हळद उत्पादकांना कोट्यवधींचा गंडा

हळद उत्पादकांना कोट्यवधींचा गंडा
हळद उत्पादकांना कोट्यवधींचा गंडा

अमरावती  ः हळद उत्पादक शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करून त्यांच्याकडून जादा भावाच्या आमिषाने हळदीची खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांना चुकारे न देता तब्बल तीन कोटी ९१ लाख ९५ हजार ८०० रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मार्च २०१६ ते डिसेंबर २०१७ या काळात हे प्रकरण घडले आहे. अतुल लव्हाळे, ओंकार ऊर्फ साहेबराव लव्हाळे, सुभाष लव्हाळे, गायत्री लव्हाळे (सर्व रा. ढंगारखेडा, वाशीम) या चौघांसह अमरावती शहरातील पद्यसौरभ कॉलनीतील श्रीधर हुशंगाबादे अशा पाच जणांविरोधात समरसपुरा, नांदगाव खंडेश्‍वर, कुऱ्हा या तीन पोलिस ठाण्यात फसवणूक व अपहार अशा स्वरूपाचे हे गुन्हे आहेत. 

१ मार्च २०१६ रोजी अतुल लव्हाळे यासह संबंधित टोळक्‍याने अचलपूरच्या लकडे संत्रा मंडईत हळद उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यात लव्हाळे याने आपला बचत गट असून त्याद्वारे शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक भाव देणार असल्याचे सांगितले. अशोक महादेव टेंभरे (रा. अब्बासपूरा, अचलपूर) यांच्याकडील ४७३ क्‍विंटल हळद अतुल लव्हाळे व त्याच्या साथीदारांनी खरेदी केली. बाजारभावाप्रमाणे ३३ लाख ११ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी १० लाख रुपये टेंभरे यांना सुरवातीला देण्यात आले. या माध्यमातून विश्‍वास संपादन करण्यात आला. त्यानंतर टेंभरे यांच्या जवळच्या हळद उत्पादकाकडून लव्हाळेने  २,२५९.९० क्‍विंटल अशी १ कोटी ५८ लाख १९ हजार ३०० रुपयांची हळद खरेदी केली. परंतु त्यानंतर टेंभरे यांचे २३ लाख ११ हजार तर त्यांच्या मित्राचे एक कोटी ५८ लाख १९ हजार ३०० रुपये देण्यास टाळाटाळ करण्यात आली. 

अमरावतीच्या वंदना लेआऊट, गाडगेनगर रहिवासी पंकज सुरेंद्र देशमुख यांच्याकडील ६१ टन ७४ किलो हळद टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यात आली. या व्यवहारातील ९ लाख २५ हजार रुपये अद्यापही दिले गेले नाहीत. जवाहरनगर निवासी सुभाष गोहत्रे यांच्याकडील ६२० क्‍विंटल, त्यांचा शेजारी विक्रम पाटील यांच्याकडील ४५ क्‍विंटल अशी २ कोटी १ लाख ४० हजार ५०० रुपयांची हळद खरेदी करून त्यांनाही पैसे देण्याचे टाळण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com