agriculture news in marathi, agrowon, arun jetaly, pune district bank | Agrowon

‘एनपीए’वाढीला शेतकरी जबाबदार नाहीत : जेटली
मनोज कापडे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जाण्यासाठी ऑक्टोबरमध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. शेतकरी संस्था टिकविण्यासाठी भ्रष्ट संस्थांच्या विरोधात सुधारणेची भूमिका आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 

पुणे : देशात ५५ टक्के जनता शेती क्षेत्रावर अवलंबून असून, एकूण उत्पन्नात १५ टक्के वाटा या क्षेत्राचा आहे. त्यामुळे शेतीतील समस्या आपल्यासमोर कायम एक आव्हान म्हणून उभ्या आहेत. देशाच्या मोठ्या बॅंकांमधील ‘एनपीए’ (अनुत्पादक कर्ज) वाढण्यासाठी छोटे कर्जदार तसेच शेतकरी जबाबदार नाहीत. काही मोठ्या कर्जदारांनीच ‘एनपीए’ वाढविला असून, त्यांच्याकडील वसुली ही एक मोठी समस्या आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शताब्दी सांगता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री व बॅंकेचे संचालक अजित पवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पुरवठामंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, नाबार्डचे मुख्य महाव्यस्थापक राजेंद्र कुलकर्णी, कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. एस. संधू, कुलगुरू के. पी. विश्वनाथ, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे व इतर मान्यवर व्यासपीठावर होते. 

‘पुणे जिल्हा बॅंकेच्या १०० वर्षांच्या कारकिर्दीचा मला अभिमान वाटतो. या बॅंकेचा ‘एनपीए’ शून्य टक्के आहे. बॅंकेचे कामकाज विश्वास व कायद्याने चालत असल्यामुळे हे शक्य होते. देशातील छोटे कर्जदार तसेच शेतकरी यांच्यामुळे बॅंका अडचणीत आलेल्या नाहीत. उलट काही मोठ्या कर्जदारांमुळे बॅंकांचा एनपीए वाढला आहे, असे श्री. जेटली यांनी नमूद केले. 

देशाच्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी बॅंकेचा कर्जपुरवठा हा महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, मोठ्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बॅंकेची कर्जपुरवठ्याची क्षमता कमी होते. त्यामुळे हा पैसा वसूल करून विकासासाठी वापरण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, असे जेटली यांनी सांगितले.

दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ
राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जाण्यासाठी ऑक्टोबरमध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम करण्यासाठी या सोसायटयांचे पुनरुज्जीवन करण्याचे धोरण आहे. त्यासाठी सहकारी बॅंकांची मदत घेतली जाईल. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे काम चांगले आहे. सहकाराला गालबोट लावणाऱ्या संस्था आहे. मात्र, चांगल्या संस्थांना प्रोत्साहन व वाईट संस्थांमध्ये सुधारणा असेच धोरण राज्य सरकारने ठेवले आहे. शेतकरी संस्था टिकविण्यासाठी भ्रष्ट संस्थांच्या विरोधात सुधारणेची भूमिका आम्ही ठेवली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

भांडवली गुंतवणूक वाढवावी 
पुणे जिल्हा बॅंकेच्या गेल्या ५० वर्षांच्या चांगल्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. न. चिं. केळकर यांनी स्थापन केलेल्या या बॅंकेचे संचालक म्हणून धनंजयराव गाडगीळ यांनी काम पाहिले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना समजून घेत या बॅंकेने आर्थिक शिस्त ठेवत काम चालू ठेवले आहे. राज्याचा ग्रामीण भाग शक्तिशाली करण्यासाठी गावाचे अर्थकारण मजबूत करावे लागेल. त्यासाठी अशा बॅंकांच्या मदतीने भांडवली गुंतवणूक करून शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे लागेल, असे उद्गगार माजी कृषिमंत्री श्री. शरद पवार यांनी काढले. 

सहकारी संस्थांची विक्री नाही
सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, की राज्यातील बंद पडलेल्या सहकारी सूतगिरण्या व साखर कारखान्यांची विक्री न करण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. या संस्थांची विक्री किंवा खासगी संस्थांकडे चालविण्यास न देता सहकारी पद्धतीनेच पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. दिवाळीपूर्वीच कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठीदेखील सहकार विभागाचे काम वेगात सुरू चालू आहे. राज्यातील २२ हजारांपैकी ११ हजार विविध कार्यकारी सोसायट्या आजारी आहेत. या सोसायट्याच सहकाराचा कणा असून, त्यांचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे. १०० वर्षांचा यशस्वी अनुभव असलेल्या पुणे जिल्हा बॅंकेनेदेखील आता इतर आजारी सहकारी बॅंकांचे पालकत्व घ्यावे. प्रत्येक सक्षम जिल्हा बॅंकेने असे २-३ बॅंकांचे पालकत्व घेतल्यास राज्यातील अनेक आजारी बॅंकांची स्थिती सुधारेल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, असेही श्री. देशमुख म्हणाले. 

