मृतदेह ताब्यात घेतला; सरकारवर रोष मात्र कायम

मृतदेह ताब्यात घेतला; सरकारवर रोष मात्र कायम
मृतदेह ताब्यात घेतला; सरकारवर रोष मात्र कायम

यवतमाळ  : घाटंजी तालुक्‍यातील राजूरवाडी येथील शंकर चायरे यांनी मंगळवारी (ता.१०) आत्महत्या केली होती. प्रशासनाकडून तीन दिवसांपासून मागण्यांसदर्भात कोणतीही दखल न घेतल्याने अखेरीस नातेवाईक व कुटुंबीयांचा विचार करत मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय त्यांच्या मुलीकडून घेण्यात आला. 

या संदर्भात पत्रकारांसमोर बोलताना आत्महत्याग्रस्त शेतकरी शंकर चायरे यांची मुलगी जयश्री म्हणाल्या,''बॅंक इमारतीच्या भूमिपूजनाला येण्यासाठी वेळ असलेल्या मुख्यमंत्र्यांना आमचे अश्रू पुसायला येण्यासाठी वेळ नाही. सरकारला संवेदना नसल्याची जाणीव यातून होते. त्यातच आमच्या कुटुंबीयांसह नातेवाईकदेखील तीन दिवसांपासून उपाशी असल्याने अखेरीस मृतदेह ताब्यात घेत आहोत.'' या वेळी त्यांचे डोळे पाणावले होते. 

शेतकरी शंकर चायरे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सहा पानी चिठ्ठीत त्यांनी आपल्या मृत्यूला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचे नमूद केले होते. बोंड अळीची मदत नाही, कर्जमाफी नाही, त्यामुळे चौफेर घेराबंदी झाल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत म्हटले होते. या घटनेमुळे सर्वदूर खळबळ उडाली. 

आपल्या मागण्यांची पूर्तता होईस्तोवर मृतदेह न उचलण्याची भूमिका घेण्यात आली होती. प्रशासनाकडून या संदर्भाने कोणताच निर्णय होत नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून मृतदेह शासकीय रुग्णालयातच होता. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, माजी खासदार नाना पटोले, देवानंद पवार, अमरावती विभागीय आयुक्‍त पीयूष सिंह यांच्यासह अख्खे प्रशासन गुरुवारी (ता.१२) राजूरवाडीत पोचले. प्रशासनाकडून या वेळी मृतकाच्या कुटुंबीयांची समजूत काढण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द मुख्यमंत्री गुरुवारी (ता.१२) यवतमाळ शहरात एका खासगी बॅंकेच्या इमारतीचे लोकार्पण करण्यासाठी येणार होते. परंतु काही संघटनांकडून आंदोलन होण्याची शक्‍यता पाहता त्यांचा दौरा रद्द केला गेला. उमरखेड येथील भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मात्र त्यांनी उपस्थिती लावली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com