'अॅग्रोवन'चे 'जमीन सुपिकता वर्ष २०१८'

'अॅग्रोवन'चे 'जमीन सुपिकता वर्ष २०१८'
'अॅग्रोवन'चे 'जमीन सुपिकता वर्ष २०१८'

पुणे : मातीचा घटलेला कस आणि मृतवत होत चालेल्या जमिनी, यामुळे शेती क्षेत्रापुढे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जमिनीचे ढासळते आरोग्य ही येत्या काळात एक प्रमुख समस्या असणार आहे. या समस्येची व्याप्ती व गांभीर्य लक्षात यावे आणि त्यावर मात करण्यासाठी नवी दिशा धुंडाळता यावी यासाठी ॲग्रोवन २०१८ हे वर्ष जमीन सुपिकता वर्ष म्हणून जाहीर करत आहे. ॲग्रोवनच्या या मोहिमेत राज्यभरातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जमिनीची सुपिकता या विषयाचे विविध पैलू या वर्षभरात उलगडून दाखवले जाणार आहेत. मृदाशास्त्र विषयातील तज्ज्ञ तांत्रिक मुद्यांविषयी मार्गदर्शन आणि प्रबोधन करणार आहेत. बातम्या, वृत्तमालिका आणि लेखांच्या माध्यमातून सरकारची धोरणं, निर्णय आणि योजनांची अंमलबजावणी यांची झाडाझडती घेतली जाणार आहे. तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशकथांमधून व्यावहारिक पातळीवर कृती करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. खास इव्हेन्ट्स आणि तांत्रिक चर्चासत्रांची जोड त्याला असणार आहे. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी `ॲग्रोवन`ने हाती घेतलेल्या या मोहीमेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा कृतिशील सहभाग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

मातीच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मातीतील जिवाणूंचे प्रमाण. मातीतील सेंद्रिय कर्बाची उपलब्धता त्यासाठी निर्णायक ठरते. मातीमध्ये किमान पाच टक्क्यांपर्यंत सेंद्रिय कर्ब असणे आवश्यक असते, मात्र राज्यातील अनेक ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. परिणामी रासायनिक खतांचा वापर करूनही पिकांची उत्पादकता घटत चालली आहे. जिवाणूंचा अभाव असेल तर मातीतील कोणतीही मूलद्रव्ये पिकांच्या मुळांपर्यंत पोचवण्याची क्रियाच होऊ शकत नाही.

देश अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून आता अन्नसुरक्षा नव्हे तर पोषणसुरक्षा हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून देशाच्या कृषी धोरणाची आखणी होत आहे. त्या दृष्टीने जमिनीची सुपिकता हा विषय ऐरणीवर आला आहे. कारण पिकांना जमिनीतून अपेक्षित प्रमाणात पोषणद्रव्यच मिळत नसल्यामुळे अन्‍नधान्य आणि फळ-भाज्यांमधील पोषणमूल्य रोडावले आहेत. म्हणूनच जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न हा थेट मानवी आरोग्यावर मोठा आणि दीर्घकालीन परिणाम करणारा मुद्दा म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे तर समाजाच्या सर्वच घटकांमध्ये या विषयाबद्दल जाणीवजागरण करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे ॲग्रोवन जमीन सुपिकता वर्ष-२०१८.

वर्षभर जमिनीचे आरोग्य या विषयावर `ॲग्रोवन`च्या व्यासपीठावर जे मंथन होणार आहे, त्यातून ही समस्या सोडविण्यासाठी नवा कृतिकार्यक्रम आकाराला येणार आहे. सरकारच्या प्रयत्नांनाही त्यातून एक ठोस दिशा मिळेल. सामूहिक विचारशक्ती आणि लोकांच्या सहभागाचं बळ यांच्या जोरावर हा कृतिकार्यक्रम प्रत्यक्षात उतरावा, यासाठी ॲग्रोवन सर्वशक्तिनिशी प्रयत्न करेल, याची ही ग्वाही ठरावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com