श्रावण धारांचा सांगावा

मोठ्या खंडानंतर दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने खरिपातील काही पिकांना संजीवनी मिळाली असली, तरी राज्यावरील दुष्काळाचे सावट हटून सारेच आलबेल झाले, असे मात्र नाही.
श्रावण धारांचा सांगावा

‘पोळा अन्‌ पाऊस झाला भोळा’ ही म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात दर्श पिठोरी अमावस्येला (श्रावण अमावस्या) येणाऱ्या पोळा या सणापर्यंत म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस होतो. त्यानंतर उर्वरित ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये थोडा फार पाऊस (परतीचा पाऊस) पडून मॉन्सून राज्यातून आपला मुक्काम हलवतो; परंतु या वर्षी आत्तापर्यंत पडलेला पाऊस आणि इथून पुढील पावसाचा हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज पाहता पोळ्यापासून खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू झाला की काय, असा प्रत्यय शेतकऱ्यांसह सर्वांनाच येतो आहे. १५ ऑगस्टपर्यंत अर्धा महाराष्ट्र कोरडा होता. या दरम्यानच्या दोन मोठ्या खंडाने ५५ तालुक्‍यांवर दुष्काळाचे सावट गडद झाले होते. अशावेळी १९, २० ऑगस्ट या दोन दिवसांत राज्यभर पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाडा, विदर्भात हा पाऊस मुसळधार, मध्य महाराष्ट्रात दमदार, तर कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी अशा प्रकारे या पावसाचे स्वरूप आहे.  असा कसा रे पावसा येतो तुडवीत बहर नाही आला तरी शेती पार मेल्याहून कहर... एका कवीने पावसाचे केलेले हे वर्णन या वर्षीच्या आत्तापर्यंतच्या पावसाला तंतोतंत लागू होते. पावसाने सध्या लावलेल्या दमदार हजेरीपूर्वीच्या दोन मोठ्या खंडांनी राज्यातील जिरायती पट्ट्यात मूग, उडीद, सोयाबीन, मका, भात या पिकांचे मोठे नुकसान झालेलेच आहे. त्यातूनही वाचलेल्या पिकांना पावसाच्या या कृपादृष्टीने संजीवनी मिळाली आहे; परंतु दोन दिवसांच्या पावसाने दुष्काळ हटून सारे काही आलबेल झाले, असे मात्र मुळीच नाही. सध्याचा हा पाऊस सोयाबीन, तूर, कापूस, भात आणि मका या पिकांना पोषक म्हणावा लागेल; परंतु अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीने सखल भागात पाणी साठून खरीप पिकांचे नुकसानही झाले आहे. कापसामध्येही अचानक कोसळणाऱ्या पावसाने पाते गळ होणे, तसेच लाल पडण्याचे प्रकार बळावू शकतात. त्या दृष्टीने या पिकाची काळजी घ्यायला हवी. खरीप वाया गेलेल्या क्षेत्रात, नापेर क्षेत्रात लवकरच रब्बीची पेरणी करावयाची असल्यास हा पाऊस चांगला म्हणावा लागेल. त्यातच या वर्षी मॉन्सून उशिरा परतणार असल्याने राज्यातील काही भागांत सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे रब्बी ज्वारी, हरभरा, करडई, सूर्यफूल, गहू ही पिके चांगली येतील; परंतु सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये पाऊस पडत राहिल्यास सोयाबीन, ज्वारी, मका आदी पिके काढणीच्या वेळी पावसाच्या तावडीत सापडून नुकसान संभवते. एक सकारात्मक बाब म्हणजे दोन दिवसांच्या पावसाने नद्या, नाले खळखळून वाहताहेत, भूगर्भातील पाणीपातळीही वाढली आहे, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश धरणांची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या तात्पुरती काही अंशी मार्गी लागून रब्बीबाबतही थोडी शाश्‍वतता आली आहे; परंतु उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावेच लागेल. कारण, इथून पुढे चांगला पाऊस झाला नाही आणि आपले नियोजन नसेल तर उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू शकते. एकंदरीतच राज्यातील मागील काही वर्षांपासूनचे पाऊसमान पाहता शेतकरी, शास्त्रज्ञांसह शासनानेही जलसंवर्धन, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, पीकपद्धती, खरीप-रब्बी पिकांची लागवड आणि काढणीचे वेळापत्रक याबाबत चिंतन करून शाश्‍वत शेतीच्या दिशेने प्रयत्न वाढवायला हवेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com