बुलडाणा जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय अातबट्ट्याचाच

बुलडाणा जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय अातबट्ट्याचाच
बुलडाणा जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय अातबट्ट्याचाच

कधीकाळी दूध उत्पादनात सातत्याने वाढती झेप घेणारा बुलडाणा जिल्हा अाज पिछाडीवर तर गेलाच, शिवाय ज्यांनी यात सातत्य टिकवले त्यांना घसरलेल्या दरामुळे हा व्यवसाय कायम ठेवण्यासाठी सर्वच स्तरांवर संघर्ष करावा लागत अाहे. शासकीय दूध संघांचे संकलन ‘अाटले’ असल्याने खासगी डेअरींच्या भरवशावर हा गाडा अोढला जात अाहे. जिल्हा दूध संघाचे अवघे साडेपाच हजार लिटर दूध संकलन  असून उर्वरित हजारो लिटर दूध खासगी डेअरींना जात अाहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना डेअरींच्या हव्या त्या नियमांना बांधील राहावे लागते अाहे. महागलेले पशुखाद्य, पाणी टंचाई, बाजारात मिळत नसलेले अपेक्षित दर यामुळे जिल्हाभर सर्वत्र तोट्याचा दूध व्यवसाय सुरू अाहे. 

बुलडाणा जिल्हा हा १३ तालुक्यांचा वऱ्हाडातील मोठा जिल्हा अाहे. या जिल्ह्यात चिखली, मोताळा, नांदुरा, बुलडाणा, देऊळगावराजा या तालुक्यांत दूध उत्पादन करणारे हजारो पशुपालक अाहेत. खानदेशला लागून असलेल्या नांदुरा, मोताळा या तालुक्यात तर अनेकांनी हा व्यवसाय मुख्य करीत शेतीला पूरक केले. गावागावांत व घरोघरी दुधाळ जनावरे येथे बघायला मिळतात.  

सध्या गायीच्या दुधाला सरासरी दर २७, तर म्हशीच्या दुधाला ३६ रुपये दर जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु या जिल्ह्यात सक्षम शासकीय दूध संघच नाही. सहकारी तत्त्वावर तयार झालेल्या दूध संस्था डबघाईस अाल्या. अाता ज्या काही संस्था सुरू अाहेत, त्यांच्यापैकी काहींचे संकलन सुरू अाहे. हे संकलन अवघे साडेपाच हजार लिटरचे अाहे. खासगी डेअरीमध्ये ‘मदर’ साडेबारा हजार, इतर संस्थांचे साडेसात हजार लिटर संकलन अाहे. याचा विचार केल्यास जिल्ह्यात दूध उत्पादन होऊनही ते खरेदी करणारी सक्षम शासकीय यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट दिसून येते. 

याचा फटका दूध उत्पादकांना सहन करावा लागतो. दररोजचे दूध खासगी डेअरींना द्यावे लागते. या डेअरींकडून त्यांना हवे तसे नियम बनविले जातात. अनेकदा दूध परत केले जाते, अशी तक्रार दूध उत्पादकांशी चर्चा करताना सातत्याने बोलण्यातून व्यक्त होत होती. 

ताळमेळ जुळेना बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत ‘दुष्काळ’ हा कायम अाहे. पाऊस कमी पडत असल्याने त्याचा फटका जसा पिकांना बसतो तसाच फटका शेतीशी निगडित पूरक व्यवसायांनाही बसतो. यात दुग्ध व्यवसाय हासुद्धा अाहे. प्रामुख्याने उन्हाळ्यात पाण्याचा ताण जाणवतो. अाज अनेकांना जनावरांना लागणारे पाणी उपलब्ध करण्यासाठी टँकरची मदत घ्यावी लागते. यामुळे अाणखी एका खर्चात वाढ झाली. महागलेला चारा हीसुद्धा एक सातत्याने भेडसावणारी अडचण झाली अाहे. दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च हा सातत्याने वाढत असताना, शिवाय उन्हाळ्यात दुग्धोत्पादन कमी येत असल्याने खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी अनेकांची स्थिती झाली अाहे. अशा परिस्थितीत दुधाला चांगले दर मिळणे गरजेचे अाहे. पण ते होत नाही. सध्या दुग्धोत्पादकांना खर्च व नफ्याचा ताळमेळ जुळविता जुळेना अशी विचित्र परिस्थिती बनली अाहे. 

