पश्चिम विदर्भाच्या पाच जिल्ह्यांतील भुईमूग क्षेत्र निम्म्यावर

वेणी, जि. यवतमाळ ः दत्ता आऱ्हाडे यांच्या विहिरीने या वर्षी पहिल्यांदाच तळ गाठला आहे.
वेणी, जि. यवतमाळ ः दत्ता आऱ्हाडे यांच्या विहिरीने या वर्षी पहिल्यांदाच तळ गाठला आहे.

अमरावती : पाणीटंचाईमुळे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये भुईमूग लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. दरवर्षी सरासरी १५ हजारपेक्षा अधिक हेक्‍टरवर पाच जिल्ह्यांमध्ये भुईमूग घेतला जातो. या वर्षी पाण्याअभावी केवळ ६ हजार हेक्‍टर क्षेत्रावरच भुईमुगाची लागवड झाली आहे. 

अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमध्ये उन्हाळी भुईमूग घेतला जातो. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड करून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे पीक काढणीस येते. त्यानंतर खरिपातील पिके शेतकरी घेतात. या वर्षी मात्र रब्बी हंगामालादेखील कमी पर्जन्यमानाचा फटका बसला. त्यासोबतच २०१७-१८ या वर्षात अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे जमिनीत पुरेशी ओलही नाही आणि नद्या, नाले व इतर संरक्षित स्राेतदेखील कोरडे पडले. परिणामी या वर्षी पाचही जिल्ह्यांमध्ये भुईमूग लागवड क्षेत्र निम्म्यावर आले आहे. 

३८०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर आणि एकरी ८ ते ९ क्‍विंटलची उत्पादकता या पिकातून मिळते. खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या पैशाची सोय या पिकातून करणे शेतकऱ्यांना शक्‍य होते. संरक्षित सिंचनाची सोय असलेले शेतकरी हे पीक घेतात. या वर्षी मात्र संरक्षित सिंचनाचे सर्वच स्राेत कोरडे पडल्याने भुईमुगाचे क्षेत्र निम्म्यावर आले आहे. 

यवतमाळला सर्वाधिक फटका यवतमाळ जिल्ह्यात भुईमुगाखालील सर्वाधिक ८ हजार हेक्‍टर क्षेत्र दरवर्षी राहते. या वर्षी पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा याच जिल्ह्याला बसल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करताना प्रशासनालाच अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पिकांसाठी पाणी उपलब्धतेचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात भुईमूग क्षेत्र ८००० हेक्‍टरवरून २०८२ हेक्‍टरवर पोचल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

सरासरी क्षेत्र व चौकटीत या वर्षीचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) अमरावती            २२०० (१०२२) बुलडाणा             १५०० (९७४) अकोला              २९०० (१५९७) यवतमाळ           ८००० (२०८२) वाशीम               ६०० (३५७.९०)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com