बोंड अळी, धानबाधितांसाठी मदतीचा शासन आदेश जारी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यात कापसावरील गुलाबी बोंड अळी आणि धान पिकावरील तुडतुडे किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत वितरणाचा शासन आदेश राज्य सरकारने नुकताच जारी केला. ३,४८४ कोटी रुपयांची एकूण मदत तीन समान हप्त्यांत वितरित केली जाणार आहे. ही मदत तीन टप्प्यांत दिली जाणार असली तरी शेतकऱ्यांना ही रक्कम एकाचवेळी मिळणार आहे. तसेच मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यांवर जमा करताना बँकांनी कोणतीही वसुली करू नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. 

राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. राज्य सरकारच्या प्राथमिक पाहणीनुसार ४३ लाख हेक्टर लागवडीपैकी सुमारे ३३ ते ३४ लाख हेक्टरवरील कापसाचे पीक बाधित झाले आहे. तसेच पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मावा आणि तुडतुड्यामुळे नुकसान झाले. यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे राज्य सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार पिकांना मदत दिली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले होते.

त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीची विनंती केली. त्यापोटी केंद्र सरकारला सुधारित ३,४८४ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. एकूण मदतीचे वाटप तीन समान हप्त्यांत म्हणजेच सुमारे १,१६० कोटींचे तीन हप्ते वितरित केले जाणार आहेत. लवकरच पहिल्या टप्प्यातील मदतीचे वितरण सुरू होणार आहे. संयुक्त पंचनाम्यानुसार निश्चित करण्यात आलेले ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच एनडीआरआच्या दरानुसार मदत दिली जाणार आहे;

तसेच बँक खाते आधारशी लिंक असलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदतीची रक्कम वितरित केली जाणार आहे. आधार नसलेल्या शेतकऱ्यांना इतर ओळखपत्राच्या पुराव्याद्वारे मदत वितरित केली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने ८ मे रोजी या संदर्भातील निर्देशांचा शासन आदेश जारी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com