संशोधनातून वाढेल निलगिरी मधोत्पादन
बॉन निंबकर
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मधमाश्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मी माझ्या पहिल्या लेखात नमूद केले आहे. त्या एका जातीच्या फुलांमधून मध घ्यायला लागल्या, की मग त्या दुसऱ्या जातीच्या झाडांवर जात नाहीत. त्यामुळे एकाच प्रकारचा मध मिळतो. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे एका वेळी अनेक जातींची निलगिरीची झाडे लावता येतात.

अॅग्रोवनमधल्या लेख मालिकेतील माझा पहिला लेख मधमाश्यापालनासंबंधीचा होता. त्यामध्ये इस्राईलमधून आणलेल्या निलगिरीच्या जातींबद्दल मी लिहिले होते. बारमाही फुले मिळतील या हिशेबाने मी वेगवेगळ्या वेळी फुलणाऱ्या आठ जाती मागवल्या. त्यातील E. torquata (युकॅलिप्टस टॉरक्वाटा) ही जात दोन वर्षांत फुलते असे माहीत होते, पण मागच्या वर्षीच्या जूनमध्ये लावलेले बी आताच म्हणजे एका वर्षभरातच फुलले आहे. याच्या फुलांची एक गंमतच आहे. कळ्या दिसायला लागल्यानंतर आम्ही वाट पाहत होतो, की त्या कधी उमलतायत. तर त्या तब्बल सहा महिन्यांनी उमलल्या आणि आता बी तयार व्हायला आणखी सहा महिने जाणार.

मधमाश्यांना केवळ फुलांमध्येच ‘रस’ असतो. २-३च फुले असूनही खूप मधमाश्या येतात. युकॅलिप्टस टॉरक्वाटा सोबतच E. woodwardii (युकॅलिप्टस वुडवर्दी) ही जातही सध्या फुलली आहे. गंमत म्हणजे ऑस्ट्रेलियात म्हणजेच दक्षिण गोलार्धात फुले येण्याचा काळ ऑगस्ट आणि सप्टेंबर असा दिला आहे. आपल्याकडेही ती आताच फुलली हे विशेष. 

युकॅलिप्टस टॉरक्वाटा किंवा कोरल गम हे कमी उंचीचे मध्यम आकाराचे झाड असते. त्याची साल खरखरीत असते आणि फांद्या बऱ्याच पसरतात. फुले मोठी, सुमारे ३५ मिमी व्यासाची गुलाबी रंगाची असतात पण पांढरी, किरमिजी आणि लालसुद्धा असू शकतात. युकॅलिप्टस वुडवर्दी २० ते ५० फुटांपर्यंत वाढते. याची साल गुळगुळीत असते आणि त्याला पिवळसर हिरवी फुले येतात.

युकॅलिप्टस टॉरक्वाटा, युकॅलिप्टस वुडवर्दी ही दोन्ही झाडे कोरड्या उन्हाळ्यांमध्ये वाढतात. त्यांना बारमाही पाण्याची गरज नसते. वर्षाला ३०० मिमी इतक्या कमी पावसातही ती चांगली वाढतात. ही शहरांमध्ये फुलझाडे म्हणून लावायला उत्तम आहेत. शहरी भागात मधमाशीपालनाला चांगले भविष्य आहे, कारण शेतात फवारण्यात येणारी कीटकनाशके शहरात फवारली जात नाहीत.

इस्राईलवरून मागविलेल्या निलगिरीच्या बियांच्या रोपांपासून शाकीय प्रजननाद्वारे आणखी रोपे तयार करून लोकांना विकायची असा आमचा मानस होता. परंतु सांगायला खेद वाटतो की थोड्यांच रोपांमध्ये या प्रयत्नांना यश मिळाले. घट्टा (callus) तयार झाले, परंतु मुळे फुटली नाहीत. अर्थात बी भरपूर मिळणार आहे. कळीपासून फुले होऊन बी मिळेपर्यंत जवळ जवळ ८ ते ९ महिने लागतात हे खरे, मात्र बी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकते. एका फुलात अंदाजे ३००० बिया असतात. म्हणजेच बियांपासून रोपे तयार करणे हे फार स्वस्त आहे.

ट्रेमध्ये बी विरळ पसरायचे, मग कोंब आले की चिमट्याने उचलून दुसऱ्या ट्रेमध्ये लावायचे, असे २-३ वेळा केले की रोपांची वाढ चांगली होते. बी फार लहान असल्याने एकेक लावता येत नाही. निलगिरीच्या या झाडांची एकच अडचण आहे. त्यांच्या फुलांमध्ये परपरागीभवन फार मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शुद्ध बीजोत्पादनासाठी वेगवेगळ्या जातींची झाडे एकमेकांपासून दूरदूर लावावी लागतील. 

