'वनामकृवि'तील अकराशे पदे रिक्त

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : डिसेंबर २०१७ च्या तिमाहीअखेर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विविध संवर्गातील १ हजार १०३ पदे रिक्त झाली आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्माचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याचा खोळंबा झाला आहे. या रिक्त पदांमुळे विद्यापीठाला अधिस्वीकृती राखण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.

मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांतील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी जनआंदोलन करण्यात आले होते. लोकभावनेतून १९७२ मध्ये अस्तित्वात आलेल्या या कृषी विद्यापीठाने गेल्या ४५ वर्षांत संशोधित केलेले कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, करडई आदी पिकांचे अनेक वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. अनेक माजी विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासाठी एकूण २ हजार ९०४ पदे मंजूर आहेत, यापैकी दोन पदे प्रतिनियुक्तीने भरली जातात. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शिक्षण परिषदेने शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या संचालकांची तीन पदे, काही विभागप्रमुखांची पदे भरली आहेत.

दर महिन्याला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रिक्त पदांची संख्या वाढत आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत तिमाहीअखेरपर्यंत विविध संवर्गातील १ हजार १०३ पदे रिक्त झाली आहेत. सध्या कुलसचिव पद रिक्त आहे. विद्यापीठांतर्गत १२ घटक महाविद्यालयांपैकी ७ महाविद्यालयांच्या सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्याची पदे रिक्त आहेत. विभागप्रमुखांची ४ पदे, प्राध्यापकांची २६ पदे, सहयोगी प्राध्यापकांची ७८ पदे, कार्यक्रम समन्वयकांची २ पदे, सहायक प्राध्यापकांची ९७ पदे, विद्यापीठ अभियंता, सुरक्षा व निगराणी अधिकारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी यांची पदे रिक्त आहेत.

अ संवर्गातील एकूण ५९१ पैकी २३६ पदे रिक्त आहेत. वरिष्ठ संशोधन सहायकांच्या (कृषी) ७८ पैकी ३३ पदे, वरिष्ठ संशोधन सहायक (अन्नतंत्र) ६ पैकी ५, वरिष्ठ संशोधन सहायक (जैवतंत्रज्ञान) सर्व ४ पदे रिक्त आहेत. ब संवर्गातील एकूण १७८ पैकी ८५ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ कृषी सहायकांची ७२ पैकी ४३, कृषी सहायकांची २८८ पैकी १२८ पदे अशी क संवर्गातील ७४४ पैकी ३४७  पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा सेवकांची १९, मजुरांची २९२, शिपायांची ४२, पहारेकऱ्यांची ४६ पदे अशी ड संवर्गातील १ हजार ३८८ पैकी ४३४ पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीने भरण्यात येणारे कक्ष अधिकाऱ्याचे १ पद रिक्त आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com