जळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी चर्चासत्र

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील कल यांबाबतची उपयुक्त माहिती दररोज शेतकऱ्यांपर्यंत पोचवणाऱ्या  ‘ॲग्रोवन’च्या वतीने येत्या बुधवारी (ता. ३०) जळगावात ‘जमीन सुपीकता’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन बस स्थानकानजीकच्या कांताई सभागृहात हे चर्चासत्र सकाळी १० ते दुपारी १.३० यादरम्यान होईल. यूपीएल हे या चर्चासत्राचे प्रस्तुतकर्ते असून, राईज एन शाईन बायोटेक हे सहप्रायोजक आहेत . 

जमिनीचे आरोग्य व पीक पोषण या विषयातील तज्ज्ञ तथा पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, जलसंधारण, सेंद्रिय शेती व मिश्र शेती आदी प्रयोग प्रभावीपणे राबविणारे लोहारा (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील प्रगतशील शेतकरी विश्‍वासराव पाटील आणि जमीन सुपिकता या विषयासंबंधी आयुष्यभर काम करीत असलेले कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर हे मान्यवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. 

राज्यातील जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चालल्याने शेती संकटात आली आहे. हे लक्षात घेऊन ‘ॲग्रोवन’ने २०१८ हे जमीन सुपीकता वर्ष जाहीर केले आहे. त्याअंतर्गत पहिले चर्चासत्र पुण्यात झाले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला व त्याचबरोबर राज्यात ठिकठिकाणी अशी चर्चासत्रे घेऊन शेतकऱ्यांना या विषयाचे मार्गदर्शन करावे, अशी मागणी विविध भागांतून होऊ लागली आहे. त्यानुसार हे दुसरे चर्चासत्र खानदेशातील शेतकऱ्यांसाठी जळगाव येथे होत आहे. राज्यात अन्य ठिकाणीही टप्प्याटप्प्याने अशी चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.

खानदेश हा गिरणा, तापी, पांझरा, गोमाई आदी नद्यांमुळे शेती, मातीसंबंधी समृद्ध असलेला भाग आहे. खानदेशच्या केळी व कापसाच्या शेतीने जगभरात लौकीक मिळविला आहे; परंतु अलीकडे जमिनीची सुपिकता ढासळत चालली आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असतानाचा खते व पाण्याचा अनियंत्रित वापर आदी कारणांमुळे कमी उत्पादन, क्षारपड जमिनी, नापिकी अशा समस्या शेतकरी राजासमोर आ वासून उभ्या आहेत.

यापूर्वी ॲग्रोवनने पुण्यात वर्धापन दिनानिमित्त जमीन सुपिकता यासंबंधी १७ एप्रिल, २०१८ रोजी चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले. त्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी राजाला जमीन सुपिकता टिकवण्याच्या, वाढवण्याच्या संकल्पना मिळाव्यात, यादृष्टीने या चर्चासत्राचे खानदेशातील शेतकऱ्यांसाठी आयोजन केले आहे. प्रवेश विनामूल्य असणार आहे. 

ॲग्रोवन जमीन सुपीकता वर्ष २०१८

  • चर्चासत्र ः जपाल माती, तर पिकतील मोती
  • स्थळ ः कांताई सभागृह, नवीन एसटी बस स्थानकानजीक, जळगाव
  • दिनांक व वेळ ः बुधवार, ३० मे, २०१८.  
  • सकाळी १० ते दुपारी १.३०
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com