लोकाभिमुख सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी सेवानिवृत्त

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्याच्या महसूल विभागात झिरो पेंडन्सीची संकल्पना आणणारे, तसेच जनतेच्या कामांना वेळ द्या, असे लेखी पत्र काढून कर्मचाऱ्यांना शिस्त लावणारे पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी शनिवारी (ता. ३१) आपल्या ३५ वर्षांच्या शासकीय सेवेतून निवृत्त झाले. ‘शेती व ग्रामविकासात यापुढे आपण काम करीत राहू,’ असा संकल्प त्यांनी बोलून दाखविला आहे. 

लोकाभिमुख आणि सतत सकारात्मक भूमिका ठेवणारा सनदी अधिकारी अशी प्रतिमा असलेले श्री. दळवी हे महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे एमएस्सी अॅग्रीचे सुवर्णपदक विजेते विद्यार्थी आहेत. १९९५ च्या महाराष्ट्र केडरचे आयएएस दर्जाचे अधिकारी असलेले श्री. दळवी हे मूळचे साताऱ्याच्या खटाव भागातील निढळ गावचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी सरकारी नोकरीत राहून व सुटीच्या दिवशी गावात स्वतः श्रमदानाची कामे करून निढळला आदर्श गावाचा दर्जा मिळवून दिला आहे. 

श्री. दळवी यांना सेनानिवृत्तीच्या पुण्यासहित पश्चिम महाराष्ट्रातील विविध सरकारी अधिकारी, कर्मचारी, तसेच लोकप्रतिनिधींनी देखील शुभेच्छा दिल्या. विभागीय आयुक्तालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सामान्य शिपाई, लिपिकापासून ते जिल्हाधिकारी, तसेच इतर सनदी अधिकारी उपस्थित होते. २००८ ते २०११ या कालावधीत जिल्हाधिकारी म्हणून काम करताना श्री. दळवी यांनीच ‘झिरो पेंडन्सी’ संकल्पना प्रथम लागू केली होती. 

महसूल विभागात चिरीमिरी दिल्याशिवाय कामे होत नाहीत. मात्र, श्री. दळवी ज्या कार्यालयात गेले, तेथे त्यांनी जनताभिमुख प्रशासन व्यवस्था तयार केली. नगरचे जिल्हाधिकारी म्हणून, यशदाचे महासंचालक म्हणून, तसेच राज्याचे जमाबंदी आयुक्त म्हणून श्री. दळवी यांनी जनताभिमुख कामे केली. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, झिरो पेंडन्सी असलेली सरकारी कार्यालये अशा रोज गावपातळीवर चर्चा होणाऱ्या योजनांची आखणीच श्री. दळवी यांनी केलेली आहे. नगरच्या पारनेर तालुक्यातील वडगाव आमली हे देशातील पहिले हागणदारीमुक्त गाव श्री. दळवी यांच्या प्रयत्नांतून पुढे आले आहे. 

दळवी ठरले अनेक पुरस्कारांचे मानकरी  पाणलोट विकासाचा देशातील सर्वात मोठा प्रकल्प व तो देखील एनजीओच्या विना राबविण्याचा मान श्री. दळवी यांच्या निढळ गावाला जातो. या गावाला आतापर्यंत डझनभर पुरस्कार मिळाले आहेत. लोकांसाठी सतत चिकाटीने सरकारी कार्यालयात परिवर्तनवादी कामे करणारे श्री. दळवी हे विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. त्यांना शासनाकडून उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार, स्वच्छतादूत पुरस्कार, वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, स्कॉच स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार असे सन्मान मिळाले आहेत. 

शेती व ग्रामविकासात यापुढे आपण काम करीत राहू. माझ्या निढळ गावात विकासाच्या आणखी काही संकल्पना मी राबविणार आहे. त्याचबरोबर ग्रामविकासासाठी जनतेला मार्गदर्शन करण्याचे माझे काम यापुढेदेखील सुरू राहील.

- चंद्रकांत दळवी, निवृत्त सनदी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com