जळगाव जिल्हा बॅंकेचा वसुलीसाठी सोसायट्यांवर दबाव

जळगाव जिल्हा बॅंकेचा वसुलीसाठी सोसायट्यांवर दबाव
जळगाव जिल्हा बॅंकेचा वसुलीसाठी सोसायट्यांवर दबाव

जळगाव  ः पीककर्जाच्या वसुलीसाठी धुळे व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी कर्ज वितरणातील मध्यस्थ असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांवर दबाव आणला आहे. तोंडी स्वरूपात बॅंक अधिकारी आपल्या अखत्यारीमधील सोसायट्यांच्या सचिव व पदाधिकाऱ्यांना वसुलीसाठी सूचना देत असल्याची माहिती मिळाली. 

तसेच कर्जमाफीच्या लाभाथींकडून कुठलेही व्याज आकारू नये, असा निर्णय राज्य शासनाने जारी केलेला असला, तरी विविध कार्यकारी सोसायट्या सहा महिन्यांच्या व्याजाची आकारणी शेतकऱ्यांकडून करीत आहेत. नियमित कर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च असून, आता फक्त तीनच दिवस राहिल्याने सोसायट्याही वसुलीबाबत सक्रिय झाल्या आहेत. 

सचिव शेतकऱ्यांच्या दारापर्यंत वसुलीसाठी पोचू लागले आहेत. एका सचिवाकडे दोन ते तीन गावे असल्याने रात्री उशिरापर्यंत सचिव वसुली करीत आहेत. कुठेही सक्‍ती नाही; परंतु कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोचू लागल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्ह्यातील १० तालुक्‍यांमध्ये दुष्काळी स्थिती होती. धुळ्यातही शिरपूर, धुळे, साक्री, शिंदखेडा भागात दुष्काळी स्थिती व कापसावरील गुलाबी बोंड अळीने शेतकरी अडचणीत आले. कापूस पीक परवडले नाही.

आर्थिक अडचणी वाढल्या व कर्जबाजारी व्हावे लागले आहे. खानदेशात कापूस उत्पादकच अधिक असून, त्यांच्याकडून वसुली करू नये, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. धुळे जिल्हा बॅंकेने सुमारे ४०० कोटी कर्ज वितरण केले होते. यातील निम्मेच वसूल झाले आहे; तर जळगाव जिल्हा बॅंकेने सुमारे १२०० कोटी रुपये पीककर्ज वितरित केले होते. यातील निम्मेच कर्ज वसूल झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली. 

दोन दरांमुळे कापूस उत्पादकांना फटका पूर्वहंगामी कापूस उत्पादकांना गुलाबी बोंड अळीचा फटका बसला. आता कापूस विक्री करताना व्यापारी दोन दर सांगत आहेत. फरदडला ३५०० व पहिल्या वेचणीच्या कापसाला सुमारे पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर व्यापारी किंवा खेडा खरेदीदार देत असून, आर्थिक नुकसानामुळे शेतकरी आपला कापूस विक्री करीत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी कर्ज भरू शकलेले नाहीत. यातच वसुलीची प्रक्रिया बॅंका राबवू लागल्याने शेतकरी आणखी अडचणीत आले आहेत. 

कर्जमाफीच्या लाभार्थ्यांकडून व्याज आकारू नये, असे आदेश शासनाने दिले आहेत; परंतु जिल्हा बॅंक हे आदेश जुमानत नाही. मनमानी पद्धतीने सोसायट्या वसुली करीत आहेत. जे कर्ज भरायला तयार झाले, त्यांची कोंडी करण्याची, अडचणी वाढविण्याची पद्धत जिल्हा बॅंकेने सुरू केली आहे.  - एस. बी. पाटील,  शेतकरी कृती समिती, चोपडा, जि. जळगाव

माझा कापूस व्यापारी दोन दरांत मागत असून, सध्या खरेदीही फारशी नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे कर्ज भरू शकत नाही. एप्रिल किंवा मे महिन्यात कर्ज भरीन; परंतु एप्रिलमध्ये कर्ज भरताना दंड, अधिक व्याज आकारू नये. कर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जावी. जे शेतकरी मे व जूनमध्ये कर्ज भरतील, त्यांनाही नियमित कर्जदारांमध्ये समाविष्ट केले जावे.  - उत्तम पाटील,  शेतकरी, रेल, ता. धरणगाव (जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com