नेत्यांच्या संस्थांना कर्जवाटप भोवले, सोलापूर जिल्हा बॅंक बरखास्त

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर ः नेत्यांच्या संस्थांना खिरापतीसारखी वाटलेली कर्जे, परिणामी एनपीएत झालेली वाढ यामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विद्यमान संचालक मंडळ बुधवारी (ता.३०) अखेर बरखास्त करण्यात आले. रिझर्व्ह बॅंकेच्या शिफारशीनंतर राज्य सरकारने तातडीने ही कारवाई केली; तसेच प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनीही सकाळी अकरा वाजता थेट बॅंकेचे कार्यालय गाठून पदभार स्वीकारला. या कारवाईमुळे सत्ताधारी भाजपने बॅंकेवरील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना चांगलाच दे धक्का दिल्याचे बोलले जाते. 

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळातील संचालकांशी संबंधित नेत्यांनीच त्यांच्या संस्था आणि कारखान्यांना कोट्यवर्धीची कर्जे घेतली, पण ती भरली नसल्याने बॅंकेची आर्थिक घडी विस्कटली होती. संचालकांशी संबंधित संस्थांना सुमारे ६५० कोटी रुपयांची कर्जे वाटण्यात आली. त्यातही तारणमालमत्तेपेक्षा अधिक कर्जे दिली गेली, पण वसुलीच्या दृष्टीने विद्यमान व्यवस्थापन काहीच कारवाई करत नव्हते. सहकार विभाग आणि रिझर्व्ह बॅंकेने यापूर्वी सातत्याने बॅंकेच्या तपासणीनंतर बॅंकेला सुधारण्याच्या सूचना दिल्या होत्या, पण बॅंकेचा एनपीए कमी होण्याऐवजी वाढतच गेला. 

आज तब्बल ८७१ कोटींवर बॅंकेचा एनपीए पोचला आहे. बॅंकेच्या ठेवीही २३०० कोटींपर्यंत खाली आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांसाठी ही बॅंक चालवली जाते, त्यांना मात्र वाऱ्यावर सोडलेचे एकूण चित्र होते. गेल्या दोन वर्षांत तर अगदीच २० ते २५ टक्‍क्‍यांपर्यंतही शेतीकर्जासाठी बॅंकेने कर्जपुरवठा केला नाही. नाबार्डनेही यापूर्वी बॅंकेला ताकीद दिली होती.,पण बेकायदा अव्वाच्या सव्वा दिलेली कर्जे थकीत असताना, ठेवीदारांचे पैसे सुरक्षित नसल्याचे निदर्शनास येते असल्याने, रिझर्व्ह बॅंके ११०अची शिफारस राज्य सरकारकडे करू शकते. त्यानुसार ही शिफारस रिझर्व्ह बॅंकेने सरकारकडे केली आणि त्यावर तातडीने कारवाईही झाली. 

एक खासदार, चार आमदार संचालक मंडळात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी आमदार राजन पाटील हे सध्या बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याशिवाय माजी उपमुख्यमंत्री, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, दीपक साळुंखे, जयवंत जगताप, दिलीप माने ही नेतेमंडळी बॅंकेच्या संचालक मंडळात आहेत. त्याशिवाय जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांचाही यामध्ये समावेश आहे. त्याशिवाय शेकापचे नेते, आमदार गणपतराव देशमुख यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख, माजी आमदार शामलताई बागल यांच्या कन्या रश्‍मी बागल यांच्यासह सुरेश हसापुरे, सुनंदा बाबर, भारत सुतकर, सुभाष शेळके हे अन्य मंडळी बरखास्त संचालक मंडळात आहेत.

नेते आणि त्यांची थकबाकी

उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी संबंधित विजय शुगरकडे १८० कोटी २१ लाख रुपये, मोहिते पाटील चॅरिटेबल ट्रस्ट ४२ कोटी ६४ लाख रुपये, शंकर कारखाना ५१ कोटी ३८ लाख रुपये, शंकरराव मोहिते पाटील सूतगिरणी ८८ लाख ४४ हजार रुपये, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या स्वामी समर्थ कारखान्याकडे ८८ कोटी ३३ लाख रुपये, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या सांगोला कारखान्याकडे ८० कोटी ५२ लाख रुपये, आमदार प्रशांत परिचारक यांच्या पांडुरंग प्रतिष्ठानकडे २५ कोटी ५४ लाख रुपये, माजी आमदार दिलीप माने यांच्या ब्रह्मदेव माने सामाजिक, शैक्षणिक संस्थेकडे २ कोटी २३ लाख रुपये आणि बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष, राजन पाटील यांच्या नक्षत्र डिस्टिलरीकडे २ कोटी ९ लाख रुपये अशी थकबाकी आहे. या संस्थांशी थेट या नेत्यांचा संबंध आहे. त्याशिवाय अन्य थकबाकीदारामध्ये त्यांचे कार्यकर्ते आणि नातेवाइकांच्या संस्थांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com