पाणी, खतांचा काटेकोरपणे वापर आवश्यक : वासुदेव काठे

पाणी, खतांचा काटेकोरपणे वापर आवश्यक : वासुदेव काठे
पाणी, खतांचा काटेकोरपणे वापर आवश्यक : वासुदेव काठे

पाण्याचा अतिवापर, रासायनिक खतांचा अतिरेक आणि सेंद्रिय पदार्थांचा अभाव हेच जमिनीची सुपीकता कमी होण्यासाठी कारणीभूत आहेत. आपल्याला जमिनीची उत्पादकता वाढवायची असल्यास या मुद्द्यावरच काम करण्याची आवश्यकता आहे. आमचे शेतकरी गट या विषयावर सातत्याने प्रयोग करत असल्याचे दाभोळकर प्रयोग परिवाराचे महाराष्ट्र समन्वयक आणि प्रगतिशील शेतकरी वासुदेव काठे यांनी सांगितले. 'अॅग्रोवन'च्या तेराव्या वर्धापन दिन निमित्ताने 'जपाल माती, तर पिकतील मोती' या विषयावर पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात मंगळवारी (ता.१७) झालेल्या चर्चासत्राला राज्यभरातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी श्री. काठे बोलत हाेते. प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, सुभाष शर्मा, वासुदेव काठे, शास्त्रज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे यांची जमीन सुपीकतेवर केलेल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

पाणी वापर ः

  • पाण्याचा अतिरेकी वापर केल्यामुळे जमिनी नापीक होण्याचा धोका वाढला आहे. वास्तविक पीक, मातीच्या प्रकारानुसार आणि परिसरातील बाष्पीभवनानुसार पाणी देण्याची आवश्यकता आहे. प्रति वर्गफूट १०० ते २०० मिलि पाणी बाष्पीभवनाद्वारे जाते. पिकांची आवश्यकता आणि बाष्पीभवनाद्वारे जाणारे पाणी एवढेच पाणी द्यावे. अलीकडे ठिबक सिंचन पद्धतीमुळे पाण्यामध्ये बचत होण्याऐवजी रोज पाणी, रोज खत अशी पद्धत सुरू झाली आहे. यातून जमिनी खराब होण्याचा धोका आहे.
  • वार्षिक सुमारे ४० लाख लिटर पाणी शेतात दिले जाते. अगदी काटेकोर व्यवस्थापन केले तरी २५ लाख लिटर पाणी आपण देतो. पाण्यातील विविध क्षारांचे प्रमाण विचारात घेतल्यास किती क्षार आपण जमिनीत टाकतो, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
  • पाण्यातून मिळाणाल्या पोषक घटकांचे प्रमाण पिकांना खते देण्यासाठीच्या शिफारशीतून कमी करण्याची गरज आहे.
  • पाणी व्यवस्थापनासंदर्भात द्राक्ष पिकातील उदाहरण दिले. मुरमाड जमिनीमध्ये दर चौथ्या दिवशी, मध्यम जमिनीमध्ये सातव्या दिवशी, तर काळ्या जमिनीमध्ये २१ ते २८ दिवसांनी पाण्याची पाळी देण्याची पद्धत बसवली आहे. पुढील पाण्यासाठी जमिनीतील ओलावा तपासण्यासोबत पिकांच्या पानांवर लक्ष दिले जाते. नैसर्गिकपणे सूर्यप्रकाश आणि अन्य ताणामुळे सकाळी १० ते ४ पाने सुकल्यासारखी दिसतात. मात्र, सकाळी ९ ते १० च्या दरम्यान पाने सुकल्यासारखी दिसू लागल्यास पाणी देण्याची वेळ आल्याचे समजावे.
  • खतांचा वापर ः

  • द्राक्ष पिकामध्ये प्रगत देशांसह भारतातील खत शिफारशींचा अभ्यास केला. त्यातील नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य घटकांसह कॅल्शियम, मॅग्नेशियम ही दुय्यम अन्नद्रव्ये उपलब्ध करणे उत्तम पीक उत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. मात्र, त्यातून पिकाच्या दर छाटणीवेळी पडणारी पाने, काड्या, देठ गाडण्याचे नियोजन केले. यातून सुमारे ६१ टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद, ४४ टक्के पालाश, ३६ टक्के कॅल्शियम, ३५ मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये उपलब्ध होतात. एवढ्या प्रमाणात खते मूळ शिफारशीतून कमी करणे गरजेचे आहे. अन्यथा आपण अतिरीक्त खते दिल्यासारखे होईल.
  • एका जनावरापासून एका वर्षामध्ये २५०० लिटर मूत्र मिळते. म्हणजे प्रति वर्ष १७ किलो नत्र, ११ किलो स्फुरद, ८ किलो पालाश या सह बहुतांश सर्व सूक्ष्म अन्नद्रव्येही अल्प प्रमाणात उपलब्ध होतात. त्यांचा वापर शेतात पाण्यासोबत केला पाहिजे. तेवढ्या खतावरील खर्च कमी होतो.
  • शेणखतातून मिळणारी अन्नद्रव्ये आणि तणांच्या कुजवण्यातून मिळणारी अन्नद्रव्ये यांचे प्रमाण प्रयोगशाळेतून मोजून घेतले आहे. विविध तणांच्या प्रकारानुसार त्यातून २ ते ६ टक्क्यापर्यंत मूलद्रव्ये उपलब्ध होतात.
  • ज्वारी, सोयाबीन, चवळी अशा मिश्रधान्यांतून मिळणाऱ्या खतांचेही प्रयोग केले आहेत. एक वर्गफूट जागेमध्ये केलेल्या या प्रयोगात लावलेल्या मिश्रपिकातील वाढलेले बायोमाय पहिल्या महिन्याला २५ टक्के, दुसऱ्या महिन्याला २५ टक्के असे चार महिन्यापर्यंत क्रश करून गाडण्यात आले. त्यातून चांगले निष्कर्ष मिळाले. जमिनीचा सामू ७.९ वरून ७.६५ पर्यंत कमी झाला. नत्र ७० पीपीएमवरून वाढून १९५ पीपीएम झाला. स्फुरद ३३ टक्क्यावरून वाढून ५२ टक्के झाला. थोडक्यात मिश्र पिकांच्या बायोमास मधून अन्नद्रव्याची उपलब्धता होऊ शकते.
  • विविध मार्गातून जमिनीमध्ये जात असलेल्या क्षार, मूलद्रव्ये आणि खते यांचा विचार करून तितके प्रमाण मुळ खत शिफारशीतून वजा केले पाहिजे, असे वासुदेव काठे यांनी सांगितले.
  • ‘सेंद्रिय कर्ब जितके अधिक तितके पीक उत्पादन अधिक’ हे सूत्र लक्षात ठेवावे.
  • शेतीमध्ये प्लॅस्टिकचा वापर घातक ः सध्या रोपांसाठी प्लॅस्टिक पिशवी, प्लॅस्टिक मल्चिंग यातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक शेतात जात आहे. केवळ प्लॅस्टिकमुळे मुळांच्या वाढीमध्ये अडथळा येऊन २५ टक्क्यापर्यंत उत्पादन कमी झाल्याचे उदाहरण पाहण्यात आले. त्यानंतर गेल्या ३५ वर्षापासून प्लॅस्टिकची पिशवीही वापरत नसल्याचे काठे यांनी सांगितले. संपर्क ः वासुदेव काठे, ९९२२७१९१७१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com