शासनाचे दर वाढले पाहिजेत 

मोताळा तालुक्यात अामचे गाव दूध उत्पादनासाठी प्रख्यात अाहे. शासनाचे दर कमी असल्याने पशुपालकांना शासनाला दूध देणे परवडत नाही. अामच्या गावातील संपूर्ण दूध खासगी डेअरीला देत अाहोत. शासनाने दर देण्याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज अाहे. शासनाने दर वाढवले तर इतर डेअरींनासुद्धा त्याचा लाभ होऊ शकतो.   -  गजानन सोळंके, खरबडी, जि. बुलडाणा  

नफ्याची अपेक्षा सोडून काम 

दूध उत्पादक मोठा असो की छोटा, अाज या प्रत्येकाला ताळमेळ जुळविताना नाकीनऊ येत अाहे. माझ्याकडे दिवसाला ३० ते ४० लिटर उत्पादन होते. परंतु एवढे होऊनही फारसा नफा राहत नाही. पशुपालकाकडे घरचे खाद्य पूर्वीसारखे नसते. सर्व खाद्ये बाहेरून घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत नफ्याची अपेक्षा सोडून काम करावे लागत अाहे.          - गोपाल रामदास जुनारे,  शेंबा, जि. बुलडाणा

दूध स्वस्त, पाणी महाग

जिल्ह्यात शासकीय डेअरी बंद झाल्याने शेतकऱ्यांना शासनाचे पाठबळच राहिलेले नाही. अनेकांना दारोदारी जाऊन किरकोळ विक्री करावी लागते. त्याचे दर कमी अाहेत. सध्याच्या काळात जनावरांच्या किमती, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी लागणारा खर्च अाणि दूध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न पाहिले तर ते परवडणारे नाही. सध्या दुधापेक्षा पाण्याची बॉटल महाग झालेली अाहे. अशा स्थितीत शासनाने दुधाला योग्य दर दिले पाहिजेत. दुधावर प्रक्रिया करून तयार केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियांचे प्रशिक्षण गावागावात जाऊन द्यायला हवे. असे छोटे उद्योग उभारण्यासाठी अार्थिक पाठबळ शासनाने द्यावे. तरच दूध उत्पादक शेतकरी टिकेल.  -लखन गाडेकर, अध्यक्ष, दूध उत्पादक संघटना बुलडाणा 

केवळ ‘शेण’ हाच नफा बनला !

जिल्हा दूध संघ एकवेळचे दूध घेते. २३.५० ते २४ रुपये भाव पडतो. शेजारच्या जळगाव दूध संघाचेही दर कमी अाहेत. सध्या अामच्याकडे दिवसाला २२० लिटर दूध अाहे. परंतु नफा रुपयाचाही नाही. जनावरांपासून जे शेण मिळते तोच केवळ फायदा. खासगी डेअरीकडून खरेदी होणारे दूध फॅट न लागल्याने अनेकदा परत केले जाते. हा भुर्दंड शेतकऱ्यांना झेपावत नाही. अाम्हाला तर दर तिसऱ्या दिवशी ७०० रुपयांचा पाण्याचा टँकर खरेदी करून जनावरांचे पालनपोषण करावे लागत अाहे. सध्या मिळत असलेला दर कुठल्याच पद्धतीने परवडत नाही.   - नितीन खर्चे, अाडविहीर, जि. बुलडाणा 

यावर्षी नुसती हमाली सुरू अाहे

सध्या कुटीचे मेटॅडोर १२ ते १३ हजारांना मिळत अाहे. ढेप कमी असली तरी इतर खाद्ये महागलेली अाहेत. शेतकरी दूध उत्पादन करून दोन पैसे मिळवण्याची अपेक्षा ठेवत असताना तो कुणीच देत नाही. किमान २८ ते ३१ रुपये दर मिळाला तर थोडाफार तोटा कमी होईल. अाताचे काम फक्त हमाली सुरू अाहे. फायदा काहीच नाही.  - गौतम बोदडे, भोरटेक, जि. बुलडाणा   

अामच्याकडे दररोज ६० लिटर दूध निघते. यात ३० लिटर गायीचे राहते. हे सर्व दूध मदर डेअरीला देतो. सात ते अाठ महिन्यांपासून ही डेअरी सुरू झाल्याने अाम्हाला अाधार मिळाला. वेळेत चुकारे केले जातात. शासनाने दराबाबत काही तरी केले तर शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळतील, त्याला हा धंदा करणे सोयीचे राहील.    - गजानन फरफट, खंडाळा, ता. नांदुरा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com