हरभरा खरेदीही रखडतच सुरू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी खरेदी केंद्र जसे अडखळत सुरू झाले, तशी खरेदीही रखडत सुरू असून, सुमारे १२ हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. आजघडीला १२ खरेदी केंद्र सुरू आहेत. 

जिल्ह्यात प्रशासनाने १२ हरभरा खरेदी केंद्र मंजूर केले होते. यातील सहा केंद्र मागील २०-२५ दिवसांत सुरू झाले, तर उर्वरित पाच केंद्र या आठवड्यात सुरू झाले. रावेर, भडगाव, पाचोरा येथे सुरवातीच्या टप्प्यात खरेदी केंद्र सुरू झाले. जळगाव, अमळनेर येथे अलीकडेच खरेदी केंद्र सुरू झाले. रावेरात खरेदीला बरा प्रतिसाद आहे; तर उर्वरित खरेदी केंद्रांमध्येही हरभरा येत असून, शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. 

रावेर येथे सुमारे २३ दिवसांपूर्वी खरेदी केंद्रात हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अडकले आहेत; तसेच जळगाव, भडगाव येथेही शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नसल्याची माहिती आहे. चुकाऱ्यांसंबंधी शेतकरी खरेदी केंद्रात विचारणा करू लागल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी सुमारे ९० हजार हेक्‍टरवर झाली होती. ही बाब लक्षात घेता शासकीय केंद्रातही मोठ्या प्रमाणात खरेदी अपेक्षित होती. कारण बाजार समिती किंवा खासगी बाजारात हरभऱ्याला अपेक्षित दर नाहीत. 

बाजारात हरभऱ्याला ३६०० रुपये प्रतिक्विंटलपासून दर आहेत. शासकीय खरेदी केंद्रात ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर हरभऱ्याला आहे; परंतु फक्त १२ हजार क्विंटल हरभरा खरेदी शासकीय केंद्रांमध्ये झाली आहे. 

गोदामांची अडचण दूर; तूर खरेदीही सुरू जिल्ह्यात गोदामांची अडचण दूर झाली असून, भडगाव व इतर दोन ठिकाणी वखार महामंडळाची गोदामे खरेदी केलेले धान्य साठविण्यासंबंधी मार्केटिंग फेडरेशनला मिळाली आहेत. नोंदणी करून तूर खरेदीही सुरू झाली आहे. नऊ ठिकाणी तूर खरेदी केली जाईल. १८ मेर्पंत तूर खरेदीचे आदेश आहेत, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांकडून मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com