शेतीआधारित उद्योगनिर्मितीचे बारामती कृषी महाविद्यालयात केंद्र

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बारामती, जि. पुणे : केंद्रीय निती आयोगाने ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी व स्वच्छतेत जागतिक दर्जाची गुणवत्ता आणण्यासाठी देशभरात ७२ संस्थांना अटल इनक्युबेशन सेंटर्स उभारण्यास मंजुरी दिली. देशात शेतीसाठी दोनच संस्थांना मंजुरी दिली, असून त्यात बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयाचा समावेश आहे. या महाविद्यालयात शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान उद्योगामध्ये रुपांतरीत करणारे जागतिक दर्जाचे हे केंद्र बनेल.

निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनमार्फत २०१७-१८ या वर्षात भारतात उभारण्यात येणाऱ्या अटल इनक्युबेशन सेंटर्सची घोषणा शुक्रवारी (ता.४) कार्यकारी संचालक रमणन रामानाथन यांनी केली. यामध्ये महाराष्ट्रातील १२ संस्थांचा समावेश आहे. शेती विषयावर मात्र देशात महाविद्यालय म्हणून फक्त बारामतीच्याच कृषी महाविद्यालयाचा समावेश केला असल्याने निती आयोगानेही बारामतीतील शेतीच्या तंत्रज्ञान प्रसाराची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली आहे. यासाठी देशभरातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते.   

या सेंटरमध्ये उद्योजक विद्यार्थ्यांना उद्योगाच्या कल्पना व नवे तंत्रज्ञान सादर करता येतील. यासंदर्भातील व्यवहारीक चाचण्या घेणे आणि प्रत्यक्षात उद्योगात रूपांतर करण्यासाठी हे सेंटर प्रोत्साहन व पाठबळ देणार आहे. त्यांच्याकडील तंत्रज्ञान उद्योगामध्ये परावर्तीत करण्यासाठी कृषी महाविद्यालयातील व जागतिक दर्जाचे इतर तज्ज्ञ मार्गदर्शन व तसे उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन येथे मिळेल. जागतिक दर्जाच्या संशोधन केंद्राशी हे केंद्र संलग्न असेल व जगभरातील शेतीपूरक नव्या तंत्रज्ञानाची देवाणघेवाणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

५ फेब्रुवारी रोजी झाले सादरीकरण निती आयोगाच्या निवड समितीसमोर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी या नियोजित केंद्रासाठी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सादरीकरण केले. आता या नव्या सेंटरमध्ये महाविद्यालयातील प्रा. जया तिवारी, प्रा. सोनाली सस्ते, प्रा. श्रीकांत कर्णेवार, प्रा. अमित काळे, प्रा. दादा पाटील व प्रा. चंद्रशेखर शेंडे हे प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

महाराष्ट्रातील या संस्थांचा आहे समावेश १. कृषी महाविद्यालय बारामती. २. एम.आय.टी.ए.डी.टी. विद्यापीठ पुणे ३. पिनॅकल इंडस्ट्रीज पुणे ४. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ठाणे, ५. अलॅक्रिटी इंडिया पुणे. ६. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे. ७. व्हनजीज टेक्नॉलॉजीज प्रा. लि. नाशिक ८. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च पुणे. ९. अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स प्रा. लि. पुणे. १०. ब्रीक ईगल मुंबई, ११. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, १२. सीटी इन साईन लॉयलिटी मुंबई.

शेतीत उद्योजक निर्मितीसाठी  हे केंद्र आश्वासक ठरेल निती आयोगाने देशातील एकमेव कृषी महाविद्यालयाची दखल घेतली, यामुळे आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. ट्रस्टने नेहमीच शेती व शेतीआधारीत नव्या तंत्रज्ञानासाठी एक पाऊल पुढेच ठेवले. आताही महाविद्यालयात उभारले जाणारे सेंटर शेती व शेतीपूरक व्यवसायात व नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यात तसेच शेतीपूरक व्यवसायाची गुणवत्ता वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आहे. यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू, असे प्रतिक्रिया अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे.

निती आयोगाने या सर्व 

संस्थांना मंजुरी दिली. जागतिक दर्जाच्या भौतिक सुविधा व स्टार्टअप ज्या आपल्याला गरजेच्या आहेत, त्या अधिक गुणवत्तेनुसार वाढ करण्यासाठी उत्तेजन द्यायचे आहे. भारतातील सर्व राज्यातील त्या-त्या क्षेत्रातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामध्ये या केंद्रांमुळे गुणवत्तापूर्ण वाढ करता येणार आहे.  - रमणन रामानाथन,  कार्यकारी संचालक निती आयोग,  अटल इनक्युबेशन सेंटर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com