शेतकरी उत्पन्नवाढीच्या आव्हानांचाही विचार करा ः डॉ. स्वामिनाथन

पुणे ः हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन येथील कृषी महाविद्यालयात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रमले.
पुणे ः हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन येथील कृषी महाविद्यालयात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रमले.

पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने धोरणात्मक पावले टाकली आहेत. मात्र, उत्पन्नवाढीतील आव्हानेदेखील विचारात घ्यावी लागतील, असे मत स्वामिनाथन आयोगाचे प्रमुख डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी व्यक्त केले.

पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना डॉ. स्वामिनाथन यांनी उत्पन्नवाढीमधील आव्हाने आणि उपायदेखील स्पष्ट केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, महासंचालक डॉ. के. एम. नागरगोजे व्यासपीठावर होते.

‘१९४४ मध्ये मी प्रथम या महाविद्यालयात आलो होतो. तुमच्याशी संवाद साधताना मला आनंद होतोय,’ असे सांगून डॉ. स्वामिनाथन म्हणाले, ‘‘देशात अन्नधान्याचे काढणीपश्चात होणारे नुकसान मोठे आहे. याशिवाय हवामानबदल, घटत जाणारे शेतीक्षेत्र हेदेखील एक आव्हान आहे.

शेतीमधील भांडवली गुंतवणुकीच्या प्रमाणात मिळणारे कमी उत्पन्न आणि वाढती जोखीम, शेतीव्यवस्थेवर येणारा जैविक व अजैविक ताण, याशिवाय बेभरवशाचा माॅन्सून आणि बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत कायम अडथळा येत असतो.’’ पतपुरवठा आणि विम्याची स्थिती, शेतीकडे येण्यासाठी नाखूश असलेला वर्ग, आयात- निर्यातीची धोरणं यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत अडचणी येतात, असे डॉ. स्वामिनाथन यांनी नमूद केले.

उत्पन्नवाढीतील समस्यांना सामोरे जाताना चांगल्या शेतजमिनीचे संवर्धन करण्यासाठी विशेष कृषी क्षेत्रे तयार करावी लागतील. कोरडवाहू शेतीसाठी उपलब्ध क्षमतांचा पुरेपूर वापर आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा खात्रीशीर परतावा देणारी बाजारव्यवस्था उभारावी लागेल, असेही डॉ. स्वामीनाथन म्हणाले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सध्याच्या दुर्लक्षित साधनांचा वापर करण्याची आपली तयारी हवी. हवामान अंदाज, सिंचन आणि नद्याजोड या विषयांकडे लक्ष द्यावे लागेल. नद्याजोड प्रकल्प राबविल्यास शेतीमध्ये अामूलाग्र बदल होऊ शकतो. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.’’ कृषी अवजारे व यंत्रांचा पुरेपूर वापर, आयात- निर्यात धोरणात सुधारणा आणि शेतीमध्ये राबणाऱ्या महिलांचे सबलीकरण अत्यावश्यक असल्याचे डॉ. स्वामिनाथन म्हणाले.

या वेळी राज्याच्या दहा जिल्ह्यांमधील एक हजार विद्यार्थी, तसेच राष्ट्रीय पुष्पोत्पादन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

भारताला सदाहरित क्रांतीची गरज विद्यार्थ्यांशी झालेल्या प्रश्नोत्तरात डॉ. स्वामिनाथन म्हणाले, की देशात हरितक्रांती झाली आहे. मात्र, आता आपल्याला सदाहरित क्रांतीची गरज आहे. शेती व्यवस्था चांगली नसल्यास इतर कोणत्याही व्यवस्था तग धरू शकत नाहीत. विद्यार्थ्यांनी शेतीआधारित उद्योजकतेकडे वळावे आणि कृषी शिक्षण घेताना प्रत्येक घटकाचे अर्थशास्त्र शिकावे. कमी कालावधीत बदलत्या हवामानाशी जुळणाऱ्या वाणांची निर्मिती आपल्याला हवी. जनुकीय सुधारणा असलेल्या पिकांचा बोलबाला होत असताना कोणतेही तंत्रज्ञान सरसकट चांगले किंवा वाईट नसते याचे भान आपण ठेवायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com