कृषी पर्यवेक्षक प्रदीपकुमार अजमेरा यांचे निधन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : राज्य शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कारप्राप्त जालना जिल्ह्यातील अंबड येथील कृषी अधिकारी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रदीपकुमार ताराचंद अजमेरा यांचे सोमवारी (ता.५) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ५६ वर्षांचे होते. 

सामान्य कुटुंबात २३ फेब्रुवारी १९६२ रोजी जन्मलेल्या अजमेरा यांनी ८०च्या दशकात कृषी विभागात कृषी सहायक म्हणून सेवा सुरू केली. औरंगाबाद जिल्ह्यातून आपल्या कृषी सेवेला सुरवात करणाऱ्या अजमेरा यांनी दीर्घकाळ पैठण व औरंगाबाद तालुक्‍यात सेवा दिली. अलीकडे तीन चार वर्षांपासून ते जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यात कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. कृषीविषयक पुस्तकांचा प्रचंड व्यासंग जपलेल्या अजमेरा यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड भागात डाळिंब, मोसंबी, भाजीपाला शेतीविस्ताराचे कार्य केले. 

तसेच जालना जिल्ह्यात सीताफळाची गटाने लागवड करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. कृषीमध्ये विस्तारकार्य विषयात त्यांना विशेष रुची होती. शेतकऱ्यांच्या भेटी व त्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याकडे त्यांचा विशेष कल होता.

अजमेरा यांना जुलै २०१७ मध्ये राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार-२०१४ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या पश्‍चात आई, तीन भाऊ, दोन बहिनी, दोन मुले मयूर आणि सुमित, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ॲग्रोवनमधून विशेष लिखाण

अौरंगाबाद, जालना जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या यशोगाथा अजमेरा यांनी ॲग्रोवनमध्ये लिखाण करून राज्यातील शेतकऱ्यांपुढे आणल्या. त्याची राज्यभरातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. त्या माध्यमातून त्यांचा मराठवाड्याबरोबरच राज्यभरातील शेतकऱ्यांसोबत दांडगा संपर्क तयार झाला होता. ॲग्रोवनच्या स्थापनेपासूनच त्यांची या दैनिकासोबत नाळ जुळली होती. ते सतत प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शोधातच असायचे. आपल्या भागातील ताज्या घटना, परिसंवाद आदींविषयही ते ॲग्रोवनला त्वरित माहिती देत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे कार्य कृषीविस्तारासाठी मैलाचा दगड ठरले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com