रोजगार हमी योजना गैरव्यवहार चौकशी समितीवरच संशय

रोजगार हमी योजना गैरव्यवहार चौकशी समितीवरच संशय
रोजगार हमी योजना गैरव्यवहार चौकशी समितीवरच संशय

सोलापूर : मोहोळ तालुक्‍यातील सावळेश्‍वर येथील रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाला असल्याच्या अनेक तक्रारीनंतर जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमली. पण ही समिती निःपक्षपातीपणे चौकशी करीत नसून हा गैरव्यवहार दडपण्यासाठी मोठ्या आर्थिक व्यवहारातून कार्यालयाऐवजी हॉटेलवर चौकशी सुरू असल्याचे समोर आले आहे. या समितीकडून न्याय मिळण्याची खात्री देता येत नाही, त्यामुळे ही समिती बदलावी अन्यथा आम्ही न्यायालयात जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य अजिंक्‍यराणा पाटील यांनी दिली आहे.

"सकाळ-ॲग्रोवन''मध्ये या गैरव्यवहाराची सविस्तरपणे वृत्तमालिका प्रसिद्ध झाल्यानंतर सगळ्यांचेच या प्रश्‍नाकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे हा विषय सध्या चर्चेचा झाला आहे. दरम्यान, या सगळ्या पार्श्‍वभूमीवर चौकशी समितीचे प्रमुख भारत ऐवळे यांना विचारले असता, आमची समिती ही वस्तुस्थितीला धरून व कागदपत्रांच्या आधारे चौकशी करीत आहे. सत्यस्थिती जाणून घेऊन खरा तोच अहवाल वरिष्ठांकडे देणार आहोत. भूक लागली म्हणून हॉटेलवर जेवायला गेलो. जेवण करणे गुन्हा आहे का?, अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले. 

दुसरीकडे ही चौकशी समिती तातडीने बरखास्त करावी, असे सांगताना श्री. पाटील म्हणाले, "चौकशी समितीने चौकशी करण्यापेक्षा हा घोटाळा दडपण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी संधी देऊन मार्गदर्शन करीत आहे. चौकशी ही कार्यालयात करणे बंधनकारक असताना संशयितांसह ती हॉटेलवर केली जाते आहे. सत्ताधारी व अधिकारी यांच्या साटेलोटे आर्थिक व्यवहारातून चालले आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी अगदी वरपासून खालपर्यंत मॅनेज अशी हॉटेलवर चौकशी सुरू आहे. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ही समिती बदलून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करावी.'''' 

चौकशी समिती हा गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. गटविकासाधिकारी व सहायक गटविकासाधिकारी यांना हाताशी धरून  ग्रामसेवक, लिपिक, विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर दबाव टाकत आहे. त्यामुळे समिती बदलली पाहिजे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहे, असे तक्रारदार धनाजी गावडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com