वऱ्हाडात शेतकरी आत्महत्या थांबता थांबेनात

वऱ्हाडात शेतकरी आत्महत्या थांबता थांबेनात

अकोला ः कधीकाळी समृद्ध प्रदेश म्हणून वऱ्हाडाची ओळख दिली जायची. सध्या मात्र हा प्रदेश शेतकरी आत्महत्यांनी काळवंडला आहे. दर दिवसाला कुठेना कुठे शेतकऱ्याने स्वतःचे जीवन संपविल्याची बातमी येत राहते.

नापिकी, कर्जाचा वाढत असलेला बोजा यासह विविध कारणांमुळे आत्महत्या घडत असतात. २००१ पासून आजवर म्हणजेच गेल्या १७ वर्षांत वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये साडेपाच हजारांवर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

राज्यात कर्जमाफीची घोषणा झाली असतानाही आत्महत्येत पीक परिस्थितीच्या कारणाने दररोज वाढ होत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाची कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशन तसेच आता पुन्हा एकदा कर्जमाफीची घोषणा झाली. यासोबतच शासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जातात. मात्र एवढ्या सगळ्या ''उपचारांनी'' शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत.

कर्जमाफी किंवा तत्कालिक उपाययोजना करून हा मुद्दा निकाली निघणारा नाही. शेतकऱ्यांना निराशेच्या मार्गातून बाहेर काढण्याचे काम शासनासह सर्वांनाच करावे लागणार आहे. निसर्गाचा लहरीपणा, शासनाची शेतकरी विरोधी धोरणे, शेतीमालाला न मिळणारा भाव व आर्थिक परिस्थिती अशा विविध कारणांनी शेतकरी आत्महत्याच्या घटना घडत आहेत.

शासनाकडून विविध प्रकारचा अभ्यास झाला, समित्यांचे गठण होऊन उपाययोजना केल्या गेल्या. यातून काहीही चांगले घडलेले नाही. शेतकरी आत्महत्यांचा आगडोंब कायम आहे.

शेतकरी आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा हे प्रमुख कारण आहे. शेतकऱ्यांसाठी दिलेली कर्जमाफी, विविध प्रकारचे उपाय हे केवळ जुजबी उपचार असल्याची सातत्याने टीका होत असते. त्यात सत्यता असल्याचेही काही अंशी मानले जातेे. या भागात ७५ टक्‍क्‍यांवर शेती ही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे बारमाही पिके घेणे शक्‍य नाही.  पाऊस चांगला झाला तर पिके येतात. परंतु पिके येऊनही बाजारात भाव मिळत नसल्याचे प्रकार घडतात.

गेल्या हंगामात शेतकऱ्यांना तूर, सोयाबीनला साधा हमीभाव मिळवताना सुद्धा नाकीनऊ आले. या वर्षी आता खरीप हंगामाची कमी पावसाने वाट लावली. मूग, उडदाची उत्पादकता घसरली. सोयाबीनच्या झाडांवर शेंगा लागलेल्या नाहीत. कापसाची स्थिती तितकी चांगली नाही.

एकूणच याही खरीप हंगामावर संकटांचे ढग आहेत. संकटे, समस्यांचे हे चक्र काही केल्या सुटलेले नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका स्वीकारतो.

२००१ ते आतापर्यंत झालेल्या जिल्हानिहाय आत्महत्या बुलडाणा    २२४८  अकोला    १९५८ वाशीम    १३८१ एकूण    ५५८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com