एकाच्या चुकीमुळे आरोपीच्या पिंजऱ्यात नको
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की सहकारी संस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा. चूक असेल तर चूकच म्हणावे; मात्र केवळ एका व्यक्तीच्या चुकीमुळे पूर्ण सहकारी संस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका. नोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅंकांची अडकलेली काही रक्कम अजूनही मिळालेली नाही. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यात लक्ष घातल्यास बॅंकांना दिलासा मिळेल, असेही श्री. पवार म्हणाले.

सर्व सहकारी चळवळ चांगली आहे असे मी म्हणणार नाही. काही संस्था चुकीचे काम करीत असतील, त्यांना सुधारावे; मात्र बहुसंख्य सहकारी संस्थांमुळे राज्याची सहकारी चळवळ बळकट झाली आहे. त्यातून ग्रामीण महाराष्ट्राला दिशा मिळाली आहे. राज्यात सर्वांत जास्त ठेवी पुणे जिल्हा बॅंकेकडे आहेत. स्वच्छ कारभारामुळे आज १०० वर्षांत बॅंकेच्या २६१ शाखा असून, बॅंकेवरील प्रेमामुळेच आज हजारोंच्या संख्येने शेतकरी बंधू या सोहळ्याला आले आहेत, असेही श्री. पवार यांनी नमूद केले.  

जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. आठ हजार कोटींच्या ठेवी व पाच हजार कोटींचे कर्जवाटप झालेले आहे. यंदा बॅंकेला ७२ कोटींचा नफा झाला असून, सभासदांना ३० कोटींचे लाभांश वाटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने वाटले जात आहे. यंदा बॅंकेचा फिरती शाखा म्हणून मोबाईल बॅंकिंग व्हॅन सुरू केली जाणार आहे, असे डॉ. भोसले म्हणाले.  

 जिल्ह्याच्या सहकारी चळवळीत चांगली कामगिरी बजावलेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्या व संस्थांना ‘शरद पवार सहकार गौरव पुरस्कार’ देण्यात आले. पुणे जिल्हा बॅंकेवर टपाल खात्याने तयार केलेल्या पाकिटाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल बॅंकेच्या वतीने श्री. शरद पवार यांचा सत्कार श्री. जेटली यांच्या करण्यात आला.
 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात स्वनिधी, गटबांधणीतून...जमिनीचे घटते क्षेत्र, विविध कारणांमुळे घटत...
संपूर्ण कर्जमाफीसाठी दिल्लीत दुसऱ्या... नवी दिल्ली ः शेतमालास योग्य दर मिळत नसल्याने...
आज, उद्या पावसाचा अंदाज पुणे : दक्षिण अंदमानच्या समुद्रालगत तयार...
कांदा निर्यातीवर पुन्हा निर्बंध? नाशिक : किरकोळ बाजारातील वाढत्या कांदा दरावर...
ढगाळ वातारणाने रोग-किडींचा प्रादुर्भाव...पुणे : राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून असलेल्या...
दूध धंद्याला बसले ‘जीएसटी’चे चटके विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण :...
यवतमाळ मृत्यूकांडामागे तंबाखू असल्याचा...नागपूर  ः जगात सर्वात जास्त तंबाखू खाणारे...
बिगर नोंदणीकृत निविष्ठांच्या विक्रीचा...पुणे : बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठांची विक्री...
कीटकनाशकांसाठीही आता ‘प्रिस्क्रिप्शन’!मुंबई ः ज्याप्रमाणे एखादा रोग बरा व्हावा, यासाठी...
राज्यात रब्बीची ५२ टक्के पेरणी पुणे : राज्यात रब्बी पिकांचा पेरा आतापर्यंत ५२...
बारमाही उत्पन्नासाठी फुलशेतीचा अंगीकारबारमाही उत्पन्न देणाऱ्या व मुख्य पारंपरिक...
शेतमालास योग्य हमीभाव; संपूर्ण कर्जमाफी...नवी दिल्ली ः स्वामिनाथन अायोगाच्या शिफारशींनुसार...
वाढत्या पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सचा बाजार... सध्या ब्रॉयलर्स पक्ष्यांना थंडीमुळे जोरदार...
रोगग्रस्त कपाशीची पऱ्हाटी पेपर मिलना... जळगाव ः जिल्ह्यात कपाशीवर शेंदरी बोंड अळीचा...
टोमॅटो हंगाम यंदा समाधानकारक औरंगाबाद : गतवर्षी फेकूण द्यायची वेळ आलेल्या...
काेकण, दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे : राज्यात सोमवारी (ता. २०) तुरळक ठिकाणी...
शहरी झाडांच्या वाढीचा वेग ग्रामीण...शहरी भागातील झाडांच्या वाढीचा वेग हा ग्रामीण...
शेततळ्यामधील मत्स्यसंवर्धनासाठी आवश्‍यक...शेततळ्यातील माशांचे उत्पादन अधिक प्रमाणात...
लिटरमागे ९ रुपयांचा तोटा सोसून शेतकरी...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : ...
कर्बवायू साठवणीसाठी करा दक्षिण- उत्तर...पूर्व-पश्चिम लागवडीमध्ये कर्बवायू वाहून गेल्याने...