाल्याचा दावाही राज्य शासन करते आहे. परंतु, यावर्षीच्या दुष्काळाच्या झळा पाहता जलयुक्त शिवार अभियान राज्यात सपशेल अयशस्वी ठरले आहे, हेच सिद्ध होते. हे अभियान खरोखरच यशस्वी झाले तर मग मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी आता नदी-जोड, धरण-जोड (वॉटर ग्रीड) अशा प्रकल्पांची शासनाला गरज का वाटते आहे? हे सर्वांना कळायला  हवे.    एका भागातले पाणी दुसऱ्या भागात नेणे (वॉटर ग्रीड) हा खरे तर जलसंकट दूर करण्यासाठीचा इस्त्रायली उपाय आहे. इस्त्राईलमध्ये  सी ऑफ गॅलिली या एकमेव नैसर्गिक साठ्याच्या माध्यमातून उत्तरेत पाणी उपलब्ध असून दक्षिणेकडे खाली सर्व वाळवंट आहे. उत्तरेतील पाणी दक्षिण टोकापर्यंत नेणे हा त्यांच्याकडे एकमेव पर्याय होता आणि त्यासाठी त्यांना वॉटर ग्रीड करावी लागली. इस्त्राईलने तांत्रिक कसब आणि सचोटी पणाला लावून उत्तम वॉटरग्रीड केले. मराठवाडा विभागात नैसर्गिक पाणी साठे नाहीत. बारमाही वाहणारी एकही नदी नाही. भूगर्भात खोलवर पाणी नाही. सर्व मोठ्या नद्यांवर धरणे आहेत. पण ते कायम तळ गाठून असतात. अशावेळी बेभरवशाचे पाणी साठे एकमेकांना जोडून पाणी प्रश्न सुटणार आहे का? याचा विचार शासन पातळीवर झालेला दिसत नाही. दोन कोरड्या नद्या अथवा धरणे जोडण्याचा संकल्प करून अजून पाच वर्षे जलमय मराठवाड्याचे केवळ स्वप्न या भागातील शेतकरी आणि जनतेला मुख्यमंत्री दाखवत आहेत. मराठवाड्याच्या वॉटर ग्रीडमध्ये सोलापूर, नाशिक, नगर वरून पाणी आणण्याचे नियोजित आहे. पाण्यासाठी आत्ताच भांडण-तंटे सुरू आहेत. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिष्य वाढत जाणार आहे. अशावेळी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून जलसंघर्ष वाढतच जाईल, हेही लक्षात घ्यायला हवे.

एवढ्या सर्व दिव्यातून शासनाने वॉटर ग्रीड करायचे ठरविले आणि आपण तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलो तरी आपली यंत्रणा भ्रष्ट आहे. गंभीर बाब म्हणजे जल व्यवस्थापनेत देखभाल दुरुस्तीत आपण फारच कच्चे आहोत. त्यामुळे अशा प्रकल्पांवर झालेला खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी वॉटर ग्रीडबाबतच्या घोषणा आणि संकल्पच चालू आहे. परंतु, शेती-पिण्यासाठी बाहेरून पाणी आणण्याची ही योजना यशस्वी झाली तर गावात विविध उपचारांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या पाण्याचे काय करायचे? ही समस्याही उद्भवणार आहे. मराठवाड्याचा काही भाग सोडला तर पाऊसमान बऱ्यापैकी आहे. भूस्तरात पाणी बऱ्यापैकी झिरपते, साठवूनही राहू शकते. अशावेळी मृद-जलसंधारणाच्या कामातून केलेले नैसर्गिक पुनर्भरण आणि शक्य तिथे साठवण तळे -तलाव-बंधारे यांच्या माध्यमातून मराठवाडा जलयुक्त होऊ शकतो. अशा माध्यमातून उपलब्ध पाण्याच्या काटेकोर व्यवस्थापनातून या भागातील पाणीटंचाई कायम मिटू शकते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com