एक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही : घनवट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात आलेल्या संपातील मागण्या शेतकरी हिताच्या नसून, शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सरकारवर अवलंबून ठेवणाऱ्या आहे. यामुळे शेतकरी संघटना या संपात सहभागी होणार नसल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे.

सध्या शासन देत असलेल्या आधारभूत किमती, प्रत्यक्ष उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के कमी आहेत. तरी नोंदणी केलेला शेतीमालसुद्धा शासनाला खरेदी करता येत नाही. त्यासाठी आवश्यक संरचना सरकारकडे नाही. गोदामे, काटे, बारदाना, सुतळी, मनुष्यबळ व पैसेही नाहीत. खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांचे प्राण जात आहेत, अशा परिस्थितीत शासनाकडून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमीभावाची अपेक्षा करणे हास्यास्पद आहे.

स्वामिनाथन आयोगातील अनेक शिफारशी शेतकरी विरोधी आहेत तसेच या संपातील अनेक मागण्या अव्यवहार्य व शेतकऱ्याला स्वावलंबी करण्यापेक्षा सरकारच्या दारातील याचक बनविणाऱ्या आहेत. भारतातील शेतकऱ्यांना संरक्षणाची नव्हे तर स्वातंत्र्याची गरज असून व्यापार स्वातंत्र्य, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य, आवश्यक संरचना, प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास व घटनेत घुसडलेले परिशिष्ट ९ मधील शेतकरी विरोधी, शेती विरोधी कायदे रद्द केल्यास भारतातील शेतकरी जगाच्या बाजारपेठेत स्पर्धा करू शकतो व कर्जमुक्त होऊ शकतो.

ज्या सरकारला आता नोकरांचे पगार करणेसुद्धा मुश्‍कील झाले आहे. लाखो कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजा खाली दबलेले आहे त्या सरकारकडून संरक्षणाची अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे.

शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या संपात सहभागी होणार नाहीत, मात्र कोणाला सहभागी होण्यापासून रोखणार नाहीत. या संपात काही हिंसक प्रकार घडल्यास त्याला शेतकरी संघटना जवाबदार राहणार नाही, असे शेतकरी संघटनेच्या माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी कळवले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com