पिकं ऐन भरात अन् पाऊस गायब

भाळवणी, जि. नगर ः पावसाअभावी अनेक भागांत बाजरी जागेवर करपून गेली.
भाळवणी, जि. नगर ः पावसाअभावी अनेक भागांत बाजरी जागेवर करपून गेली.

नगर : ‘‘जिल्ह्यात सुरवातीच्या कालावधीत चांगला पाऊस बरसतो. लोक पेरणी करतात, खत मातीत मिसळतात, कापसाची लागवड करतात अन्‌ ऐन भरात पिकं आली की पाऊस गायब होतो. त्यामुळे खरिपाची पिकं वाया जातात. हे आता नित्याचच झालंय.

यंदा भरात आलेल्या पिकांना पाणी मिळालं नाही. मूग, उडीद, सोयाबीन जागेवर करपली. कापसाची वाढ खुंटली. पिकं गेली आणि पाऊस पुन्हा बरसला. खरीप तर करपलाच ना. झालेलं नुकसान कसं भरून काढणार. पाच-सहा वर्षांपासून खरिपाचं नुकसान होतंय. यंदा त्यात भर पडली. मात्र सरकारी यंत्रणेने दखल घेतली नाही. पावसाचे आकडे तेवढे फुगवून सांगितले,’’ असे सांगत नगर जिल्ह्यातील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यामध्ये पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर, कर्जत या नऊ तालुक्‍यांत पावसाचे प्रमाण तसे कमी असते. त्यात शाश्‍वत सिंचन नसल्याने शेती कायम धोक्‍यात. त्यामुळे या तालुक्‍याची गेल्या सहा वर्षांपासून होरपळ सुरूच आहे.

राहाता, राहुरी, अकोले, श्रीरामपूर तालुक्‍यांना भंडारदरा, मुळा, निळवंडेचा काहीसा आधार असला तरी दुष्काळात या तालुक्‍यांचीही होरपळ झालेली आहे. उसाचा पट्टा असलेल्या तालुक्‍यातही उसाचे क्षेत्र घटत आहे.

गेल्यावर्षी सुरवातीला पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरण्या जोमात झाल्या. मात्र नंतर पाऊस गायब झाल्याने खरीप वाया गेला. रब्बीची पेरणी झाली, अन्‌ त्यानंतरही बरेच दिवस पाऊस गायब झाल्याने रब्बीतही गतवर्षी मोठे नुकसान झाले होते.

यंदाही सुरवातीला चांगला पाऊस झाला, मात्र त्यानंतर गायब झालेला पाऊस खरीप वाया गेल्यावरच आला. त्यामुळे धरणात पाणी साठले, मात्र पावसाचा खरिपाला फायदा झाला नाही.

मूग, उडदाचे पीक हातचे गेले. तूर, कापसाची वाढ खुंटली, काही ठिकाणी तर तांब्याने पाणी घालून कापूस जगवावा लागला. बाजरीची वाढच झाली नाही. सोयाबीनला शेंगा आल्या नाहीत. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडदाचे सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उत्पादन घटले.

तीन लाख शेतकऱ्यांनी भरला विमा खरिपात नुकसान झाले. कृषी विभागासह समाजिक संस्था, राजकीय नेत्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे अवाहन केले. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून १ लाख १६ हजार ४७६ कर्जदार, राष्ट्रीयकृत बँकेतून १ लाख ९ हजार ७२०, व्यापारी बॅंकांतून १४ हजार २०४, सेतू सुविधा केंद्रांतून ६४ हजार ५४८ व थेट बॅंकेत ऑफलाइन ४ हजार २२३ अशा एकूण ३ लाख ९ हजार १७१ शेतकऱ्यांनी खरिपाचा पीकविमा उतरविला. यातून २ लाख १९ हजार हेक्‍टर क्षेत्र आणि ६२२ कोटी ८६ लाख रुपये संरक्षित झाले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी चौदा कोटी सात लाखांचा हप्ता भरला आहे. असे असले तरी आतापर्यंत अनुभव पाहता पीकविमा लागू होईल का, हा प्रश्‍न मात्र प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे. अनेक वेळा विमा भरून व नुकसान होऊनही फायदा मिळाला नसल्याने यंदा काही लोकांनी विमा भरला नाही.

कर्जमाफीची खात्री नाही नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ४ लाख ८५ हजार ४१६ शेतकऱ्यांनी १० सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसाठी नोंदणी केली आहे. त्यात २ लाख ३३ हजार ८६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज अपलोड केले आहेत. दरम्यान तातडीने दहा हजार रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केली होती. मात्र जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ १४ हजार २३ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केले असून, त्यातील फक्त ५ हजार ४७६ शेतकऱ्यांना तातडीच्या कर्जासाठी पाच कोटी ४३ लाखांचे वाटप झाले आहे. दुसरीकडे कर्जमाफी हवी असलेल्यांना शेतीचे काम सोडून तालुक्‍याच्या फेऱ्या माराव्या लागतात. तर दीड लाखावर कर्ज असलेल्यांना आधी त्यांच्याकडील उर्वरित कर्ज भरायला कशाला सांगता, असे प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत.

