दर्जेदार डाळिंबासाठी जमिनीच्या आरोग्यावर हवे लक्ष

सोलापूर येथील चर्चासत्रात मार्गदर्शन करताना डॉ.विनय सुपे.
सोलापूर येथील चर्चासत्रात मार्गदर्शन करताना डॉ.विनय सुपे.

सोलापूर : डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमीन आणि पिकाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. त्यावरच उत्पादनाची क्षमता ठरू शकते. त्यामुळे कोणतीही खते वा कृषी रसायने यांचा अनियंत्रित वापर न करता गरजेनुसार समंजस वापर करावा,’’ असे मत पुण्याच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे यांनी रविवारी (ता. १७) येथे व्यक्त केले.

‘सकाळ-अॅग्रोवन’तर्फे आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनामध्ये ‘डाळिंबाचे दर्जेदार उत्पादनासाठी सुधारित तंत्रज्ञान व तेलकट डागाचे नियंत्रण’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. सुपे बोलत होते. अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, राजाभाऊ येलपले आदी यावेळी उपस्थित होते. 

डॉ. सुपे म्हणाले, की डाळिंबाची लागवड करताना गुटीकलम, छाट कलम किंवा बी लागवडीच्या पद्धतीने करावी. टिश्‍यूकल्चरबाबत मात्र थोढीशी चिंता वाटते. त्याबाबत कोणत्याही विद्यापीठाने शिफारस केलेली नाही. तरीही त्याचा आग्रह धरला जातो, पण त्याचा फेरविचार व्हावा असे वाटते. एकसारखे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल, तर थोडी सबुरी ठेवा, घाईगडबड न करता खते, कीडनाशके आणि पाण्याचे नियोजन व्हायला पाहिजे. पाणी देण्याची पद्धतही बदलली पाहिजे. झाडाच्या बुडात ठिबक पाइप ठेवण्यापेक्षा झाडापासून लांब झाडाच्या सावलीपर्यंत लांब पाइप ठेवावे. त्या ठिकाणीच तंतुमय मुळ्या असतात. त्यांना पाण्याची गरज असते. त्यामुळे झाडाच्या परिसरात सातत्याने ओलावा राहील. जमीन वाफशाला राहील. शिवाय झाड सशक्त आणि ताकदीचे बनेल.

या सगळ्यामध्ये डाळिंबाच्या जमीन आणि पिकाच्या आरोग्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे झाडाची ताकद समजू शकते. झाड रोगास प्रतिकारक्षम आहे, हे समजू शकेल. खतावर नियंत्रण आणता येईल. छाटणी करताना झाडाच्या चार दिशांना चार खोडे ठेवावीत, खालून येणारे फुटवे, सरळ वाढणारे सोट, आडव्या फांद्या, मेलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात, फांदीच्या टोकाला येणारी फळे काढत राहावीत, जमिनीपासून अडीच फुटापर्यंत फुटवे काढत राहावेत. झाडाची मुळे कायम सूर्यप्रकाशात राहिली पाहिजेत, असेही डॉ. सुपे म्हणाले.

तोडणी झाल्यानंतर एकास अडीच - अडीच या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. साधारण ३० ते ३५ दिवस पाणी द्यावे, कमीत कमी ६० ते ७५ दिवस बागेस विश्रांती द्यावी, नवीन बहर घेण्याच्या २० ते २२ ओगदर दिवासआड झाडाखाली चाळणी, मुळांची छाटणी व हलकी छाटणी करावी, असेही डॉ. सुपे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com