कर्जमाफी : जलद छाननी प्रक्रियेसाठी विशेष सॉफ्टवेअर

ओटीपीच्या माध्यमातून तपासणी करून पात्र लोकांची यादी तयार करण्यात येत आहे. आपल्या गावात घरबसल्या अर्ज क्रमांक टाकल्यानंतर यादीत असणाऱ्या लोकांची माहिती पोर्टलवर दिसू शकते.
कर्जमाफी प्रक्रियेसाठी विशेष सॉफ्टवेअरची मदत
कर्जमाफी प्रक्रियेसाठी विशेष सॉफ्टवेअरची मदत

मुंबई : सहकार खात्याने योजनेच्या अंमलबजावणीसाठी युद्धपातळीवर तयारी केली आहे. शेतकऱ्यांच्या अर्जासोबत बँकांकडून ६६ कॉलमचा अर्ज भरून घेतला जात आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने निर्मिलेल्या विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने कमी कालावधीत शेतकऱ्यांचे अर्ज आणि बँकांची माहिती याची ऑनलाइन खातरजमा केली जाईल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जाणार आहे.

शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरल्यानंतर आता त्यानंतरची प्रक्रिया कशी राहणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. याकामी सहकार विभागाच्या सतराशे लेखापरीक्षकांची मदत घेतली जाणार आहे. गरजेनुसार इतर बँकांच्या लेखापरीक्षकांची मदत घेण्याचा विचार आहे. योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दाद मागण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष कार्यरत असणार आहे.

राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. योजनेंतर्गत दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे. त्यांचे मध्यम मुदतीचे कर्जदेखील माफ करण्यात येत आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत. त्यांना २५ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे.

सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध असणार येत्या २२ सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी सुरू होईल. ऑनलाइन अर्ज भरताना शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव, बँकेचा खाते क्रमांक, आधारकार्ड अशी प्राथमिक माहिती या प्रक्रियेसाठी दिली आहे. यात कुणी चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरली आहे का, त्याची छाननी करण्यात येणार आहे.

३० जून २०१६ पर्यंत किती थकबाकीदार आहेत. किती लोकांनी कर्ज घेतले आहे. कर्जाचे पुनर्गठन किती? किती लोकांचे हप्ते बाकी आहेत. किती लोकांनी विहित मुदतीपर्यंत कर्ज परतफेड केली आहे. किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत कर्ज घेतले आहे आणि त्या कर्जाची परतफेड केली आहे का? ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी सहकार खात्याकडून अर्जाचा एक नमुना तयार करण्यात आला आहे. हा ६६ कॉलमचा फॉर्म सर्व बँकांकडून भरून घेण्यात येत आहे.

ही एकत्रित माहिती कर्जमाफीच्या वेबपोर्टलवर टाकण्यात येईल. कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या बँकेतून, कोणत्या शाखेतून किती कर्ज घेतले आहे, अशी सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे अर्ज आल्यानंतर किती अर्ज आधारकार्डला लिंक केले आहेत. आणि ज्या अर्जदारांनी लिंक केलेले नसतील. अशांचे कार्ड लिंक करावे, अशा सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन तपासणीमुळे प्रक्रिया जलदगतीने अर्ज भरण्याची मुदत संपून सर्व माहितीचे एकत्रित संकलन झाल्यानंतर राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून शेतकऱ्यांनी भरलेल्या अर्जांची आणि बॅंकांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी आतापर्यंत सुमारे ५६ लाख शेतकरी कुटुंबांचे अर्ज आले आहेत. येत्या तीन दिवसांत यात आणखी काही वाढ होईल असे गृहीत धरले आहे. त्यामुळे या लाखो अर्जांच्या छाननीला खूप वेळ लागेल अशी शंका व्यक्त केली जात आहे.

मात्र, यातला कालापव्य टाळण्यासाठी राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने एक विशेष सॉफ्टवेअर तयार केले आहे. या ऑनलाइन तपासणीमुळे छाननी प्रक्रिया जलदगतीने होऊ शकणार आहे. याकामी सहकार खात्याकडील सुमारे सतराशे लेखापरीक्षकांची मदत घेतली जाणार आहे. गरजेनुसार इतर बँकांच्या लेखापरीक्षकांची मदत घेण्यासंदर्भातही सहकार खात्याच्या पातळीवर विचार सुरू आहे.

ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर जे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट आहे.

मृत शेतकरी, बहुखातेधारकांसाठीही सुविधा कर्जदार शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल किंवा एखाद्या कुटुंबातील २ ते ३ लोकांची खाती असतील तर त्यांच्यासाठी असणार आहे. कर्जदाराचा मृत्यू झाला असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी बँकेत जाऊन त्यांच्या हिश्‍श्याची रक्कम निश्चित करून घ्यावी. रकमेची फोड करून प्रत्येकाच्या वाट्याला किती रक्कम आहे.

त्याची माहिती अर्जाद्वारे बँकांना द्यावी. तसेच मृत व्यक्तीचे वारस एकापेक्षा अधिक असतील तर बँकांमध्ये जाऊन प्रत्येकी आपल्या नावे किती हिस्सा येणार हे निश्चित करावे. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी त्याची संपूर्ण माहिती बँकांना द्यावी. अशांनाही कर्जमाफीचे लाभ देण्याचा निर्णय झाला आहे. अर्ज नामंजूर झालेल्यांसाठी संधी ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीतून वंचित राहिले किंवा अर्ज नामंजूर झाला आहे अशांसाठी कर्जमाफीच्या यादीत २ ते ३ प्रकारचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. जे शेतकरी कर्जमाफी यादीत येतील त्यांची संपूर्ण माहिती पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. ओटीपीच्या माध्यमातून तपासणी करून पात्र लोकांची यादी तयार करण्यात येत आहे. आपल्या गावात घरबसल्या अर्ज क्रमांक टाकल्यानंतर यादीत असणाऱ्या लोकांची माहिती पोर्टलवर दिसू शकते.

ज्यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, त्यांची नावे देखील यादीत दिसू शकतील. तसेच तालुका पातळीवरसुद्धा ही यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याठिकाणी शेतकरी दाद मागू शकणार आहेत. त्रुटी दूर करून अशा शेतकऱ्यांनाही योजनेत सामावून घेतले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com