जैविक कीडनाशकांचे ‘डीएनए फिंगरप्रिंटिंग’ बंधनकारक

उत्पादनाचे ‘सीआयबीआरसी’कडे नोंदणीकरण करताना ट्रायकोडर्माच्या एखाद्या प्रकाराचे (स्ट्रेन) नाव ‘क्लेम’ केले जाते. प्रत्यक्षात उत्पादनात वेगळेच ‘स्ट्रेन’ वापरण्याच्या काही घटना आढळल्या आहेत. -डॉ. पी. के. चक्रवर्ती, सदस्य,‘सीआयबीआरसी’
जैविक कीडनाशकांचे  ‘डीएनए फिंगरप्रिंटिंग’ बंधनकारक

पुणे : जैविक कीडनाशकांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे केंद्राचे धोरण आहे. मात्र भारतात बोगस जैविक कीडनाशकांची बाजारपेठही मोठी आहे. त्याला आळा घालण्यासाठी सूक्ष्मजीवांवर आधारित जैविक उत्पादनातील सक्रिय घटकांचे ‘डीएनए फिंगरप्रिंटिंग’ करणे यापुढे उत्पादक कंपन्यांसाठी बंधनकारक ठरणार आहे. केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समितीने (सीआयबीआरसी) हा निर्णय घेतला आहे.  ‘डीएनए फिंगरप्रिंटिंग’ तंत्रामुळे उत्पादनातील जैविक घटकातील सत्यता सिद्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना अस्सल गुणवत्तेचे कीडनाशक उपलब्ध होणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) सहायक महासंचालक (पीक संरक्षण) व ‘सीआयबीआरसी’ सदस्य डॉ. पी. के. चक्रवर्ती यांनी ही माहिती दिली. बारामती (जि. पुणे) येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला. डॉ. चक्रवर्ती म्हणाले, की जैविक कीडनाशकांना प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. बुरशी, जीवाणू, विषाणू आदी सूक्ष्मजीवांवर आधारित कीडनाशकांची क्षमता चांगली असूनही त्यांचा उपयोग देशात म्हणावा तसा होत नाही. जैविक कीडनाशकांचा वापर पाच टक्क्यांपेक्षा जास्त नाही, हे असमाधानकारक आहे. रासायनिक कीडनाशकांची परदेशातून होणारी आयात ३० टक्क्या़ंनी कमी करण्याचे सरकारने ठरवले आहे. ज्या कंपन्यांकडे आयातीचा व निर्मितीचा परवाना आहे त्यांचे आयात परवाने रद्द करण्याचा सरकारचा विचार आहे. देशातच कीडनाशकांची अधिकाधिक निर्मिती व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. 

डीएनए फिंगरप्रिंटिंग तंत्राचा वापर  डॉ. चक्रवर्ती म्हणाले, की बाजारात ट्रायकोडर्मा या मित्रबुरशीवर आधारित बोगस उत्पादने असल्याचे काही अहवाल समोर आले आहेत. उत्पादनाचे ‘सीआयबीआरसी’कडे नोंदणीकरण करताना ट्रायकोडर्माच्या एखाद्या प्रकाराचे (स्ट्रेन) नाव ‘क्लेम’ केले जाते. प्रत्यक्षात उत्पादनात वेगळेच ‘स्ट्रेन’ वापरण्याच्या काही घटना आढळल्या आहेत. वास्तविक उत्पादनात जो जैविक घटक वापरला जातो त्याच्या विषारीपणाच्या (टॉक्सीसीटी) चाचण्या घेणे बंधनकारक असते. मात्र हा खर्च वाचवण्यासाठी काही वेळा अन्यत्र उपलब्ध असलेले तयार अहवाल वापरण्याची पळवाट शोधली जाते. ट्रायकोडर्माच्या काही जाती रोग निर्माण करणाऱ्या असल्याचा अहवाल ‘इंडियन मेडिकल रिसर्च इन्सिट्यूट’ने दिला आहे. त्यामुळे अशा चाचण्या घेणे अनिवार्यच असते.  

त्याशिवाय नोंदणीला मंजुरी नाही  उत्पादनातील जैविक घटकाची शास्त्रीय अोळख वा सत्यता सिद्ध होण्यासाठी ‘डीएनए फिंगरप्रिंटिंग’ हे अत्यंत प्रभावी तंत्रज्ञान आहे. त्या दृष्टीने यापुढे कंपन्यांना आपल्या उत्पादनांची नोंदणी ‘सीआयबीआरसी’कडे करण्यासाठी ही चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे; अन्यथा उत्पादनाच्या नोंदणीकरणाला संमती देण्यात येणार नाही, असेही डॉ. चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अस्सल गुणवत्तेचे उत्पादन मिळून त्यांची फसवणूक टळेल, असेही ते म्हणाले.    

डॉ. चक्रवर्ती म्हणाले...

  • जैविक कीडनाशकांच्या मंजुरीमध्ये मानवी व पर्यावरण सुरक्षा या बाबींमध्ये तडजोड नाही.
  • खासगी कंपन्यांना जैविक उत्पादनाच्या विषारीपणाबाबतच्या (टॉक्सीसीटी) चाचण्यांसाठी केंद्र सरकार करणार सहकार्य. या चाचण्या कमी खर्चात कशा होऊ शकतील यासाठी प्रयत्न.
  • जी उत्पादने खते किंवा कीडनाशके यापैकी कोणत्याही कायद्याच्या कक्षेत सध्या येत नाहीत त्यांच्याविषयी बैठक घेऊन चर्चा करणार. त्यांना कायद्याच्या कक्षेत आणणार. 
  • सूक्ष्मजीवांवर आधारित काही लोकप्रिय कीडनाशके

  • ट्रायकोडर्मा व्हिरीडी           
  • बॅसिलस थुरीनजीएंसीस         
  • पॅसिलोमायसीस लिलॅसीनस
  • व्हर्टीसिलीयम लेकॅनी
  • बिव्हेरिया बॅसियाना 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com