राज्यातील केळी करपतेय करप्याने

उन्हाळा आणि पावसाळ्यात लागवड केलेल्या लहान केळीवर करपा अधिक सक्रिय झाला आहे. उतिसंवर्धित रोपे त्याला लवकर बळी पडतात. त्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन गरजेचे आहे. बुरशीनाशकांची फवारणी रोपांवर करावी. - निजामुद्दीन शेख , केळी शास्त्रज्ञ.
मार्च व त्यापूर्वी लागवड केलेल्या केळी बागांमध्ये पिवळा करपा वाढू लागला आहे.
मार्च व त्यापूर्वी लागवड केलेल्या केळी बागांमध्ये पिवळा करपा वाढू लागला आहे.

जळगाव ः उन्हाळा आणि पावसाळ्यात लागवड केलेल्या केळी बागांमध्ये करपा (यलो सिगाटोका) व कुकंबर मोझॅक व्हायरसचा (सीएमव्ही) प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात जूनमध्ये लागवड केलेलेल्या अनेक केळी बागांमध्ये सरासरी दोन पानांवर करपा दिसत आहे. तर सीएमव्ही रोगाचे प्रमाणही एक हजार रोपे किंवा झाडांमागे २० ते २५ असे आहे.

यंदाचा अनियमित पावसाळा, त्यातच रोगराई यामुळे केळी पीक संकटात सापडले आहे. करपा रोगामुळे केळीच्या उत्पादनात २० ते २२ टक्के घट होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी ४२  हजार ४०० हेक्‍टरवर केळीची लागवड विविध टप्प्यांत झाली होती. यंदा त्यात जवळपास तीन हजार हेक्‍टरने घट आली आहे. कारण पर्जन्यमान हवे तसे नाही. केळी लागवडीत आघाडीवर असलेल्या तांदलवाडी, मांगलवाडी, सिंगत, बलवाडी, खिर्डी (सर्व ता. रावेर) या भागांत तर पर्जन्यमान अतिशय कमी आहे. जून व जुलैमध्ये दोन वेळा तीन आठवडे पावसाचा ताण या भागात होता. 

जिल्ह्यात बारमाही केळीची लागवड सुरू असते. अनेक शेतकरी केळीच्या खोडांऐवजी उतिसंवर्धित रोपांना पसंती देत आहेत. या रोपांचा खर्च प्रतिरोप १२ रुपयांपासून आहे. त्यात सूक्ष्मसिंचन यंत्रणा, विद्राव्य खते, बुरशीनाशकांची फवारणी, स्कर्टिंग बॅग आदी मिळून किमान लाखभर रुपये खर्च केळीला एकरी येत आहे.

जिल्हाभरात जवळपास निम्मे म्हणजेच १९ हजार हेक्‍टरवर उतिसंवर्धित रोपांची लागवड झाल्याचा अंदाज आहे. यातच उतिसंवर्धित रोपांवर यलो सिगाटोका या रोगाला कारणीभूत मायकोस्पेरिला म्युसिकोला ही बुरशी सक्रिय झाल्याची माहिती केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. या रोगांना थोपविण्यासाठी शेतकऱ्यांना आटोकाट प्रयत्न करावे लागत असून, यामुळे उत्पादन खर्चही वाढल्याचे चित्र आहे. 

ऑगस्टच्या मध्यानंतर प्रादुर्भावात वाढ  जिल्ह्यातील जवळपास २८ ते २९ हजार हेक्‍टर क्षेत्र करपा रोगाने ग्रस्त आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन करण्यास रावेर तालुक्‍यात सुरवात झाली आहे. परंतु इतर भागांत मात्र शेतकरी या संदर्भात फारसे जागरूक नाहीत.

जिल्ह्यात ऑगस्टच्या मध्यानंतर करपा रोगाचा केळीवर प्रादुर्भाव अधिक वाढला. कारण या काळात पाऊस झाला. पावसानंतर उष्णता व आर्द्रता वाढली. त्यामुळे करपा रोग फोफावण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली. पाने पिवळी पडून ती नंतर काळपट होतात. रोपाच्या वाढीला बाधाही पोचू लागली आहे.

सीएमव्ही थोपविणे अशक्य? 

सीएमव्ही रोगाचे प्रमाण कमी असले तरी त्याला थोपविणे शक्‍य नाही. सीएमव्हीग्रस्त रोप किंवा झाड जमिनीतून उपटून ते जाळावे लागते. सध्या आर्द्रतायुक्त व ढगाळ वातावरण असल्याने सीएमव्हीग्रस्त रोपे जाळतानाही अडचण येते. सीएमव्हीग्रस्त रोपांची वाढ तर खुुंटतेच, याशिवाय त्यांची पाने लहान आकाराची व तीक्ष्ण बनतात. रोप पिवळे, काळे पडते आणि नष्ट होते. त्यातील नुकसानकारक घटक इतर रोपांनाही बाधित करू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.

  प्रतिक्रिया

उन्हाळ्यात लागवड केलेल्या केळीत करपा रोग वाढला आहे. लहान रोपांवर त्याचा अधिक प्रादुर्भाव दिसत असून, एकरी ७०० रुपये खर्च बुरशीनाशकांसाठी येत आहे.                                                                    - सतीश भास्कर पाटील,

                                                 केळी उत्पादक, केऱ्हाळे बुद्रुक, जि. जळगाव

करपा रोगग्रस्त पाने पिवळी पडून ती बागेतील इतर झाडांनाही प्रभावित करतात. झाडांची वाढ खुंटलेली दिसत आहे. मागील वर्षीही सप्टेंबरमध्ये करपा आला होता.                                                                            - नरेश भगवानदास नवाल,                                                            केळी उत्पादक, नांद्रा बुद्रुक, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com