कृषी परिषदेमधून डॉ. खर्चे पायउतार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. शासनाने त्यांना कार्यमुक्त केले असून राज्याच्या कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ अध्यक्षपदावरून देखील त्यांना आपोआप बाजूला जावे लागले आहे.   महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून डॉ. खर्चे यांनी स्वतःच्या स्वाक्षरीचा आदेश काढून स्वतःचीच नियुक्ती विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळाच्या अध्यक्षपदी करून घेतली होती. अध्यक्ष म्हणून डॉ. खर्चे यांनी भरती केल्यामुळे वाद उफाळून आला होता. हा वाद अजूनही मिटलेला नाही.  

कृषी परिषदेचे माजी संचालक व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वीरेंद्र गोंगे यांनी डॉ. खर्चे यांना हटविण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. "राज्याच्या कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ अध्यक्षपदाची निवड करताना विद्यापीठ कायदाचा भंग झाला आहे. डॉ. खर्चे यांच्या संशयास्पद नियुक्तीची चौकशी सीआयडीकडून व्हावी. मंडळाने घाईघाईने केलेल्या भरतीची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती नियुक्त करावी," अशी मागणी डॉ. गोंगे यांनी केली आहे. 

माजी कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या मर्जीमुळे ३० एप्रिल २०१५ रोजी डॉ. खर्चे यांच्या उपाध्यक्षपदाचा नियुक्ती आदेश काढताना राज्य शासनाने डॉ. खर्चे यांचा कालावधी तीन वर्षांचा किंवा "शासनाची मर्जी असेपर्यंत" असे शब्द टाकून केली होती. "खर्चे यांची मुदतदेखील संपली असून त्यांच्या वादग्रस्त कारभारामुळे त्यांनी शासनाची मर्जीदेखील गमावली आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश शासनाने काढला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी खात्याचे सहसचिव दे. आ. गावडे यांनी डॉ. खर्चे यांच्या कार्यमुक्तीचा आदेश काढताना "तीन वर्षांची मुदत संपल्यामुळे डॉ. खर्चे यांना उपाध्यक्ष पदावरून तात्काळ कार्यमुक्त करण्यात येत आहे, असे नमूद केले आहे. मात्र, या आदेशात डॉ. खर्चे यांनी बळकावलेल्या कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळाच्या अध्यक्षपदाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. 

"परिषदेचे उपाध्यक्षपद गेल्यामुळे आता मंडळाचे अध्यक्षपदही डॉ. खर्चे यांना रिकामे करावे लागणार आहे. त्यांना आता विद्यापीठांमध्ये भरती प्रक्रियेत ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com