पाणी वाटपाची ‘नीती’

पाण्याबाबत स्पर्धा वाढत असल्याने जिकडून जास्त पैसा मिळेल, तिकडे पाणी वळविण्याचे धोरण असेल. या दिशेने आता शासनही पावले उचलत असल्याचे निती आयोगाच्या अहवालातून स्पष्ट होते.
संपादकीय
संपादकीय

शेती, उद्योग, घरगुती वापर अशा क्षेत्रांतून पाण्याची मागणी वाढतेय तर उपलब्धता कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्याबाबत स्पर्धा वाढत असल्याने जिकडून जास्त पैसा मिळेल, तिकडे पाणी वळविण्याचे धोरण असेल. या दिशेने आता शासनही पावले उचलत असल्याचे निती आयोगाच्या अहवालातून स्पष्ट होते. काही जलतज्ज्ञ तर वाढती पाणीटंचाई आणि भविष्यातील मागणी पाहता येथून पुढे शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले तर ते अभावानेच होईल, असे भाकीत करीत असून त्यात तथ्यही वाटते. भविष्यात पाणीटंचाईचे वाढते संकट, त्यामुळे विकासदरात होणारी घट, पाण्याची गुणवत्ता, दूषित पाण्याचे वाढते प्रमाण, अशुद्ध पाण्यामुळे दरवर्षी लाखो लोकांचा होत असलेला मृत्यू याबाबत निती आयोगाकडून आलेले आकडे धक्कादायक आहेत. २०३० पर्यंत देशात पाण्याची मागणी आत्ताच्या दुप्पट होऊन भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, ही समस्या कमी करण्यासाठी शेतीसाठीचा पाणी वापर कमी करण्याची गरज निती आयोगाला वाटते. 

एकूण उपलब्ध पाण्यात शेतीसाठी वापराचा टक्का अधिक आहे. सिंचनासाठी वापरात येणाऱ्या पाण्याची उत्पादकताही अत्यंत कमी आहे. विशेष म्हणजे बागायती क्षेत्र अन् पिकाच्या उत्पादकतेलाही धक्का लागू न देता शेतीसाठीच्या पाण्याचा वापर कमी करता येऊ शकतो. त्यासाठी शेतीच्या पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविण्याची गरज आहे. सूक्ष्म सिंचनाद्वारे निम्म्याने पाणीबचत होते, पिकांची उत्पादकता आणि दर्जाही वाढतो. येथून पुढे तरी पीक कोणतेही असो शेतीसाठी पाणी वापरावयाचे म्हणजे ते सूक्ष्म सिंचन पद्धतीनेच असा निर्धार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. शासनानेही याबाबतच्या योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. सध्या प्रतिएकर अथवा हेक्टर पिकाची उत्पादकता मोजली जाते. यापुढे आपल्याला पिकाला लागणाऱ्या पाण्यावर उत्पादकता मोजावी लागेल. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या अनेक देशांत अधिक पाणी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन न घेता ती आयात करण्यावर भर दिला जातो. हे धोरण आपल्यालाही राबवावे लागेल. 

अनियमित पाऊसमान, त्याचे भूगर्भात मुरण्याचे घटलेले प्रमाण, जलसाठ्यांची कमी झालेली साठवणक्षमता, उष्णतेमुळे वाढलेले बाष्पीभवन हे पाहता सर्वांनी जलसंवर्धनही गांभीर्याने घ्यायला हवे. महत्त्वाचे म्हणजे भूगर्भाचा अनियंत्रित उपसा चालू असताना पुनर्भरणाचे कोणीही मनावर घेत नाही. पाण्याची होत असलेली गळती कमी केली तर पाण्याबाबतच्या सध्याच्या समस्या निम्म्याने कमी होतील. पाणीगळती कमी करण्यासाठी तूर्त कालवे, चाऱ्यांची दुरुस्ती करून भविष्यात शेतीसाठीचा पाणीपुरवठा हा पाइपने करावा लागेल. वाढत्या पाणी प्रदूषणामुळे पिण्यासाठी तर सोडा शेतीसाठीसुद्धा असे पाणी उपयोगात येत नाही. शहरातील मैलापाणी तसेच अनेक उद्योगाचे दूषित पाणी थेट जलप्रवाहात सोडले जाते. हे कायमचे थांबवावे लागेल. दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उद्योगाकडून पुनर्वापर व्हायला हवा. असे झाले तर त्यांची मागणीही कमी होईल. तसेच जलप्रवाहात येणारे पाणी हे प्रक्रिया करूनच सोडले गेले पाहिजे, ही काळजी पण घ्यावी लागेल. शेतकऱ्यांना पाणी वापराचे धडे देताना शहरी नागरिकांकडून पाण्याच्या होणाऱ्या अतिवापरावर निर्बंध आणावे लागतील. अशा सर्व स्तरांवरील प्रयत्नांतूनच पाण्याची भविष्यातील मागणी आणि उपलब्धता यात समन्वय साधू शकू; अन्यथा पाणीटंचाईची दाहकता वाढेल, पाण्याबाबत सध्या चालू असलेल्या वादाचे रूपांतर संघर्षात होईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com