नव्या वर्षाचा सांगावा

नव्या वर्षाचा सांगावा
नव्या वर्षाचा सांगावा

संकटांनी खचून न जाता संघर्षाच्या वाटेवर चालण्याचं बळ सरत्या वर्षाने शेतकऱ्यांना दिलं. नवीन वर्ष बदल घडवण्याची ऊर्मी घेऊन आलं आहे. नव्या वर्षाचा आज पहिला दिवस. नवीन वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडरचं पान बदलत नाही तर अंधाराच्या कुशीतून एक नवी पहाट उमलत असते. शेतकऱ्यासाठी तर रोजचा दिवस नवाच असतो. कारण तो नवी आव्हानं आणि प्रश्न घेऊनच उगवलेला असतो. सरतं वर्ष तर खूपच धामधुमीचं गेलं. हे वर्ष अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरलं. कारण या वर्षात अनेक ऐतिहासिक घडामोडी झाल्या. नवी वादळं जन्माला आली. नोटाबंदीचा निर्णय, जीएसटीची अंमलबजावणी, तुरीचे विक्रमी उत्पादन, मराठा क्रांती मोर्चे, शेतकरी संप, कर्जमाफी, देशात आणि राज्यात शेतकरी आंदोलनांचा उडालेला भडका यांसारख्या घटनांनी अवघा आसमंत घुसळून निघाला. अस्मानी संकटाने जेरीस आलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या अन्यायकारक धोरणांमुळे सुलतानी संकटांचाही सामना करावा लागला. सर्व प्रमुख शेतमालाच्या किमती कोसळल्या. एकूण ग्रामीण अर्थकारणाला फटका बसला. पण त्यामुळे खचून जाऊन शस्त्र टाकून देण्याऐवजी निखाऱ्यांनी भरलेल्या संघर्षाच्या वाटेवर चालण्याचं बळ सरत्या वर्षाने शेतकऱ्यांना दिलं.  सरकार- मग कोणत्याही पक्षाचं असो- `शेतीच्या मूळ प्रश्नाला हात न घालता शेतकऱ्यांना नेहमी याचक किंवा भिकाऱ्याच्याच भूमिकेत ठेवायचं` आणि `शहरी ग्राहकांच्या दाढीला तूप लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायची` या दोन चौकटीतच शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळते. पण या चौकटीला हादरे देणारा संघर्षाचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. शेतकऱ्यांचा उद्रेक आणि असंतोष तीव्रतेने प्रकट झाला. अजिंक्य भासणाऱ्या भाजप, नरेंद्र मोदी आणि उजव्या हिंदुत्ववादी शक्तींचा घोडा अडवण्याचं काम शेतकरी आंदोलनाने केलं आणि त्यामुळे राजकीय अजेंड्यावर शेतीचे प्रश्न अग्रक्रमावर आले. गुजरातच्या निकालामुळे शेतकऱ्यांची नाराजी महागात पडू शकते, याची चुणूक मिळाली आहेच. काही राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर थोड्याच कालावधीत अपेक्षित असलेली लोकसभा निवडणूक लक्षात घेता आता शेतकरीविरोधी धोरणांत बदल करण्याची अपरिहार्यता सत्तापक्षाला लक्षात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षात सकारात्मक बदल घडण्याची आशा आहे.  संकटं आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जिद्द, प्रयोग आणि सर्जनशीलतेच्या बळावर अनेक बहाद्दर शेतकऱ्यांनी आपल्या कर्तृत्वाची मोहोर सरत्या वर्षावर उमटवली. `ॲग्रोवन`ने अशा काही शेतकऱ्यांचा गौरव नुकताच केला. भविष्याची आव्हाने लक्षात घेऊन ‘ॲग्रोवन’ने जमिनीची सुपिकता हा विषयही ऐरणीवर आणला आहे. २०१८ हे वर्ष जमीन सुपिकता वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. मातीशी इमान राखणारे शेतकरी म्हणजे कृषी संस्कृतीचे खंदे शिलेदार आहेत. शेतकऱ्यांमधली ही ऊर्जा जोवर कायम आहे, तोपर्यंत निराशेने हतबल होण्याचे काही कारण नाही. शेती हा दहा तोंडांचा रावण आहे. प्रश्नांची गुंतागुंत आणि व्याप्ती प्रचंड आहे. ही लढाई ही दीर्घ पल्ल्याची आणि दमछाक करणारी आहे. पण एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता बाळगणारा शेतकरी आता संघर्षाची वज्रमूठ करून पाय रोवून उभा राहत अाहे. छोटे-मोठे पराभव पचवत चिवट झुंज द्यायला तो सज्ज आहे.  ‘दाटला काळोख होता चहु दिशांना, नीरवाचा शाप होता वेदनांना त्याच काळोखांतूनी पण सूर आले, विंधलेल्या काळजाचे गीत झाले’ हीच भावना नवे संदर्भ घेऊन मुखर होत आहे. नव्या वर्षाचा हाच सांगावा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com