यवतमाळ जिल्हा कचेरीसमोरच पेटविली तूर

यवतमाळ ः जिल्हा कचेरीसमोर शेतकऱ्यांनी तूर पेटवून दिली.
यवतमाळ ः जिल्हा कचेरीसमोर शेतकऱ्यांनी तूर पेटवून दिली.

यवतमाळ (प्रतिनिधी) : यंदादेखील तूर खरेदीत घोळ सुरूच आहे. जिल्ह्यातील २० ते २२ हजार शेतकऱ्यांच्या घरात अजूनही तूर शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरामधील तुरीचा शेवटचा दाणा विकला जात नाही, तोपर्यंत तूरखरेदी सुरूच ठेवण्यात यावी, या प्रमुख मागणीसह चुकारे व इतर मागण्यांसाठी सोमवारी (ता.१४) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच तूर पेटविण्यात आली. तत्पूर्वी स्थानिक तिरंगा चौकात घुगऱ्या वाटून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

तूर खरेदीची मुदत वाढविण्यात यावी, हरभरा खरेदी सुरू करण्यात यावी, तुरीचे चुकारे मिळावेत, खासगी गोदाम भाड्याने घेण्यात यावे, अनेक शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांवरील व्याजाचा भुर्दंड शासनाने भरावा आदी मागण्यांसाठी स्थानिक तिरंगा चौकात शेतकरी संघर्ष समितीने धरणे दिले. 

आंदोलनादरम्यान आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी घुगऱ्या वाटप आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना पोलिस प्रशासनाने प्रवेशद्वाराजवळ थांबविले. पाच जणांनी जावे, असे सांगितले. यावरून आंदोलक व पोलिस प्रशासन यांच्यात वादविवाद झाला. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तुरीचे पोतेच पेटवून दिले व शासनाच्या विरोधात नारेबाजी केली. या आंदोलनात जिल्हा शेतकरी समितीचे प्रवीण देशमुख, बाबासाहेब गाडे पाटील, मनीष पाटील, राहुल ठाकरे, बिपिन चौधरी, अशोक बोबडे, प्रकाश नवरंगे, घनशाम दरणे, आनंद जगताप, अनिल गायकवाड, वासुदेव महल्ले यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.

शिवसेनेचा पाठिंबा यवतमाळच्या तिरंगा चौकात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन सुरू असताना खासदार भावना गवळी यांनी आंदोलनाला भेट दिली. आंदोलकांनी त्यांना घुगऱ्या भेट दिल्या. ही भेट स्वीकारत शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचे आश्‍वासन खासदार गवळी यांनी दिले. याशिवाय या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com