तूर खरेदी केंद्रावर कॅमेरे लावण्यास टाळाटाळ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा  ः जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील तूर खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत दिलेला आदेश न पाळल्याच्या कारणाने खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ बरखास्त करीत तेथे प्रशासक नेमण्यात आला. सहायक निबंधकांनी याबाबत आदेश देत कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. 

हमीभाव योजनेअंतर्गत तूर खरेदी पारदर्शक व्हावी, शेतमालाची लूट केल्या जाऊ नये, यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी फेब्रुवारी महिन्यात जिल्हा उपनिबंधकांकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत मागणी केली होती.

जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या खरेदी केंद्रावर असे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. परंतु देऊळगावराजा येथे नसल्याची बाब त्यांनी समोर आणली होती. या अनुषंगाने सहायक निबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांच्या निर्देशानुसार १२ मार्च व ६ एप्रिल असे दोन वेळा पत्र देत कॅमेरे लावण्याचे निर्देश दिले होते. कॅमेरे बसविण्यासाठी खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने नाफेडने हे कॅमेरे लावावेत, असे उत्तर खरेदी विक्री संघाने सहायक निबंधकांकडे दाखल केले होते. मात्र हे उत्तर समाधानकारक नसल्याने सहायक निबंधक गितेशचंद्र साबळे यांनी एका आदेशानुसार या खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले. 

तसेच तेथे प्रशासक म्हणून या संस्थेचे वरिष्ठ लिपिक बी.एफ. राठोड यांची नेमणूक केली. या खरेदी विक्री संघावर वर्षानुवर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असून, या कारवाईमुळे मोठा हादरा बसला आहे. दरम्यान ही कारवाई योग्य नसल्याने याविरुद्ध वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सीताराम शेळके यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com