कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांवर कर्ज घेण्याची वेळ

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांवर कर्ज घेण्याची वेळ

कोल्हापूर : दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ होण्यासाठी जादा कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज रक्कम भरावी लागणार असून, त्यासाठी रक्कम उभी करण्यासाठी शेतकरी पै पाहुण्यांबरोबरच सावकारांचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र आहे. यामुळे कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पुन्हा सावकारी कर्ज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सरकारने गेल्या महिन्यात कर्जमाफीचा निर्णय घेतला; पण ती सरसकट न करता अनेक अटी लावून व तांत्रिक निकष कडक करून शेतकऱ्यांना दिली. यामुळे प्रत्येक निकष पार करणे ही शेतकऱ्यांची डोकेदुखी बनत असल्याचे गावागावांत चित्र आहे.

धीम्या यंत्रणेमुळे या प्रक्रियेला वेळ लागत आहे. मुदत संपण्याची वेळ जशी जवळ येत आहे, तसा यंत्रणेवर ताण वाढत आहे. काही सोसायट्यांनाही शासनाने थंबची यंत्रणा दिली आहे. तिथेही दिवसभर गर्दी होत आहे. ज्यांचे कर्ज दीड लाखापर्यंत आहे. त्यांच्या कर्जाची माफी होणार असली ज्यांचे कर्ज जास्त आहे, त्यांना वरची रक्कम भरल्याशिवाय माफी मिळणार नसल्याचे शासनाने सांगितले आहे.

ही रक्कम मिळविण्यासाठी आता शेतकरी ही रक्कम हात उसणे मागण्यासाठी वणवण करत असल्याचे चित्र आहे. सध्या अडचणीतल्या खरिपामुळे यंदाच्या हंगामावरही पाणी फेरावे लागणार आहे. यामुळे उर्वरित रकमेची जुळणी कशी करायची याच चिंतेत शेतकरी आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रातही निकषास पात्र असलेल्या शेतकरऱ्यांवरही उर्वरित रक्कम भरण्याचा दबाव स्पष्ट दिसून येत आहे. ऐनवेळी पैसे उपलब्ध होत नसल्याने निकषात बसूनही भरण्यासाठी रक्कम नसल्याने शेतकरी दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफी पासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे.

कर्जमाफीच्या अर्जासाठी शेतकरी गर्दी करत असल्याने गावागावातील सोसायट्या अव्याहतपणे सुरू आहेत. अनेक सोसायट्यांनी सुटीही न घेता कामकाज सुरू ठेवले आहे. निकष तपासणे व संबंधित बाबी पूर्ण करण्यात सोसायट्यांचे सचिव व कर्मचारी व्यस्त असल्याचे अनेक गावांत सध्या चित्र आहे.

तांत्रिक अडचणी अभावी गती येत नसल्याने मुदतीनंतरही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंजित राहण्याची शक्‍यता आहे. अद्यापही अनेक प्रक्रियांबाबत संभ्रमावस्था असून, शासनाने मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com