वेगवेगळ्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या मधाच्या चवींमध्ये आणि औषधी गुणधर्मांमध्ये खूप फरक असल्याने वेगवेगळ्या मधाला मागणी असते. कारवी, गेळा, जांभूळ हे वेगवेगळ्या वेळी फुलतात त्यामुळे त्यातून वेगवेगळ्या प्रकारचा मध मिळतो. निलगिरीच्या वेगवेगळ्या जातींच्या फुलांच्या मधाची चवही वेगवेगळी असते. मधमाश्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मी माझ्या पहिल्या लेखात नमूद केले आहे. त्या एका जातीच्या फुलांमधून मध घ्यायला लागल्या, की मग त्या दुसऱ्या जातीच्या झाडांवर जात नाहीत. त्यामुळे एकाच प्रकारचा मध मिळतो. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे एका वेळी अनेक जातींची निलगिरीची झाडे लावता येतात. जरी एकाच वेळेला दोन जातींच्या झाडांना फुले आली (जशी आत्ता युकॅलिप्टस टॉरक्वाटा आणि युकॅलिप्टस वुडवर्दीला आली आहेत) तरी मधमाश्यांच्या या गुणधर्मामुळे मधाचे मिश्रण होत नाही. काही फुलांमधून मकरंद बराच मिळतो पण पराग कमी पडतात. अशा फुलांबरोबर भरपूर पराग देणाऱ्या दुसऱ्या जाती लावायला हव्यात. यासाठी कोणत्या जाती एकत्र लावायच्या याचे नीट व्यवस्थापन लागेल. संशोधनाची गरज आहेच, कारण उत्तर गोलार्धात कोणत्या जातीस कोणत्या काळात फुले येतात याचा अजून नीटसा अभ्यास झालेला नाही. इस्राईलकडून काही ही माहिती मिळालेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी पांढऱ्या क्रांतीसोबतच मधाची क्रांती व्हावी असे मनावर घेतले होते. त्यासाठी ते इस्राईलला भेटही देऊन आले. पण इस्रायली संशोधक आपली माहिती शक्यतो बाहेर प्रकाशित करत नसल्याने फारसे काही हाती लागले नाही.
त्यामुळे निलगिरीच्या या ८ जाती लावल्या की काम संपले असे नाही. आणखी संशोधनाची नक्कीच गरज आहे. दुर्दैव म्हणजे ‘मधमाश्या संशोधन संस्थे’ला (बी रिसर्च इन्स्टिट्यूट) या संशोधनात काहीच रस नाही. हे संशोधन करण्यासोबतच आणखी नव्या जाती ऑस्ट्रेलियामधून आणून लावण्याचा नारी संस्थेचा मानस आहे. याने जैवविविधतेत नक्कीच वाढ होईल. बाहेरून जाती आणणे हे बहुतेक पर्यावरणवाद्यांना पटत नाही. त्यांच्या नजरेस एक खास गोष्ट मला आणून द्यायची आहे. युकॅलिप्टस वुडवर्दी च्या फोटोत उजव्या बाजूला शिंपी पक्ष्याने बांधलेले घरटे स्पष्ट दिसत आहे. आसपास अनेक झाडे उपलब्ध असताना ‘आपल्या’ पक्ष्याने घरट्यासाठी हे ‘परदेशी’ झाड का बरे निवडले असेल?

-   बॉन निंबकर
 : ०२१६६-२६२१०६
(लेखक निंबकर कृषी संशोधन 
केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
शब्दांकन : मधुरा राजवंशी

इतर संपादकीय
‘बांबू’चा भक्कम आधारबहुपयोगी बांबूचे राज्यात अपेक्षित प्रमाणात...
कृषी परिषदेच्या चुकीची शिक्षा...दिनांक १२ व १३ सप्टेंबरच्या ॲग्रोवनच्या अंकात...
वृक्ष ः नदीचे खरे संरक्षकभगीरथाने घोर तपश्‍चर्या केली आणि गंगानदी धरतीवर...
देशी पशुधनाचे कोरडे कौतुकदेशी पशुधनाची दूध उत्पादकता कमी आहे. ती...
पणन मंडळ व्हावे अधिक सक्षम केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या नवीन मॉडेल ॲ...
वळू विनाश ही धोक्‍याचीच घंटागोऱ्हा नको, रेडा नको, बैल नको, नरवासरे नकोच नको...
कष्टकरी उपाशी, आईतखाऊ तुपाशीगत काही दिवसांत मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अन्य...
मार्ग गतिमान अर्थव्यवस्थेचामागणीच नसल्यामुळे उत्पादन क्षेत्राला आलेली मरगळ,...
रानफुलांची व्यावसायिक वाटजगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या कास पठारावरील अत्यंत...
कार्यवाहीत हरवलेली कर्जमाफीकर्जमाफीच्या अंमलबजावणीतील गोंधळामुळे भाजप...
संरक्षित सिंचनाचे शास्त्रीय सत्यसंरक्षित सिंचनाची जोड देण्यासाठी जिरायती...
पीक संरक्षणातील एक नवे पर्वमातीचे अनेक प्रकार आणि त्यास वैविध्यपूर्ण...
नियोजनातून उतरेल भारनियमनाचा भारअतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तींमुळे औष्णिक वीज...
सर्वसमावेशक विकासाच्या केवळ गप्पाचइंदिरा गांधींच्या सत्ताकाळात देशात हरितक्रांती...
भांडवल संचयासाठी शेतीची लूटमाझी वडिलोपार्जित ५० एकर शेती आहे. कमाल जमीन...
खुल्या निर्यातीचा लाभ कोणास?तुर, मूग, उडीद डाळींवरील निर्यातबंदी उठविण्याचा...
पीक, पूरक उद्योगांवर दिसतोय...सद्यस्थितीमध्ये दर वर्षी कमाल व किमान...
ओझोनला जपा तो आपल्याला जपेलवातावरणात तपांबर (ट्रोपोस्पीअर) हा ...
‘कॉर्पोरेट फार्मिंग’च्या यशासाठी...सध्याच्या शेतीत उद्भवणाऱ्या बहुतांश समस्यांचे मूळ...
अल्प दिलासा की शाश्‍वत आधार?महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या...