कोणीच दखल घेतली नाही दुष्काळातून सावरत शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. महागडी बियाणे, खते वापरली. मात्र पावसाअभावी सर्वांच्या डोळ्यांदेखत खरिपाची पिके वाया गेली. चांगला पाऊस झाल्याबाबत सरकारची यंत्रणा धिंडोरा पिटवते, मात्र झालेल्या नुकसानाची कोणीच दखल घेतली नाही. कोणत्याही विभागाचा अधिकारी शेताकडे फिरकला नाही. पंचनामे करण्याचे कोणी नाव घेतले नाही. आमदार, खासदार, मंत्री याबाबत चकार शब्दही बोलले नाहीत, याची सर्वांना खंत वाटत आहे. उत्पन्नच आले नसल्याने शेतकरी मात्र पुन्हा कर्जबाजारी झाला आहे.

१२ सप्टेंबरपर्यंत पावसाचे प्रमाण (मिलिमीटरमध्ये) तालुका     अपेक्षित    प्रत्यक्ष    टक्के अकोले        ४९३    ७९९    १६१.८७ संगमनेर     ४१६    ३७८    ९०.७३ कोपरगाव    ४४०    ३०३    ६८.६१ श्रीरामपूर    ४६९    ४६२    ९८.३२ राहुरी         ४७९    ४६२    ९६.३५ नेवासा       ५३१    ६५९    १२४ राहाता       ४४०    ५५३    १२५.६२ नगर        ५२४     ५४०    १०२.९९ शेवगाव     ५६३    ६२९    १११.७८ पाथर्डी       ५५०    ४९२    ८९.३२ पारनरे      ४७३    ४८४    १०२.१३ कर्जत       ५०५    ६३४    १२५.६८ श्रीगोंदा     ४४८    ४९७    १०८.५६ जामखेड   ६२६    ७०३    ११२.३८

जिल्ह्यातील पेरणीची स्थिती (हेक्‍टरमध्ये) पीक               सरासरी क्षेत्र    प्रत्यक्ष पेरणी    टक्केवारी तृणधान्य        २,५८,४४५      १,९६,३२३        ७५.९६ कडधान्य        ३९६२८          १,२०,३३८        ३०३.६७ गळीतधान्य     ७५,१३८        ८३,९२८           १११.७० कापूस            १,०५,४२७     १,२५,१३४         ११८.६९

दृष्टिक्षेपात पेरणी (क्षेत्र हेक्‍टरमध्ये) सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) ः ४ लाख ७८ हजार ६३८ प्रत्यक्ष पेरणी ः ५ लाख २५ हजार ७२३ पेरणीची टक्केवारी ः १०९.८४ टक्के

जलसाठ्याची टक्केवारी (कंसात क्षमता दशलक्ष घनफूट)

भंडारदरा    १०० (११०३९) मुळा    ८८.९६ (२६०००) निळवंडे    ९६.७९ (८३२०) आढळा    १०० (१०६०) मांडओहळ    ६३.४१ (३९९) घाटशीळ    १०.२३ (४४०) घोड    ९८.८३ (७६३९) खैरी    ५७.६० (५३३) सिना    १०० (२४००)

यावर्षी बाजरी, मूग, उडीद, तुरीचे पीक सुरवातीच्या काळात चांगले होते. मात्र पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ झाली नाही. नंतर झालेल्या पावसाचा खरिपाला काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे साधारण ७० ते ८० टक्के उत्पादन घटले. कापसाचा उताराही कमीच येणार आहे. त्यामुळे खरिपात पिकांवर झालेला खर्चही निघणार नाही. - मिलिंद बागल, शेतीचे अभ्यासक व शेतकरी, कर्जत.

खरीप हंगाम यंदा समाधानकारक नाही. बाजरी पेरली, कापसाची लागवड केली. मात्र पावसाअभावी पिके वाढली नाहीत. उत्पन्नात मोठे नुसकान होणार आहे. मात्र सरकारी पातळीवर कोणीही लक्ष दिले नाही. जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानभरपाई देणे गरजेचे होते. - संतोष ढोले, शेतकरी, दुलेचांदगाव, ता. पाथर्डी.

बऱ्याच वर्षांनंतर यंदा सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे लोकांनी कापसाची लवकर लागवड केली. बाजरी, मुगाचीही पेरणी केली. मात्र पिके वाया गेल्यावरच पाऊस येतो हे यंदाही स्पष्ट झाले. हाती येणाऱ्या उत्पादनात खर्चही निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण आहे. - राहुल देशमुख, शेतकरी, सुळे पिंपळगाव, ता. शेवगाव.

मी यावर्षी खरिपात मुग, बाजरीचे पीक घेतले. मुग पाऊस नसल्याने वाया गेला, तर बाजरी जास्त पाऊस असल्याने वाया गेली. बहूतांश शेतकऱ्याची खरिपातील पिके वाया गेली. शासनाने त्याची दखल घेणे गरजे होते. मात्र झालेले नुकसान पाहण्यासाठीही कोणी फिरकले नाही. - सुधीर चोभे, शेतकरी बाबुर्डी बेंद, ता. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com