ग्लोबऑइल इंडिया खाद्यतेल परिषद उद्यापासून मुंबईत

खाद्यतेल
खाद्यतेल

मुंबई : वनस्पती तेल, खाद्य आणि खाद्य घटक, तेलबिया आणि तेल रसायने विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषद उद्या (ता. १४) आणि शुक्रवार (ता. १५) रोजी मुंबईत होणार आहे. परिषदेचे यंदा २१ वे वर्ष असून त्यात मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना, युक्रेन, पाकिस्तान आणि भारत देशांची व्यापारी आणि सरकारी प्रतिनिधी मंडळे सहभागी होणार  आहेत. या परिषदेला इंडोनेशियाच्या अन्न आणि कृषी उपमंत्री मुसधालिफा मचमूद, अर्जेंटिनाच्या कृषी उद्योग विभागाच्या मंत्री मॅरिसा बर्चर, मलेशियाचे कृषी-फलोत्पादनमंत्री माह स्यू किओंग, भारताचे अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान, युक्रेनच्या आर्थिक विकास आणि व्यापार विभागाच्या उपमंत्री नताल्या मायकोल्सका; तसेच अन्न आणि कृषी धोरण मंत्री ओल्गा ट्रोफीमोवा; तसेच स्वामी रामदेवबाबा; तसेच अदानी उद्योगसमूहाच्या कृषी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चतुर्वेदी, लंडनच्या एलएमसी इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉ. जेम्स फ्राय, हॅम्बुर्ग (जर्मनी)च्या ऑइल वर्ल्ड या नियतकालिकाचे संपादक थॉमस मिएल्क, गोदरेज इंटरनॅशनलचे लंडन येथील संचालक दोराब मिस्त्री आणि सीमे डर्बी प्लॅन्टेशनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाचे प्रमुख महंमद हॅरिस महंमद; तसेच अनेक अन्य मान्यवर या परिषदेला उपस्थित असतील.   परिषदेत खाद्य तेलांविषयीचे विविध मुद्दे आणि व्यवसायातील नव्या कल्पनांचा विचार होईल. भारतात तेलाची आयात सातत्याने वाढत आहे. २०१५-१६ या वर्षात भारताने १० अब्ज डॉलर (६५,००० कोटी रुपये) किमतीचे १ कोटी ४० लाख टन खाद्यतेल आयात केले. परिषदेतील चर्चांचा मुख्य भर २०१७ मधल्या तेलाच्या किमती आणि बाजारपेठेची प्रगती यावर असेल. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतरची जागतिक अर्थव्यवस्था, युरोपिअन युनिअनमधून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा निर्णय (ब्रेक्झिट), युरोप झोनचे भवितव्य, भारतातील आर्थिक सुधारणा; तसेच या वर्षात काही अनपेक्षित घडल्यास त्याला कसे तोंड द्यायचे याबद्दलची योजना, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. आयोजक टेफ्लाचे व्यवस्थापकीय संचालक आणि ग्लोबऑइल इंडियाचे संयोजक कैलाश सिंग म्हणाले, की ग्लोबऑइल इंडियामध्ये विचारांची व्यापक देवाणघेवाण होत असल्यामुळे परिषदेतील आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधींचा सहभाग वाढत आहे आणि त्यातून जागतिक बाजारातील भारताचे महत्त्व स्पष्ट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com