सोलापूर बाजार समितीतील सव्वाशे कर्मचाऱ्यांचा पगार रखडवला

आम्ही कायदेशीर निर्णय घेतला आहे. मी स्वतः काहीच करू शकत नाही. त्यामुळे याबाबत काय बोलणार, पण येत्या दोन दिवसांत या प्रश्‍नावर काही तरी तोडगा निघेल, हा प्रश्‍न सुटेल. - कुंदन भोळे, शहर उपनिबंधक तथा प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर.
सोलापूर बाजारसमिती
सोलापूर बाजारसमिती
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे १५ वर्षांहून अधिक काळ हंगामी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सुमारे सव्वाशे कर्मचाऱ्यांना बाजार समितीच्या प्रशासकांनी अचानकपणे त्यांच्या पदांना खात्याची मंजुरी नाही, असे सांगत आपल्याला पगारासह अन्य सुविधा का द्याव्यात, अशा नोटिसा बजावल्या आहेत. पण, पदांना मंजुरी नव्हती, तर इतकी वर्षे कर्मचाऱ्यांचा पगार काढलाच कसा, हा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
 
प्रशासकांच्या या निर्णयाने कर्मचारी मात्र चांगलेच धास्तावले आहेत. काही कर्मचारी तणावाखाली आहेत, तर काहींनी थेट न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरवले आहे. 
 
दरम्यान, राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याच मतदारसंघात बाजार समितीचे कर्मचारी असे वाऱ्यावर सोडल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. 
सोलापूर बाजार समितीमध्ये ७३ कायम आणि हंगामी १२६ कर्मचारी आहेत. सुमारे पंधरा वर्षांपासून हंगामी कर्मचारी कामावर आहेत. त्यामध्ये कनिष्ठ लिपिकापासून बिगारी, शिपाई, वॉचमन यांचा समावेश आहे.
 
गेल्यावर्षी बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली. पण नव्या संचालक मंडळाची निवडणूक होईपर्यंत बाजार समितीवर शहर उपनिबंधक कुंदन भोळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. आता त्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. पण प्रशासकांनी अचानकपणे घेतलेल्या काही निर्णयामुळे बाजार समितीच्या प्रशासनामध्ये खदखद निर्माण झाली आहे. 
 
दोन महिन्यांपूर्वी जुलैमध्ये त्यांनी हंगामी कर्मचाऱ्यांचे सह्याचे मस्टर बदलले. तसेच तेव्हापासून दोन महिन्यांचा पगारही रखडवला आहे. आता अलीकडे १ सप्टेंबरला सर्व १२६ हंगामी कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात आपल्या पदांना खात्याची मंजुरीच नाही, तर आपल्याला कामावर का ठेवावे आणि पगारीसह अन्य सुविधाही का द्याव्यात, अशी थेट विचारणा केली आहे.
 
विशेष म्हणजे ते प्रशासक असताना आठ-नऊ महिने या कर्मचाऱ्यांचा पगार त्यांनीच काढला. शिवाय सुमारे पंधरा वर्षांपासून हे कर्मचारी कार्यरत आहेत. पण इतकी वर्षे ही पदे बेकायदेशीर होती, तर पगार कसा निघत होता, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
बाजार समितीचे सचिव निवृत्त झाल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पदभार देण्यात आला होता. पण प्रशासकांनी त्यांच्याकडील पदभार अचानकपणे काढून नव्या अधिकाऱ्याकडे सोपवला. त्यामागेही विशिष्ठ कारण असल्याचे सांगितले जाते. पण त्यामध्ये कारणापेक्षा प्रमोशन, डिमोशनचे राजकारण अधिक असल्याचे बोलले जाते. 
प्रशासकांनी दिलेल्या या नोटिशीने कर्मचारी धास्तावल्याने प्रचंड तणावाखाली आले आहेत. त्यामुळे ते फारसे कोणाशी बोलायलाही तयार नाहीत. पुढे येऊन काय, असेही ते खासगीत सांगतात. तर याच कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५५ जणांनी प्रशासकाच्या या कारवाईला कायदेशीररीत्या सामोरे जाण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com