सदाभाऊ खोत यांना बदनाम करण्याचे षडयंत्र

इस्लामपूर, जि. सांगली ः बी. जी. पाटील व औंधकर यांनी मयत म्हटलेल्या रामचंद्र खोत यांना पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आले. शेजारी सागर खोत.
इस्लामपूर, जि. सांगली ः बी. जी. पाटील व औंधकर यांनी मयत म्हटलेल्या रामचंद्र खोत यांना पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आले. शेजारी सागर खोत.

इस्लामपूर, जि. सांगली  ः मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील कृषी घोटाळ्यात काही तथ्य नाही. आमदार जयंत पाटील यांना विधिमंडळात बोलायला तालुक्‍यातील कोणता मुद्दा नसल्याने जिवंत माणसे मयत दाखवून मंत्री सदाभाऊ खोत यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र आहे. खोट्या तक्रारदारांच्या पाठीमागे कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे. मात्र सदाभाऊ खोत यांना कोणी बदनाम करायचा प्रयत्न करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष निशिकांत पाटील व सागर खोत यांनी मंगळवारी (ता. १३) पत्रकार बैठकीत दिला.

या वेळी बी. जी. पाटील व औंधकर यांनी ज्यांच्या नावे बोगस आरोप केले, त्या लोकांना पत्रकार परिषदेत उपस्थित ठेऊन आरोपांचे खंडन केले. निशिकांत पाटील म्हणाले, "सध्या अधिवेशन सुरू आहे. या काळात तालुक्‍यातील प्रस्थापित नेत्याला विधिमंडळात उपस्थित करायला व सदाभाऊंना बदनाम करण्यासाठी कोणतेही कारण नसल्याने काही लोकांना हताशी धरत जिवंत माणसे मयत असल्याच्या खोट्या तक्रारी देऊन बिनबुडाचे आरोप सुरू आहेत. मात्र त्यांनी लक्षात ठेवावे. आमच्या नेत्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही.’’ 

स्वतःला तालुक्‍यातील प्रस्थापित समजणाऱ्या नेत्यांना समोरासमोर लढाईचे माहीत नाही, ते दुसऱ्याला पुढे करून आपण नामेनिराळे राहतात. हे फार पूर्वीपासून आम्हाला माहीत आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शासन नियमाला आधीन राहून या पूर्वीच्या शासनाने मरळनाथपूरमध्ये कृषी योजना राबवली होती. मरळनाथपूर गावात रामचंद्र दादू खोत या नावाच्या दोन व्यक्‍ती आहेत. त्यातील एक व्यक्‍ती मयत आहे; परंतु लाभ घेणारी व्यक्‍ती जिवंत आहे. अपुरी माहिती घेऊन केवळ बदनामी करण्याचे काम सुरू आहे.

तसेच सुनील मारुती खोत यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या नावावर गेल्या सहा वर्षांपासून जमीन आहे. तसा त्यांचा सातबाराही त्यांच्याजवळ आहे. तिसरे व्यक्‍ती संदीप श्यामराव खोत हे गावातील विकास संस्थेत सेक्रेटरी म्हणून काम करतात. त्यांची अर्जावर सही आहे, पण हे प्रकरण विकास संस्थेच्या नावे असल्याने ट्रॅक्‍टर (क्र. एम.एच. १६ ए.वाय. २६८५) व नांगर या साधनांचा लाभ विकास संस्थेला झाला आहे. 

बाळाबाई बापू राऊत या महिलेने १ सप्टेंबर २०१७ रोजी कृषी विभागाला, ‘मला कृषिपंप मिळाला,’ असे शपथपत्र लिहून दिले आहे. या सर्व बाबींची यापूर्वी चौकशी झाली आहे. तरीसुद्धा वारंवार तक्रारी देऊन मळरनाथपूर हे सदाभाऊ याचे गाव असल्याने गावाची बदनामी केली जात आहे. मंत्री सदाभाऊ खोत हे गरीब जनतेचे प्रश्‍न प्रामुख्याने सोडवत असल्याने प्रस्थापित नेत्यांना ते सहन होत नाही. त्यामुळे अशा तक्रारदारांमार्फत बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. ज्या वेळी आमदार जयंत पाटील या विषयावर बोलण्यास पुढे येतील, त्या वेळी सदाभाऊ खोत त्यांना जशास तसे उत्तर देतील, असेही या वेळी सांगण्यात आले. या वेळी भास्कर कदम, विनायक जाधव, किरण उथळे, गणेश शेवाळे, रामचंद्र खोत, सुनील खोत उपस्थित होते.

रामचंद्र दादू खोत ओळखपत्रासह हजर बी. जी. पाटील व सुयोग औंधकर यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत रामचंद्र दादू खोत या नावाचा उल्लेख केला होता. रामचंद्र खोत यांना आज त्यांच्या ओळखपत्रासह पत्रकार परिषदेत हजर करण्यात आले. सुनील खोत यांच्या नावावर जमीन नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या नावावर गेल्या सहा वर्षांपासून जमीन असल्याचा सातबारा या वेळी पत्रकारांना दाखवण्यात आला. बाळाबाई बापू राऊत या महिलेला शेतीपंप मिळाल्याचे शपथपत्र पत्रकार बैठकीत दिले, असे अनेक पुरावे दाखवून औंधकर व बी. जी. पाटील बोगस आरोप करत असल्याचे पुराव्यानिशी निशिकांत पाटील यांनी दाखवून दिले.

या कृषी योजनेमार्फत मला कृषिपंपाचा लाभ मिळाला आहे. तक्रारदारांनी मी मयत असल्याची खोटी तक्रार दिल्याने आमच्या घरी कालपासून पाहुण्यांचा लोंढा लागला आहे. माझी व गावाची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहे. - रामचंद्र दादू खोत, लाभार्थी शेतकरी, रा. मरळनाथपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com